काय करावे - या प्रेमामध्ये?(२)

स्न्हेहसम्मेलनाचा संधिविग्रह केल्यास तयार होणाऱ्या दुसऱ्या शब्दाचा पूर्णं विसर मला तुर्ततास पडला.

लक्षामध्ये राहिला तो फक्त "स्नेह" तोदेखील जडला समोर दिसणाऱ्या अजाण, गोंडस, निष्पाप, पुष्पाप्रमाणे नाजुक करकमल असणाऱ्या, निशेच्या आशीर्वादाने वर्ण प्राप्त झालेल्या, पवनसुताच्या पुष्टाशी लांबीमध्ये स्पर्धा करणाऱ्या घनदाट केशांची माळ मस्तकी धारण करणाऱ्या, कळीला आनंदाने उमळण्यास प्रोत्साहित करणारे, परिसराला प्रफुल्लित आणि रोग्याला आमयमुक्त करणारे स्मित,  गोड मधाने तुडुंब भरलेल्या मधमाश्याच्या पोळ्याप्रमाणे नरम रसभरित आणि  गुलाबाच्या पाकळीप्रमाणे नाजूक पद्मरागवर्णी आधरांवर धारण केलेल्या,   त्या सुकुमार पंकजनेत्र असलेल्या दुहितेवर.

मी बघत होतो आणि ती माझ्या पासून अनभिज्ञ माझ्याकडे दुर्लक्ष करून मैत्रिणीबरोबर समोर जात होती. दिवसामागून दिवस गेले. तिच्याशी बोलण्याची हिंमत होत नव्हती. वेळ निघून जात होती. पावसाळ्यामध्ये दिसणाऱ्या दिनकराप्रमाणे, अधून मधून ती दिसत होती.

शेवटल्या सेमची परीक्षा जवळ आली.  कॉलेज लाईफला आता निरोप देण्याची वेळ आली आहे, चार वर्षे सोबत राहिलेल्या आम्हा मित्रांना आता वेगळे व्हावे लागणार या जाणीवेने हॉस्टेल वर एक अजाण सुन्नतेचे वातावरण पसरले होते. तिच्या अधून मधून होणाऱ्या "दर्शनाने" मनाला शांती मिळत होती. पण, ती तात्पुर्तीच! कारण नंतर एकांतात ती जवळ नसल्याचे दुःख मला वेडे करत होते. पुरुरवाचे उर्वशीला शोधणे, शांतनुचे सत्यवती साठी मनातल्या मनात जळणे, ह्यांचा मला साक्षात्कार होत होता.

आणि कदाचित त्यांच्याप्रमाणेच माझ्यादेखील आयुष्यामध्ये दुःखाची पाचर दैवाने मारून ठेवली होती. मी कितीही इच्छा झाली तरी, तिच्याशी बोलू शकत नव्हतो. कदाचित पूर्वायुष्यात आलेले वाईट स्वानुभव, किंवा ती(किंबहुना मी) दुखावल्या जाण्याची भीती म्हणा, मनातले विचार शब्दरूप घेत नव्हते.  "रूपाला कुरूपतेची भीती तेव्हा निरुपच राहिलेले बरे!" असे माझे मन स्वतःला सांगून स्वतःची मनोमन समजूत काढत होते.   आजपर्यंत प्रेम आणि वासना यांना समानार्थी शब्द मानून त्यापासून दूर राहणाऱ्या मला या दोन शब्दामधील भिन्नता आता जाणवायला लागली होती.

परीक्षा केव्हा आली आणि केव्हा गेली कळलेच नाही. कॉलेज सोडून जाण्याचे दुःख सर्वांनाच होते. पण, मला त्यापेक्षाही जास्त काहीतरी मिळाले होते,  ते म्हणजे तिला न मिळवताच गमावून बसण्याच्या मरणयातना!

आता मी कुठल्यास्या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये चांगल्या पगाराची नोकरी करतोय. पण, जिच्यावर पैसे खर्च करण्याची इच्छा तीच सोबत नाहीये.
१५ ऑगस्टला सुट्टी असल्यामुळे फेरफटका म्हणून सांगलीला गेलो. हॉस्टेलाला भेट दिली. जुन्या आठ्वणींना उजाळा मिळाला. कॉलेजमध्ये फिरत असता अचानक ती दिसली. आणि काय नवल!! प्रथमच आम्हा दोघांच्याही नजरा एक झाल्या.

एकदा केव्हातरी, सर्फ करताना मनोगत नावाची वेबसाइट बघितली आणि मनातले विचार शब्दरूप जहाले.
                       आता परत एखाद्या दैवी चमत्काराची वाट बघतोय,
                              वाचकांना मनामध्ये विनंती करतोय,
                    माझ्यासाठी किमान एकदा तरी देवाला आळवणी घाला
                      माझे नाही तर कदाचित तुमचे तरी बोल तो ऐकेल
                             आणि या पुरुरवाला ही "उर्वशी" मिळेल.