.....आणि मी त्यांना स्विकारलं

"ह्या वेळेस आपल्याला 'आनंद' मध्ये काही उपक्रम घ्यायचे आहेत. रवी तू आणि अंजली ह्यावेळेस अक्षर सुधरव्ण्यासाठी काही टीप्स ह्या लहान मुलांना सांगा. " वैशाली म्हणाली. मी आणि अंजलीने मान डोलावली.

"वैशाली, अगं माझच अक्षर चांगलं नाही. मी त्यांना काय सांगणार. लहानपणी माझे सर म्हणायचे. अरे रवी तुझं अक्षर मोत्यांसारखं आहे. फक्त ते मोती कुटल्यासारखे वाटतात. " दोघीपणं हसल्या.

"चालेल रे. तू काही लिहू नकोस. फक्त कसं लिहायचं ते सांग. "

"ठिक आहे. मी फक्त प्रवचन देतो. "

"चालेल!! "

खराब अक्षरापेक्षा मला टेंशन वेगळ्याच गोष्टीचं होतं. 'आनंद' ही संस्था अनाथ एडसग्रस्त मुलांसाठी कार्य करणारी संस्था. मी आत पर्यंत एडसबाधीत व्यक्तींशी कधी भेटलो नव्हतो. डोक्यात अनेक प्रश्न येत होते. त्यांना भेटू की नको? त्यांनी वापरलेल्या वस्तूंना हात लावू की नको? ते जवळ आल्यावर मलापण एडस होईल का?

आतापर्यंत शबाना आझमीला अशा रुग्णांबरोबर दुरदर्शनवर बघितलं होतं. पण ते रूग्ण खरच एडसबाधीत असतात का? का पेज ३ चित्रपटात जसं विक्रम सलूजा खोट्या रूग्णांबरोबर चित्रीकरण करतो तसं असतं? मनाचा गोंधळ होत होता. नेट वर थोडी माहीती शोधली. एडस संसर्गजन्य रोग नाही ह्याची खात्री पटली. मनात तरी थोडी शंका येत होती. पण मग विचार केला, की आपल्याबरोबर अंजली असणार आहे. ती आधीपण जाऊन आली आहे. पण तरीही शक्य होईल तितकं मुलांच्या जवळ जायचं टाळायचं असं मी ठरवलं.

ठरलेल्या दिवशी अंजली आणि मी तिकडे गेलो. आम्ही तिथे गेलो तेंव्हा एका महाविद्यालयातली काही तरूण मुलं-मुली तिथल्या मुलांशी खेळत होती. आम्ही आत गेल्याबरोबर ते मुलं आमच्याकडे धावली.

"ताई!!!!!! हे बघ आम्ही काय केलं. " ती लहान मुलं हातातल्या होड्या आम्हाला दाखवत होती. ते तरूण त्यांना होड्या, विमानं अशा कागदी वस्तू बनवायचं शिकवतं होती.

" ए दादा!!! मला विमान बनवून देना!!! " एक छोटुकली मला म्हणाली. तिला मी नकार देउ नाही शकलो. मी तिला विमान बनवून दिलं.

"दादा, आता मला नांगराची होडी!! " एक छोटा मुलगा मला रेलून म्हणाला. एव्हाना मी पण त्यांना विमान, होड्या बन्वून देतोय म्हंटल्यावर ४-५ मुलांनी माझ्या भोवती कोंडाळं केलं होतं. पहीले माझी होडी-पहीले माझं विमान असं त्यांचं चाललेलं होतं. नांगराची होडी बनवणं मी पण विसरलो होतो. मग एका छोट्या मुलाची होडी हळूच उलगडून बघितली आणि मी त्यांची फर्माईश पुर्ण केली.

जवळच एक तरूणी एका ३-४ वर्षाच्या मुलीचा मोबाईल मध्ये फोटो घेत होती. ती मुलगी पण उजव्या हाताची तर्जनी गालावर ठेवून छान 'पोझ' देत होती. मला तिचं खुप कौतूक वाटलं. तिला कडेवर घेउन मी तिचा एक मुका घेतला. तिला नाव विचारलं. जराशी लाजत म्हणाली, "पुजा!!! ".

पुजाचं फोटो-सेशन परत सुरू झालं. थोड्यावेळाने आम्ही सर्व मुलांना एकत्र बसवलं. त्यांची मस्ती सुरूच होती. एकेकाला धरून बसवावं लागत होतं.

"हां तर मुलांनो आज आपण अक्षर कसं सुधरवायचं ते शिकूया! " मी सुरूवात केली.

"प्रत्येक अक्षर ठळक, वळणदार, एकसारखे काढायचे. सर्व अक्षरे वरच्या रेषेला टेकून काढायची. आणि सर्व एकाच उंचीची ठेवायची. " मी समजावून सांगायला लागलो.

" आता हा उतारा तुम्ही सगळ्यांनी छान अक्षरात लिहून काढायचा. हळूहळू लिहायचं, पण अक्षर छान काढायचं. " मुलांना काम देउन मी निवांत झालो.

लक्षात आलं की ठरवून सुद्धा आपल्याला ह्या मुलांपासून दूर राहता नाही आलं. त्यांना आपलसं कारावं की नाही हा निर्णय घेण्यापुर्वीच त्यांनी मला आपलसं केलं. असं म्हणतात की ज्यांचं ह्या जगात कोणी नसतं, त्यांचं सगळं जग आपलं असतं.

मी आणि अंजली मुलांच्या दिनक्रमाची माहीती घेऊ लागलो. तेंव्हा कळालं की ह्या एडसबाधीत मुलांना जर सकस आहार आणि व्यवस्थित औषधोपचार दिले तर ते सामान्य माणसाचे आयुष्य जगू शकतात. एडस हा जिवघेणा रोग नाही हे समजलं. थोडंसं पथ्य-पाणी संभाळलं तर तो आटोक्यात ठेवता येतो. अगदी मधुमेहा सारखा. पुर्ण बरा होत नाही, पण आहार नियंत्रण आणि उपचारांनी आटोक्यात ठेवता येतो.

बोलता -बोलता असं समजलं की एडसवाधीत असल्याने शाळेत ह्या मुलांना वेगळ बसवलं जातं. बाहेर मुलांचे पालक त्यांच्या मुलांना त्यांच्या पासून दुर रहायच्या सुचना देतात. आपल्याला अशी वागणूक का मिळते हे त्या बिचाऱ्या मुलांना समजत पण नसेल. एडस म्हणजे काय हे समजण्याची त्यांची बुद्धी पण नाही. पण तरीही समाजाने आपल्याला वाळीत टाकलंय ही जाणीव त्यांना अस्वस्थ करत असेल.

समजा ही मुलं कँसर किंवा हृदय-विकारानी आजारी असती तर? त्यांच्यासाठी ४ मायेचे हात अजून पुढे आले असते. पण फक्त एडस आहे म्हणून समाज ह्यांच्यापासून दूर राहतो. ह्या मुलांना मदत म्हणून लाखो रूपयांची नाही तर मायेची गरज आहे. त्यांना गरज आहे समाजाने त्यांना स्विकारण्याची. ६० वर्षापुर्वी जसं बाबा आमटेंनी समाजाने दुर लोटलेल्या कुष्टरोग्यांना आपलसं केलं, अगदी तसंच.

"झालं!!! आमचं लिहून झालं!!!! " मुलांनी गलका केला. बहुतेक मुलांनी छान अक्षरात उतारा लिहून काढला होता. काहींचं अक्षर तर मोत्यांपेक्षा सुंदर होतं. असं वाटलं की मोती घेउन हिरे उभे आहेत. मनाला एकच चुटपूट लागलेली होती आणि एकच इछछा होती की ह्या हिऱ्यांना कोणितरी पैलू पाडणारा भेटावा.

टिप

- हा सत्य अनुभव असून संस्था आणि व्यक्तींची नाव बदलण्यात आली आहेत. संस्थेची परवानगी मिळाली तर नाव जाहीर करण्यात येईल.

शब्दांकन - हेमंत मुळे