... तर छोकऱ्याचे वय काय?

नमिताची गणित ऑलिंपियाडची तयारी चालू होती. दुधात साखर म्हणजे तिचे आवडते 'गणिती काका उर्फ गका' कामानिमित्त घरी उतरले होते. रविवारी सकाळी न्याहारीच्या वेळी बाबांनी गका ला विचारले, "कसा आहे रे तुझा छोकरा. आता अखंड बडबड चालू असेल ना!".

ढण्ण!!! नमिता ओशाळली. छे, आपण साधी चौकशी सुद्धा केली नाही गका च्या बाळाची. फोनवरून बाळ झाल्याची बातमी कळली होती बाबांना आणि मग घरच्यांना. पण तिला आठवत नव्हते की, फोन किती महिन्यांपुर्वी आला होता.

नमिता बाबांना म्हणाली, "बाबा, तुमच्या लक्षात कसे नाही, तो बडबड करण्याएवढा मोठा कुठे झाला अजून! खरं आहे ना गका? ".

गका ने ताडकन ओळखले की नमिता घसरलेली गाडी सावरायचा प्रयत्न करत आहे. तो  म्हणाला, "हे बघ नमिता. मी दिलेल्या अक्षर व अंकांच्या खेळातून तुला माझ्या छोकऱ्याचे वय ओळखता येईल. आहेस तयार?".

नमिताने झटपट उत्तर दिले व गका कडून गणितावरील एक पुस्तकही बक्षीस मिळाले.

गका ने दिलेला खेळ:

१ ते ९ अंक प्रत्येकी वेगवेगळ्या नऊ अक्षरांशी निगडित आहेत. ही नऊ अक्षरे आहेत - क, ख, ग, य, र, ल, प, फ, ब

एका अक्षराला फक्त एकच अंक निगडित आहे आणि एक अंक फक्त एकाच अक्षराला निगडित आहे.

जर माझ्या छोकऱ्याचे अक्षर 'र' आहे, तर त्याला निगडित असलेला अंक हेच त्याचे वय आहे.

हे ओळखण्यासाठी एका नियमाचा वापर करायचा. तो नियम असाः

क + ख + ग = ग + य + र = र + ल + प = प + फ + ब = १३