कालच्या रात्री !

कालच्या रात्री तुला जे भेटले ते चंद्र-तारे

आणि माझ्या अंतरी जे पेटले ते ते निखारे-

सारखे का? हाच माझा प्रश्न आहे!

उत्तराची ना अपेक्षा, हो सुखी माझ्याहिपेक्षा

हीच माझी एक इच्छा स्वच्छ आहे !

जो कधी होता अडोसा आपला तो सोनचाफा

आणि आला शेवटी माझ्या घरी जो तो लिफाफा-

का सुगंधी? हाच आता शोध घेतो!

तो लिफाफा जाळला मी, सोनचाफा टाळला मी

अंतरी कवटाळला तो गंध घेतो !

तन्मयी कैफातला अंगांवरीचा तो शहारा

आणि''ओळख तू नको देऊस ''हा कुठला इशारा?

का दिलेला?ते मला कळणार नाही

कैफ तो गेला विझूनी, आठवे गेली झिजूनी

पण शहारा तो कधी टळणार नाही !

चित्तचैतन्यात जी होती कधी, ती रागमाला

आणि एकांतातली, माझी अशी ही भोगमाला-

तू दिलेली, ती कधी सरणार नाही!

तू नको घेऊस भीती, हीच माझी शुद्ध प्रीती

की हिला म्हणतात नियती लोक काही?

कालच्या रात्री परंतू, भेटला तो चंद्र माझा

अमृताचे चांदणे, नक्षत्र, हा तर देह माझा-

संपलेला, प्रेम माझे फक्त आहे !

अन तुझ्या भाळी सजे, ते गंध जे चंद्राकृतीचे

गंध नाही, तेच माझे रक्त आहे !