(हत्तीचा) रस्ता-३

अनिरुद्धरावांच्या रस्त्यावर सुवर्णमयीताईंचे पिग आणि लांडगे आणि केशवरावांचे मोर पाहिल्यावर म्हटले आपले हत्तीही ह्याच रस्त्यावर का आणू नयेत?

ओहोळावरती सोंडभर जे ओढले
तेच फिरुनी पाठीवरती सोडले

पाडले चिखलात कोणी एकदा
थंड देहाचे पुरवले चोचले

हत्तीणीने हाक येताना दिली
लोळणे माझे अशाने थांबले

कासवाचे काय आता मी करू
पाय पडता ते जरासे हालले

झुलतो मी, वेळी अवेळी धावतो
माजलो? की वेड मजला लागले?

एक मोठे झाड मी मटकावले
चार पानांनी कुणाचे भागले?

कळपात या मुख्य मी होतो सुखी
तारुण्य ते चिरकाळ कोणा लाभले?

हा मला रस्ता मिळाला शेवटी
चाललो, मागे कुणी ना चालले

कळपात ह्या आयुष्य गेले हत्तीचे
शेवटी जग एकट्याने सोडले