स्पायडरमॅनच्या जीवाची मुंबई ( भाग : १ )

मुंबई. शनिवारची दुपार. मरीन ड्राईव्ह जवळच्या एका कंपनीच्या ऑफिसमध्ये दुपारचे जेवण सुरू होते. रामनाथन यांना जास्त भुक नसल्याने ते फक्त आज इडली सांबार खात होते. कुळकर्णी बाई चपाती भाजी खात होत्या. तर गुप्ताजी हिशेबात मग्न होते. त्यांना जेवायची सवड नव्हती. राजू शिपाई बाहेर बाकड्यावर बसून धूम मचाले हे गाणे ऐकत होता. बॉस विरेंद्र शाह जेवण आटोपून फोनवर काहितरी बोलत होते.

अचानक ...धडाम... धुम्म .. धस्स!! असा अवाज आला, ऑफिसची खिडकी फुटली, खिडकीतून एक जाळी आली, आणि त्या जाळीने रामनाथन ची ईडली ओढली आणि बघता बघता ईडली खिडली बाहेर खेचली गेली. रामनाथन तावातावाने फुटलेल्या खिडकीतून बाहेर डोकावले, तर त्यांना भुकेला स्पायडरमॅन खिडकीबाहेर लटकून ईडली खातांना दिसला.

रामनाथन : ए, लाल बुरख्या माझी इडली मला परत दे.

स्पायडरमॅन : नाही देत. मला खुप भुक लागली आहे.

रामनाथन : तू येथे का आलास ते सांग आधी?

स्पायडरमॅन : अमेरिकेतल्या लोकांचे प्रश्न सोडवत होतो. अमेरिकेतले पोलीस मी आल्यापासून स्वस्थ बसून आहेत. माझ्यावरच अवलंबून आहेत. आज एका चोराचा पाठलाग करत होतो विमानाने. अरबी समुद्रावरून विमान जात होते. अचानक एक हेलीकॉप्टर उडत गेले आणि त्यामागे एक काळ्या बुरख्यावाला एक मनुष्य थांबून थांबून उडत होता. क्रीश होता बहुतेक. पण कृश नव्हता तो. चांगले बलदंड बाहू होते त्याचे. त्याचेशी टक्कर झाली आणि काय सांगू , या इमारतीवर येवून आदळलो. खुप गरम होते आहे मला. आणि सकाळपासून काहीच खाल्ले नव्हते. म्हणून तुमची ईडली खाल्ली....

रामनाथन : पण एक जाळी सोडली असती की हो ... लगेच विमानाला लटकून जावू शकला असता...

स्पायडरमॅन : अहो आता चाळीशी पार केली. वय झालं. चार पाच जाळ्या सोडून बघितल्या. हातातून. पायातून सुद्धा सोडल्या. पण आजकाल जाळ्या खुपच बारीक होत चालल्या आहेत हो. लगेच तुटतात. पावर कुठे गेली काय माहीती?

कुलकर्णी बाई : असूंदेत. असूंदेत. ये बाबा. मध्ये ये. बैस येथे. थोड्या जाळ्या सोड. मला हव्यात. स्वेटर विणायचे आहे.

स्पायडरमॅनने थोड्या जाळ्या त्यांना दिल्या. स्पायडरमॅनच्या दोऱ्यांनी स्वत :ला गुरफटून घेवून त्यांना आनंद झाला.

त्या म्हणाल्या, "भाजी चपाती हवी का?"  स्पायडरमॅन : नको आता. पोट भरलंय. पण मला ना या सगळ्या क्रिमीनल्स चा कंटाळा आलाय. येथे आलोच आहे तर काही नोकरी मिळेल का मला हे विचारायचे होते... येथे मला जास्त कोणी ओळखणार नाहीत. वाटल्यास मी बुरखा काढून फिरत जाईन.... कुठे आहेत तुमचे बॉस? मला नोकरी हवी आहे.

गुप्ताजी म्हणाले," जा आत. जा की. आमचे बॉस बसलेत. माग त्यांना नोकरी.

स्पायडरमॅन केबीन मध्ये गेला. शाह म्हणाले, " कोण आपण?"

स्पायडरमॅन : मी स्पायडरमॅन.

शाह : चित्रविचित्र कपडे का घातलेस असे? हां आले लक्षात , तूच का तो पीटर परकर..?

स्पायडरमॅन : परकर नाही पार्कर.

शाह : काय क्वालीफिकेशन आहेत तुझे?

स्पायडरमॅन : वयाची तिशी होती तेव्हा जाळं सोडायचा वेग होता चारशे सत्तर किलोमीटर प्रती सेकंद आणि जाळेही काही साधेसूधे नाही, दोरखंडाएवढे जाळे.. आता वेग थोडा कमी आहे आणि जाळे थोडे बारीक झाले आहे...

शाह : अच्छा.. मी एक करू शकतो तुझ्यासाठी... तू पार्ट टाईम की फुल टाईम जॉब शोधतो आहेस?

स्पायडरमॅन : चालेल कोणताही.

शाह : मग मी असे करतो. तु रोज सकाळी शार्प नऊ वाजता येत जा. मी सांगेल तेवढी जाळी सोडत जा. मी ती विकेल. दहा वाजता परत गेला तरी चालेल. बघू मार्केटमध्ये काय कसे विकले जाते. त्यानुसार तुला नफ्यातला वाटा देत जाईन . चालेल?

स्पायडरमॅन ने होकार दिला. ऑफिसमधल्या सगळ्यांना या सगळ्या प्रकाराबद्दल माहिती नव्हते. बॉसने हे कुणालाच न सांगण्याचे वचन स्पायडरमॅनकडून घेतले. सौदा पक्का झाल्यावर स्पायडरमॅनने केबीनच्या खिडकीतून उडी मारली.

थोडा वेळ समुद्राजवळच्या दगडांवर शांतपणे बसून झाल्यावर स्पायडरमॅन विचार करू लागला," मला अमेरीकेपासून काही दिवस दूर राहायचे आहे. बघूया त्यांना माझी आठवण येते का ते! तोपर्यंत अजून एखादा जॉब शोधायला हवा."

असे म्हणून तो आनंदाने रस्त्यावर चालू लागला.... अचानक उन्हामुळे त्याला चक्कर आली आणि त्याची टक्कर सुनील शेट्टिच्या कारशी झाली. कार थांबवून सुनील शेट्टी बाहेर आला.... ( क्रमश : )