प्रिय नवऱ्यास... आता मोठा हो!

प्रिय नवऱ्यास,

आता मोठा हो.
बायको काम करत असतांना, सोफ्यावर पाय ताणून
तिच्या चुका काढणे
म्हणजे लहान तोंडी मोठा घास.
आई-बाबांनी केलं असेल कौतुक त्याचं लहानपणी,
पण आता- मोठा हो.

उंटावरून शेळ्या हाकण्यात तुमचा गौरव
बायकोची खिल्ली उडवण्यात सगळी मर्दुमकी-
पडद्यांसाठी खिळे ठोकायचे म्हटलं, तर मात्र शेपुट आत-
असला अगोचरपणा शोभत नाही आता.
त्यापेक्षा मोठा हो.

लग्नाचा पाया म्हणजे सहकार्य:
 नातेवाईकांना फोन करणार नाही- मला फोनवर बोलायला आवडत नाही
मी कपडे आवरणार नाही,
स्वयंपाक मला येत नाही-
असले बालहट्ट परवडत नसतात गृहस्थाश्रमात
तेव्हा आता मोठा हो.

नोकरी ही आपली एकमेव जबाबदारी
बायकोने बॅंक आणि बिलं सांभाळावी, 
नाहीतर ती अडाणी-
असले शेरे आता  “politically correct” नाहीत
हे कळायला हवंय तुला-
मोठा झालायंस ना?

बायको लाडात असतांना टी.व्ही. जास्त महत्त्वाचा वाटत असेल,
जेवतांना एकीकडे इंटरनेट शिवाय चालत नसेल,
तर काय हरवतंय, काय निसटतंय
ह्याचा विचार कर.

डोक्यावरच्या टकलापासून पायांमधल्या विजोड मोज्यांपर्यंत
प्रत्येक गोष्टीचं खापर बायकोच्या माथी फोडण्याआधी
विचार कर. पण विचार करून थांबू नकोस-
कृती कर.
आता मोठा हो.