नारायण धारप - अमानवी अज्ञाताचा आलेख

'रात्री अचानक तुम्हाला दचकून जाग येते.   मिट्ट काळोख. खोलीत दुसरं कुणीतरी असल्याची तुम्हाला शंका येते. मेणबत्तीच्या दिशेनं तुम्ही हात पुढं करता आणि तुमच्या उघड्या तळहातावर कुणीतरी काडेपेटी ठेवतं...... '

जगातली सर्वात  छोटी भयकथा म्हणून ही इंग्रजी गोष्ट प्रसिद्ध आहे.   इंग्रजी साहित्यात भयकथा, गूढकथा, रहस्यकथा या साहित्यप्रकारांना दुय्यम समजले जात नाही. मराठी साहित्यात मात्र हे प्रकार रंजनप्रधान आणि म्हणूनच काहिसे उथळ मानले जातात. एकतर जे जे लोकप्रिय ते ते दर्जाहीन असा एक समीक्षकी समज आहे. तो अगदीच गैरवाजवी आहे असे नाही ( कलाप्रकारांची लोकप्रियता आणि त्यांचा दर्जा यावर नुकताच झालेला एक प्रदीर्घ वाद 'मनोगतीं' च्या स्मरणात असेलच! ). पण अशा सरसकट वर्गीकरणामुळे या प्रकारचे लेखन करणारे सगळे लेखकही सुमार दर्जाचे मानले जाणे हे बाकी चुकीचे आणि अन्यायकारक आहे. नारायण धारप हे अशा अन्यायाचे (कदचित सर्वात मोठे ) उदाहरण आहे. धारपांचा वाचकवर्ग मोठा असला तरी आपल्या आवडत्या लेखकांच्या यादीत धारपांचा समवेश करणे किंवा धारपांची पुस्तकं विकत घेऊन वाचणं असं करायला मराठी वाचकाला अजून संकोच वाटतो असंच चित्र आहे. 'भयकथा' या प्रकाराची उणीपुरी चाळीस वर्षे 'समर्थ' पणे हाताळणी करूनही धारपांना मराठी साहित्यविश्वात मानाचे पान नाही हे मराठी साहित्याचे आणि पर्यायाने मराठी वाचकांचे दुर्दैव म्हणावे लागेल.
नारायण धारप यांच्यावर प्रामुख्याने भयकथा लेखक असा शिक्का बसला असला तरीही धारपांची प्रतिभा ही त्याहून अधिक कितीतरी क्षेत्रांना स्पर्श करून जाते.   गूढकथा, विज्ञानकथा, रहस्यकथा, सामाजिक कादंबऱ्या एवढेच काय पण 'चोवीस तास' नावाचे एक नाटकही धारपांनी लिहिले आहे. स्वतः विज्ञान शाखेचे पदवीधर आणि केमीकल इंजीनिअर असलेल्या धारपांनी विस्तृत वाचन केले आहे. अर्थात धारपांचा 'बायो-डाटा' देण्याचे हे काही स्थळ नव्हे, पण धारपांच्या लिखाणातली तर्कसंगती, काल्पनिक कथा लिहितानाही त्यांनी विज्ञानाशी राखलेले इमान आणि त्यांची वस्तुनिष्ठता  ही  धारपांची ही पार्श्वभूमी कळाल्यावर समजून येते. याशिवाय कुशाग्र कल्पनाशक्ती आणि मानवी स्वभावाचे, वागण्याबोलण्याचे अचूक आकलन हे कोणत्याही साहित्यीकाला आवश्यक हे गुणही धारपांमध्ये आहेतच.
या लेखात मी फक्त भयकथाकार धारपांविषयी लिहिणार आहे.   इतर सर्व रसांप्रमाणेच 'भय'  ही मानवी मनाला उत्तेजित करणारी, कदाचित त्यातल्या अनपेक्षिततेच्या छटेमुळे जास्तच उत्कंठावर्धक असणारी भावना आहे.   अज्ञाताचे भय - 'फिअर ऑफ दि अननोन'  हे समजातील सर्व थरांमध्ये दिसून येते. लहानपणी दाराआड लपलेल्याने ' कूक.. ' केल्यावर वाटणाऱ्या हव्याहव्याशा भीतीपासून ते रोलर कोस्टरमधील 'स्केरी राइडस' पर्यंत भयाचा माणसाने मनोरंजनासाठी    वापर करून घेतला आहे. अमानवी शक्ती किंवा सामान्यांच्या भाषेत 'भूत' ही तर भयाची फारच जुनी संकल्पना. धारपांच्या भयकथेमधल्या अमानवी शक्ती रामसे बंधूंच्या सिनेमातल्या भुतांप्रमाणे हिडीस आणि किळसवाण्या नसतात ( काहीवेळा असतातही! ). बहुदा त्या सर्वसामान्य माणसांप्रमाणे, कधीकधी तर त्या अमानवी असल्याबद्दल चुटपुट लागावी अशा लोभसवाण्या असतात. या शक्तींचा उल्लेख करतांना धारप बऱ्याच वेळा 'ते आलं होतं... ' अशी वगैरे वाक्यं लिहून जातात. धारपांच्या कथेची बांधणी इतकी घट्ट आणि पिळदार असते की वाचक जणू एका अदृष्य(अमानवी? ) शक्तीने कथेबरोबर खेचला जातो. आयुष्यभर कटकट्या बायकोच्या वचकाखाला राहिलेली नवरा अखेर मरतो आणि तिच्याच शरीरात शिरून तिच्या देहाचा ताबा घेतो ( 'कवटीतला कैदी'), कुणीतरी  गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या कवठाच्या झाडाच्या आसपास वावरणारी शक्ती रात्री तिथे येणाऱ्या प्रत्येकाला आत्महत्येला प्रवृत्त्त करते ('कवठीचे वळण'), चंद्रप्रकाशात खून झालेली स्त्री चांदण्यात सर्व सजीवांना आपल्या विश्वात खेचून नेते ('चंद्राची सावली'), विमान अपघातात सापडून आपल्या आईवडीलांना मदतीची हाक देत वेदनेने तडफडत मरण पावलेली  छोटी मुलगी आख्खे गावच आपल्या ताब्यात घेते ('सैतान').... धारपांच्या अमानवी सृष्टीची अशी किती उदाहरणे सांगावीत!

'सैतान' वरून आठवले. मी 'सैतान' कादंबरी वाचली त्या दरम्यानच 'श्री' नावाच्या पाक्षीकात मी 'आँड्री रोज' नावाच्या सिनेमाची गोष्ट वाचली होती. 'सैतान' शी या गोष्टीचे साम्य पाहून मी अस्वस्थ झालो व तसे मी धारपांना कळवले. उत्तरादाखल मला लिहिलेल्या पत्रात ते लिहीतात " माझ्या 'सैतान' कादंबरीतील काही प्रसंगांसाठी मी फ्रँक डी फेलिटा यांच्या 'आँड्री रोज' या कादंबरीतील काही प्रसंग वापरले आहेत. तसेच जेम्स हर्बर्ट यांच्या 'सर्व्हायव्हर्स' या कादंबरीतील काही प्रसंगही वापरले आहेत. अपेक्षित परिणाम साधण्यासाठी लेखकाने काहीही साहित्य वापरावे या मताचा मी आहे. तुमच्या पत्राबद्दल आभार. केंव्हाही लिहीत जा. पत्राचे स्वागतच होईल"

एक वाचक म्हणून मला धारपांचा हा प्रामणिकपणा अतिशय भावणारा वाटतो.

धारपांच्या भयकथांचे रसग्रहण त्यांच्या समर्थ व अप्पा या जोडगोळीच्या उल्लेखाशिवाय पूर्णच   होऊ शकणार नाही. शेरलॉक होम्स व डॉ. वॅटसन यांच्या धर्तीवर उभी केलेली ही धारपांची पात्रे अगदी जिवंत, तुमच्याआमच्यातली आहेत. इतकी की समर्थांचा पत्ता मागणारी पत्रे धारपांना आजही येतात. दुष्ट आणि सुष्ट शक्तींच्या या सनतन मुकाबल्यात खचलेल्या, घाबरलेल्या, हतबल झालेल्या सामान्य माणसापाठी पहडासारखे उभे राहणारे गोरेपान, उंच, कृश असे समर्थ आणि त्यांचा सहायक, भक्त, मित्र अप्पा... सगळेच आयुष्याच्या किती जवळचे आणि किती आनंद देणारे!

आणि शेवटी धारपांच्या कथाकदंबऱ्यातून येणाऱ्या व्यक्तिरेखांविषयी. याबाबतीत आत्मस्तुतीचा दोष पत्करून मी धारपांना लिहिलेल्या पत्रातला काही भाग उधृत करतोः

तुमच्या लेखनातील 'ह्यूमन टच' मला अत्यंत लोभसवाणा वाटतो. माणसामाणसांमधील नाती, त्यांचे संबंध, त्यांच्या विविध भावनांचे पदर अतिशय साध्या शब्दांतून उलगडून दाखवण्याचे कसब तुमच्याकडे आहे. तुमच्या लिखाणातील काल्पनिक व्यक्ती आपल्या आसपास वावरणाऱ्यांपैकीच वाटतात. 'अरेच्च्या, हे तर आपले बापू', 'हे बोलणं अगदी आपल्या बाळीमावशीसारखं... '
' हा तर आपला सदामामा.. ' असं सारखं वाटत राहतं. लेखक म्हणून मला तुमचे सगळ्यात महत्वाचे   यश ते हे वाटते. संवेदनशील वाचक तुमच्या पात्रांमध्ये गुरफटून राहतो. तुमच्या पात्रांबरोबर त्याला आनंद होतो, दुःख होते. त्यांच्याबरोबर तो चिडतो, घाबरतोही! ती पात्रे जिथे गहिवरतात तिथे त्यालाही गहिवर येतो. लेखकाकडे आपली नस सोपवून खुशीने त्याच्या हातातील खेळणे बनून राहणे हा वाचकाचा फार मोठा आनंद आहे.

अशा आनंदाचे कित्येक क्षण, धारप तुम्ही आम्हाला दिले आहेत. आज लायब्ररीतून तुमचे 'पडछाया' हे पुस्तक आणले. त्यातली 'अनाहूत' ही कथा वाचायला घेतली. शेवटच्या दोन तीन वाक्यांशी थबकलो.

"तिला आशा होती की (त्या मुलांचे) ते क्षण सुखाचे गेले असतील. तिला आता त्यांचा राग वाटत नव्हता, भीती वाटत नव्हती - मनात एक अनिवार करुणा दाटून आली होती. शब्दांत मांडता न येणारी, पण डोळ्यात पाणी आणणारी"

मला वाटलं की शब्दांत मांडता न येण्यासारखी म्हणतानाच तुम्ही किती नेमक्या शब्दांत हे मांडलं आहे! नायिकेबरोबर माझ्याही मनात त्या मुलांविषयी करुणा होती, माझ्याही डोळ्यांच्या कडांना पाणी साचले होते!
मग वाटले, आपल्या जागेवर बसल्याबसल्या आपल्या नजरेसमोर असले गारूड उभे करणाऱ्या धारपांचे आभार मानले पाहिजेत, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे.
तेंव्हा थँक्स, धारप.
माणसाच्या आयुष्याला समृद्ध करणाऱ्या गोष्टींविषयी मी परवा एका पत्रात लिहीत होतो. आर्थर कॉनन डॉईलची तळपती भाषा, बिसमिल्लाखांच्या सनईचे हळवे सूर, तेंडुलकरचा अफलातून कव्हर ड्राइव्ह, अमिताभचा पहाडी अभिनय, लक्षमणच्या कुंचल्याचे प्रभावी फटके  अशी काहीशी ती यादी होती. तुमचे लिखाणही त्या यादीत घातले की ती यादी पूर्ण होईल, असे आज मला वाटते.      

संजोप राव


(प्रसिद्ध भयकथा आणि विज्ञानकथालेखक नारायण धारप (वय ८२) यांचे सोमवारी रात्री दुःखद निधन झाले. त्यांना श्रद्धांजली म्हणून हा मनोगतावर पूर्वी प्रकाशित झालेला लेख पुनःप्रकाशित केलेला आहे. : प्रशासक)