घडेल कोणत्या क्षणास आपसूक कोणती ?
वसंत पाहुनी तुझा घडेल चूक कोणती ?
जसे जसे उधाणले कळीवरी तरूणपण
दिसू खट्याळ लागली नवी चुणूक कोणती ?
कसे तुझे फुलारणे कळे मला दुरूनही ?
तुझा सुगंध वाहते तरी झुळूक कोणती ?
अनंगरंग एक एक अंग भासते गझल
जगास दाखवू करून श्ब्दरूप कोणती ?
कशास तू उरास टोचतोस कंटकापरी ?
फुला तुझी अशोभनीय वागणूक कोणती ?
भरून पावतो कसा बघून फक्त मी तुला ?
प्रमत्त यौवनात ही विदेह भूक कोणती ?