निर्धार

चीनचा दौरा संपत आलाय. उद्या घरी परतणार. या दौऱ्यात नेहमीप्रमाणे चावज्झौ होतेच. चावज्झाउ गेस्ट हॉटेल म्हणजेच ईंग बिंगवान ला उतरलो होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी साडे आठ ला नाश्त्याला मी आणि हुंग यान भेटणार होतो. सकाळी लवकरच जाग आली. आवरले आणि आवारात फिरायला निघालो. अचानक चार वर्षांपूर्वीच्या प्रसंगाची आठवण झाली.

मी असाच कामानिमित्त आलो होतो. बरोबर माझा एक दाक्षिणात्य सहकारी होता, आपण त्याला रामू म्हणूया. दिवसभराचे काम संपले. साडेसातच्या सुमारास हॉटेलवर परत आलो. सोडायला आलेल्या मंडळींनी विचारणा केली की आता इथेच जेवून झोपणार की जरा फिरायला जाऊया? वा! आणखी काये हवे? नाहीतरी आपण इतक्या लवकर जेवतही नाही आणि झोपतही नाही. चला तेवढीच पर्वणी भटकायची. त्या मंडळींना आम्ही जरा कपडे बदलून आलोच असे सांगत आम्ही आपापल्या खोलीवर परतलो.

मस्त पैकी तुषारस्नान केले, कपडे बदलले आणि बाहेर येणार इतक्यात दारावर थाप पडली. बघतो तर रामू! का रे बाबा? असा पिशाच्चा पाहिल्यागत का दिसतोस? रामूने घसा कुरवाळत विचारले, "तुझ्याकडे पाणी आहे का? " मी समोरच ठेवलेली बाटली त्याला देताच तो म्हणाला की त्याने त्याच्या खोलीतील शीतकपाटातील बाटली काढून घोट घेताच घसा जळला! म्हणून तो माझ्याकडे पाणी मागायला आला होता. मी फारसे लक्ष न देता फिस्स्कन हसलो. तो वैतागला. आता हसू नको तर काय? संध्याकाळ झाली की याच्या रक्तातील अल्कोहोल पातळी उतरते आणि तो सर्वप्रथम दोन घोट घेतो हे मला माहीत होते. शिवाय चीनला येताना वाटेत सिंगापूर विमानतळावर याने काळ्या फितीच्या बाटल्या घेताना मी पाहिला होता. तीन बाटल्यांवर एक थैला भेट असल्यामुळे साहेबांनी तीन घेतल्या होत्या. वर " अरे तू घेत नाहीस तर दोन माझ्या नावे व एक तुझ्या नावे नेता येतील "असेही त्याने ऐकवले होते. आता जाईपर्यंत त्या तीन ची एक तरी असेल की नाही शंकाच होती. तेव्हा साहेबांनी चुकून म्हणा वा सवयीने पाण्या ऐवजी तीच बाटली तोंडाला लावली असावी असे मी समजलो.

बाहेर आलो. मंडळी वाट पाहत होती. आम्ही निघालो. खाडीवर गेलो. रोषणाई बघितली. जुन्या गावात फेरफटका झाला. नवा पूल बघितला. मग जेवायला हे लोक आम्हाला पारंपरिक पदार्थ खायला खाडीकाठी असलेल्या अनेक छोट्या उपाहारगृहापैकी एकात घेऊन गेले. आंत शिरताच अनेक घंगाळांमध्ये नाना प्रकारचे समुद्री जीव ठेवलेले दिसले. हवा तो प्राणी निवडायचा आणि उपाहारगृहवाले तो शिजवून देतात असा प्रकार होता. नाना प्रकारचे पदार्थ मागवले गेले. चांगले दोन तास कार्यक्रम चालला होता. मी आपला उकडलेल्या भाज्या, भात व फळे खात होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी दहाला फोशानला निघायचे होते. म्हणजे आठला उठलो तरी चालण्यासारखे होते. कार्यक्रम संपवून अकरा वाजता परतलो. येताना पुन्हा रामूने घसा अजूनही जळत असल्याची तक्रार केली पण मी लक्ष दिले नाही. त्याला 'झोप म्हणजे बरे वाटेल" असा सल्ला देत मी माझ्या खोलीत येऊन आडवा झालो.

सकाळचे नऊ वाजले. नाश्ता झालाच होता. सामान बांधून आम्ही पैसे चुकते करायला स्वागतकक्षात आलो. चिंग वन व चालक युएन हजर होतेच. मी माझे देयक चुकते केले व पावती घेतली. रामूने आपले देयक देताना हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना पाण्याच्या बाटलीच्या रकमेकडे बोट दाखवत आक्षेप घेतला व पुन्हा वाद सुरू केला. दिलेले पाणी पिण्यालायक नव्हते तर पैसे कसले घेता? उलट तुम्हीच मला भरपाई द्या अशी हुज्जत त्याने सुरू केली. आता मीही दाखल झालो. अनेकदा असे होते की लबाड लोक पैसे द्यायचे टाळता यावे म्हणून काहीतरी सबबी सांगतात. हॉटेलवाल्यांना हा त्यातलाच प्रकार वाटला. त्यांनी साफ दुर्लक्ष केले. मात्र रामू ठामपणे म्हणाला की ते पाणी पिण्यासारखे नव्हते. निघायला उशीर होत होता. आता मी मध्ये पडलो. रामूने सांगितले की त्याच्यावर विश्वास नसेल तर हॉटेलने आपल्या कर्मचाऱ्यांना ती बाटली घेऊन येण्यास सांगावे; ती बाटली तशीच त्याच्या खोलीत होती. एका सेविकेने ती बाटली आणली व झाकण उघडून तोंडाजवळ नेताच उलटी आल्यासारखा चेहरा केला. एकूण प्रकार गंभीर होता. आता मीही गांभीर्याने दखल घेण्याचे ठरवले. जर ते पाणी खरंच दूषित असेल वा विषारी असेल तर अशा अनेक बाटल्या त्या हॉटेलातल्या प्रत्येक खोलीत ठेवल्या गेलेल्या असणार. माझ्या डोळ्यापुढे बागेत खेळणारी लहान मुले आली. जर कच्ची रम पिणारा मनुष्य घसा जळल्याची तक्रार करतो तर त्या लहानग्या जीवांचे काय?

हे सगळे हॉटेल कर्मचाऱ्यांना सांगताना भाषेचा प्रश्न होताच. वर ते लबाड लोक दुर्लक्ष करू पाहत होते. मी चिंग वन ला सगळा प्रकार सांगितला. ती त्यांना सांगू लागली पण एक मुलगी व तीही परक्या गावातली म्हणताना ते कटवायला बघत होते. एकूण प्रकार बरोबर नव्हता व कदाचित अनेकांच्या जीवाला अपाय होण्याची शक्यता होती, विशेषतः लहान मुलांना. माझ्या डोळ्यापुढे खेळणाऱ्या निष्पाप मुलांचे चेहरे दिसत होते. आता मी सूत्रे हाती घेतली व रामूला तोंड बंद ठेवायला व खास करून पैशाची भाषा बंद करायला सांगितले. प्रश्न पैशाचा नव्हता, आम्हाला काही फुकट लाटायचे नव्हते मात्र अपप्रकार होऊ द्यायचा नव्हता. ते आम्हाला व चिंग वनला दाद देत नाहीत असे दिसत होते. मग मी चिंग वनला सुचविले की आता आपल्या स्थानिक यजमानांना बोलावले पाहिजे. हे लोक व्यवस्थापक जागेवर नाहीये असे सांगत टाळत होते. आम्ही केनीस व चेनला बोलावले. अवघ्या पंधरा मिनिटात दोघांच्या गाड्या दारात उभ्या राहिल्या.

गोल गरगरीत केनीसने येताच सगळा प्रकार विचारला व मग हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना सर व्यवस्थापकाला बोलावायला सांगितले. त्यांनी तत्परतेने तो उपलब्ध नसल्याचे सांगितले. असे काय? तो काय; त्याचा बाप देखिल पाच मिनिटात हजर होईल असे ऐकवत आपले परिचय पत्र त्यांच्या तोंडापुढे नाचवले. ती आस्थापना त्या गावातली मोठे प्रस्थ होती. केनीसने दमात घेत सांगितले की त्या शहराचा पोलिस आयुक्त आणि तो एकाच कॉफी क्लबचे सदस्य आहेत व एकमेकांना उत्तम ओळखतात. मी केनीसला सांगितले की आम्हाला तर आता जावे लागेल, भारतात गेल्यावर मी चिनी दूतावासात याचा पाठपुरावा करीन पण समजा असे पाणी इतर खोल्यांत ठेवले गेले असले आणि कुणा लहान मुलाला बाधा झाली तर? निदान हे आपल्या डोळ्यापुढे घडत असताना मला जाणे बरोबर वाटले नाही. केनीसला माझे म्हणणे पटले. तो शांतपणे त्या मुजोर लोकांना म्हणाला, की तुम्ही असे ऐकणार नसाल तर काय करायचे ते त्याला माहीत आहे. आपला हस्तसंच बाहेरे काढत त्याने सांगितले की तो आता त्या शहराच्या पोलिस प्रमुखांना बोलावून हॉटेलला टाळे लावविणार आहे.

ही जालीम मात्रा लागू पडली. वास्तविक पाहता पोलिस कारवाईची धमकी आम्हीही दिली होती पण परकी माणसे हे करणे शक्य नाही, त्यांना निर्धारित वेळेवर जायचे आहे शिवाय परक्या गावात पोलिसांच्या भानगडीत कोण पडतोय असा सुज्ञ विचार त्यांनी केला होता. मात्र हा टग्या गावचांच शिवाय खरोखरीच पोलिसात त्याची ओळख असली तर महागात पडायचे या विचाराने आता ते हबकले. आता पर्यंत 'उपलब्ध नसलेला' सर व्यवस्थापक अचानक हजर झाला व त्याने नरमाईची भाषा सरू केली. आपण इथे बोलण्या ऐवजी कॉफी शॉपमध्ये जाऊ अशी विनंती त्याने केली. आता रोख बदलला होता. त्याने सर्व प्रथम आपल्या कर्मचाऱ्यांतर्फे झालेल्या वर्तनाची व बेजबाबदार पणाची माफी मागितली. मग त्याने मिटवायची भाषा सुरू केली. त्याने आम्हाला झाल्या प्रकाराबद्दल पैसे माफ करण्याचा देकार दिला. मी पावती दाखवत अभिमानाने सांगितले की आम्ही भारतीय कुणाचे काही फुकट घेत नसतो. "तुमचे हॉटेल उत्तम आहे, सेवा उत्तम आहे, त्याचे पैसे मी दिलेले आहेत". तो वरमला. मग त्याने विचारले की आता त्यांनी काय करावे असी अपेक्षा आही आमची? मी ठामपणे सांगितले की त्या दूषित पाण्याचा निकाल लागला पाहिजे. त्याने आम्हाला थोडा वेळ देण्याची विनंती केली व कॉफी मागवली'

दहा मिनिटात तो परतला व म्हणाला की सगळ्या खोल्यांमधले पाणी नव्या पुरवठ्याने बदलले गेले आहे, आम्ही आधीच्या गोळा केलेल्या बाटल्या बघू शकतो. शिवाय त्याने त्या पाणी पुरवणाऱ्या ठेकेदारालाही बोलावला असल्याचे सांगितले. त्याने पुन्हा एकदा झाल्या प्रकाराची माफी मागितली व पुन्हा असे होणार नाही अशी हमी दिली. माझे काम झाले होते. जर मला माहीत असतानाही मी दुर्लक्ष केले असते व न जाणो कुणाला अपाय झाला असता तर? अशी बोचणी मला कायम लागून राहिली असती. आम्हाला निघायला उशीर झालाच होता, पण एक कर्तव्य केल्याच्या समाधानात मी सहकाऱ्यांसह केनीस व चेनचे आभार मानून तिथून बाहेर पडलो व फोशानच्या मार्गाला लागलो.