प्रिय पत्नीस, आता मोठी हो!

"संदिग्ध" यांच्या "प्रिय नवऱ्यास"  केलेल्या निस्संदिग्ध सूचनेस दुसरी बाजू असल्याचे लक्षात आल्याने
ती बाजूही इतर मनोगतींच्या लक्षात आणून देण्याचा हा नम्र प्रयत्न.

प्रिय पत्नीस,

आता मोठी हो!

नवरा काम करत असतांना,
सोफ्यावर पाय ताणून त्याच्या चुका काढणे म्हणजे लहान तोंडी मोठा घास.
आई-बाबांनी केलं असेल कौतुक त्याचं लहानपणी,
पण आता- मोठी हो. 

उंटावरून शेळ्या हाकण्यात तुमचा गौरव
नवऱ्याची खिल्ली उडवण्यात सगळे स्त्रीत्त्व-
होळीला जरा पुरणपोळ्या करा  म्हटलं, तर मात्र शेपुट आत-
असला अगोचरपणा शोभत नाही आता.
त्यापेक्षा मोठी हो.

लग्नाचा पाया म्हणजे सहकार्य:
बँक आणि बिलं सांभाळणार नाही.
मला बाहेरची कामे आवडत नाहीत.
लाँड्रीत कपडे टाकणार नाही. चक्कीत दळण टाकणार नाही.
बाजारहाट मला जमत नाही.
असले बालहट्ट परवडत नसतात गृहस्थाश्रमात.
तेव्हा आता मोठी हो.

घर ही आपली एकमेव जबाबदारी
नवऱ्याने बाहेरची कामे सांभाळावित. नाही तर तो नामर्द.
असले शेरे आता "पॉलिटिकली करेक्ट" राहिलेले नाहीत.
हे कळायला हवंय तुला- मोठी झालीयंस ना?

नवरा लाडात असतांना टी.व्ही. जास्त महत्त्वाचा वाटत असेल,
जेवतांना एकीकडे  कागाळ्या करायच्या असतील,
तर काय हरवतंय, काय निसटतंय ह्याचा विचार कर.
वाढत्या शरीर-विस्तारापासून तर
घराची किल्ली आत विसरून बाहेरून लॉक करण्याच्या धांदरटपणापर्यंत
प्रत्येक गोष्टीचं खापर नवऱ्याच्या माथी फोडण्याआधी विचार कर.
पण विचार करून थांबू नकोस- कृती कर.
आता मोठी हो.