ह्यासोबत
मंत्र्याला चावल्यामुळे किड्याला मरणोत्तर प्रतिकात्मक अटक झाली. पोलीस रुममध्ये चाललेला गोंधळ बघत होते.
सनी , गोविंदा एकमेकांवर जाळे सोडत होते. सुभाषनी तेथेच शूटींग करायला सुरूवात केली.
स्पायडरमॅन कधी रडला नव्हे एवढा रडला. सुपरस्टार चॅनेलची पत्रकार 'कु. प्रश्नावली प्रश्नकारिता' धो धो रडणाऱ्या स्पायडरमॅनला खुप प्रश्न विचारू लागाली. एखादा माणुस खुप भावनाविवश झाल्यावर सारखे प्रश्न विचारून भांडावून सोडणे हा चॅनेल पत्रकारांचा आवडता छंद आहे.
कु. प्रश्नावली : " कसे वाटते आहे आपल्याला आता? तुमच्या शक्तीचा जन्मदाताच आता या जगात नाही. कसे वाटते, अहो सांगा ना, कसे वाटते आपल्याला?"
पीटर : " खुप रडू येते आहे. तुम्ही काय केलं असतं? हसला असता का? हं?"
कु. प्रश्नावली : " नाही हो. मीही रडले असते. बरं मला एक सांगा, मेरी जेन कुठे आहे... मी आधीही हा प्रश्न विचारला, आपण उत्तर दिले नाही?"
पीटर : " कोणते मीठ खाता तुम्ही? ...म्हणजे माझ्या जखमेवर चोळण्यासाठी तुम्ही ते मीठ बरोबर आणले असेलच, नाही का?"
कु. प्रश्नावली : " कसली जखम?"
पीटर : " अहो, काय सांगू, ती ग्रीन गोब्लीन बरोबर पळून गेली...तीला जाळ्या जाळ्यांपेक्षा तो जादूच्या विमानावर उभा राहून उडणारा तो हिरवा गबलू आवडला."
कु. प्रश्नावली : " मग तेव्हा कसे वाटले आपल्याला?"
आता मात्र स्पायडरमॅन संतापला. त्याने नवीनच मिळालेल्या शक्तीच्या आधारे कु. प्रश्नावली च्या ओठांना सील केले. नंतर उचलून तीला उडत उडत सुपरस्टार चॅनेलच्या ऑफिसमध्ये नेवून सोडले. तेव्हा बातम्या चालूच होत्या...
वृत्तनिवेदक : " आताच आपण बघितले की स्पायडरमॅन कडून आमच्या पत्रकाराचे तोंड बंद करण्यात आले आहे. हा अन्याय असून लोकशाहीचा अपमान आहे.... आता आम्ही मानवी हक्क आयोगाकडे तक्रार करणार आहोत...."
पुढे ऐकायला स्पायडरमॅन थांबला नाही. प्रतिस्पर्धी चॅनेल कडे जावून त्याने आपले म्हणणे मांडले. म्हणून त्याचेविरुद्ध सुपरस्टार चॅनेल तक्रार करू शकले नाही.
नंतर त्याने भारत सरकारकडे किड्याचा पुतळा उभारायची विनंती केली.
त्यानंतर किड्याचा पुतळा उभारण्यात आला. स्पायडरमॅन मुंबईत आल्याची आठवण म्हणून.
मग विरेंद्र शहांना तसेच मरीन ड्राईव्हच्या त्या ऑफिसमधल्या सगळ्या जणांना भेटून स्पायडरमॅन हवेत दिसेनासा झाला. तो अमेरिकेत पोचला.
त्याला कळले की मेरी जेनला ग्रीन गोब्लीन ने पळवून नेले होते व तीला असे सांगायला सांगीतले होते की ती स्वतःच्या मर्जीने त्याच्यासोबत गेली होती. 'हिरव्या गबलू' चा पुन्हा पराभव करून स्पायडरमॅनने मेरी जेनला सोडवले.
अमेरीकन सरकार खुष झाले. त्यांनी स्पायडरमॅन ची डुप्लीकेटस बनवायचा विचार सोडून दिला...
इकडे बॉलीवुडमध्ये 'चावले गेलेले' कलाकार चित्रपटात स्टंट सीन करू लागले..
रेस चित्रपट स्पायडरमॅनशिवायच पूर्ण झाला.
अशा प्रकारे, स्पायडरमॅनच्या जीवाची मुंबई झाली...आणि किड्याचा मात्र जीव गेला.