आम्ही लेकाचे
हल्ली चालवितो फक्त जिभा
आणि धारदार शब्दात देतो फक्त धमक्या
कमरेची तलवार उपसण्याच्या..
(ती तलवार जी कधीच गंजली आहे म्यानासहीत! )
आणि
मग घालून परीटघडीचे कपडे
जातो पाहण्या रक्ताचे सडे
पण आम्हाला नसते काळजी
शवांच्या संख्येची
धावांच्या संख्येकडे
लागले असतात आमचे कान
अन
कवडीमोल जगतांना मेलेल्यांच्या नावाने
जाहीर करतो लाख लाख.
आणि
ते गुंतले असतात
पुढच्या विध्वंसोत्सवाच्या तालमीत
चालली असते योजना
आगीची कारंज्याची
रक्ताच्या रांगोळ्याची
आर्त किंकाळ्यांच्या मैफलीची !
आणि आम्ही लेकाचे दोन चार मुंग्या मारून फिरतो
आमच्या गावच्या वेशींमधून
खांद्यावरून मागे वळून बघत बघत
पृथ्वी भयमुक्त केल्याची दवंडी पिटत
पृथ्वी भयमुक्त केल्याची दवंडी पिटत!
(जयन्ता५२)