जी X राव, पंत, साहेब...

नमस्कार,


महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये, विशेषतः टिव्हीमुळे, बर्‍याच सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये महनीय मराठी लोकांच्या नावांपुढे 'जी' हा आदरार्थी प्रत्यय लावायचे खूळ फार बोकाळले आहे.


१९८०पूर्वीच्या कोणत्याही मराठी लेखनात मराठी माणसाने मराठी माणसाच्या नावापुढे जी लावल्याचे मी तरी वाचलेले नाही. राव, साहेब, पंत असे आदरार्थी प्रत्यय मराठीत आहेत.


मराठीत जी हा प्रत्यय विशेषनामांत येतो. उदा. शिवाजी, रावजी इ. नावांपुढे आदरदर्शक म्हणून नाही.


पण अलीकडे हिंदीच्या मराठीवरच्या अतिरेकी प्रभावामुळे सर्रास 'जी'गिरी सुरू आहे. अगदी 'सुशीलकुमारजी शिंदे', 'सचिनजी', 'अशोकजी', 'विक्रमजी' अशा शुद्ध मराठी माणसांच्या नावांचेही हिंदीकरण होत असते. ज्या मराठी लोकांना हिंदी भाषेशी नित्य संपर्कामुळे ते चालवून घ्यावे लागते त्यांची गोष्ट निराळी. शिवाय हुज़रेगिरीमुळे अनेक आदरार्थी प्रत्यय लावण्याची स्पर्धा निराळी. (शरदचंद्ररावजीसाहेब पवारजी! - हे खरोखर वाचलेले, ऐकलेले आहे!)


मराठीच्या - विशेषतः हिंदीपुढे - नमते घेण्याच्या वृत्तीचे, आणि मराठी माणसांच्या मराठीपेक्षा दुसरी भाषा प्रिय असण्याच्या अनेक उदाहरणांपैकी हे एक उदाहरण आहे का?


आपला,


मराठा