पडसाद

सूर त्याचे, चित्त माझे,   साद अन पडसाद आहे
तोकडा व्यासंग माझा;   आसवांची दाद आहे

मी जुना झालो कधी? का? ते मला कळलेच नाही...
वेगळे संदर्भ आता खुंटला संवाद आहे

एक रस्त्याच्या कडेला फूल खोकत बोलले, "या -
माणसांचा फार आता वाढला उच्छाद आहे! "

बंगले बांधू चला अन झोपड्यांमध्येच तेही!
... बापजाद्या दौलतीचा केवढा उन्माद आहे

देवधर्माने जगी होतेच की काही भलेही
कोणते नियमीत होते कोणता अपवाद आहे?