विपश्यनेचे पॅकेज डील! (भाग - ३)

विपश्यनेच्या कोर्समध्ये दहा दिवस रोज जवळ जवळ दहा अकरा तास मांडी घालून बसल्यामुळे पाय, मान पाठ जबरदस्त दुखतात. कारण आपल्याला एवढी बसायची सवय नसते. कोर्स मध्ये सांगितलं गेलं की तुमच्या मनातल्या जुन्या उणीवा (निगेटिव्हिटीज) मनाच्या तळातून वरती येतायत आणि हे पाय, पाठ दुखणं वगैरे त्याचंच प्रत्यंतर (मॅनिफेस्टेशन) आहे. तत्त्वतः हे बरोबरही आहे. पण या पातळीपर्यंत कुठल्याही सामान्य साधकाला सहा दिवसात पोहोचणं शक्य आहे का? कोर्स करून घरी आल्यावर दोन वेळा रविवारी असंच दहा दहा तास मी बैठक मारून बघितली. ध्यानाशिवायच. त्याही वेळेस पाय, मान, पाठ वगैरे अगदी तशीच दुखली! म्हणजे ध्यानाशिवायच आमच्या निगेटिव्हीटीज वर आल्या वाटतं!!

बुद्ध तत्त्वज्ञानावरच्या किंवा इतर कुठल्याही विशिष्ट विषयांवरच्या पुस्तकांमध्ये सर्वसाधारणपणे पुस्तकाच्या शेवटी इतर संदर्भ ग्रंथांची, संस्थांची नावं, पत्ते दिलेले असतात. परंतु विपश्यना रिसर्च इंस्टिट्यूटच्या पुस्तकांमध्ये इतर संदर्भ ग्रंथांचा, पुस्तकांचा, संस्थांचा ओझरता सुद्धा उल्लेख नाही. दहा दिवसाच्या कोर्सच्या शेवटी पुस्तकांची आणि कॅसेटसची विक्री असते. यातही फक्त याच संस्थेची पुस्तकं आणि कॅसेटस ठेवल्या होत्या. बुद्धाचं समग्र जीवन किंवा समग्र तत्त्वज्ञान यावर एकही पुस्तक नव्हतं. माझं तर अस मत झालं की मुद्दामहून बुद्धाचं संपूर्ण तत्त्वज्ञान तुमच्या समोर येऊ दिलं जात नाही. ओशो रजनीशांच्या पुस्तक प्रदर्शनातसुद्धा फक्त त्यांचीच पुस्तकं ठेवली जातात. पण सर्वात महत्त्वाचा फरक असा आहे की ओशो - बुद्ध, झेन, पतंजली, भगवद गीता, संत वाङ्मय या सगळ्या तत्त्वज्ञानांचा स्वतःच्या दृष्टिकोनातून टीकार्थ सांगतात आणि यातून स्वतःचं असं संपूर्ण स्वतंत्र तत्त्वज्ञान तुमच्यापुढे ठेवतात. त्यामुळे तसं जाहीर करून ते फक्त स्वतःच्याच तत्त्वज्ञानाची पुस्तकं विक्रीला ठेवतात. परंतु गोएंकाजी बुद्धाचं तत्त्वज्ञान, त्यात आपलं काहीच नाही असं सांगत तुमच्या पुढे ठेवतात. हे सारं बुद्धानंच लिहून ठेवलंय, मी फक्त ते भारतात परत आणण्याचं काम केलंय असं म्हणतात. बुद्ध तत्त्वज्ञानावर शेकडो पुस्तकं लिहिली गेली आहेत. जर विपश्यना रिसर्च इंस्टिट्यूट धम्मचक्र फिरत राहावं म्हणून आणि जास्तीत जास्त लोकांना या तत्त्वज्ञानाचा लाभ मिळावा म्हणून काम करतीये तर अशी चांगली पुस्तकं साधकांना देण्यात या संस्थेला स्पर्धात्मक धोका वाटतो का?

विपश्यनेच्या संदर्भात माझ्या वाचनात दोन उत्कृष्ट पुस्तकं आली. (आणि सदर लेखातले बुद्ध तत्त्वज्ञानाचे बरेच संदर्भ या दोन पुस्तकांमधले आहेत. ) या पुस्तकांचे लेखक दोघंही वेगवेगळ्या विचार शाखांचे. पण माझ्या मते कुठली विचार शाखा योग्य किंवा कुठली अयोग्य असा विचार करण्यापेक्षा, जे आपल्याला भावतं ते तत्त्वज्ञान आत्मसात करणं इष्ट. या दोन पुस्तकांपैकी पहिलं होतं मिशेल जिन्सबर्ग या लेखकाचं. जिन्सबर्ग महायानवादी. त्याने विपश्यनेवर लिहिलेलं 'द फार शोअर' हे पुस्तक तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीतच आमूलाग्र बदल घडवतं. मी तर म्हणेन कामधंदा करणाऱ्या तुमच्या माझ्या सारख्यानं रोज वाचावं इतकं चांगलं हे पुस्तक आहे. दुसरं पुस्तक थिश न्हात हान यांचं. हान हे थेरवादाचे पुरस्कर्ते. त्यांची खरं तर बुद्ध तत्त्वज्ञानावर पुस्तकांची मालिकाच आहे. पण त्यातही 'ब्रीद! यू आर अलाइव्ह' हे सर्वात उत्कृष्ट. आनापान सती सूत्र अगदी सोप्या शब्दात त्यांनी सांगितलंय आणि अक्षरशः संपूर्ण मानसिक यशस्वितेची गुरुकिल्लीच जणू तुमच्या हातात दिलीय. पण दोन्ही लेखकांचं मोठेपण याच्यातच आहे की यांचा कुठलाही दावा नाही, दर्पोक्ती नाही, मार्केटिंग गिमिक्स नाहीत. अशा प्रकारच्या पुस्तकांच्या तुलनेत विपश्यना रिसर्च इन्स्टिट्यूटचा पोकळ पणा लक्षात आल्यावाचून राहत नाही.

दहा दिवसाचा विपश्यनेचा कोर्स मी पूर्ण केला, परंतु यातल्या बऱ्याच गोष्टी मनाला पटल्या नाहीत. याचा अर्थ अगदी हे बुद्ध तत्त्वज्ञान नाहीच असं मी म्हणत नाही परंतु एक गोष्ट अगदी वादातीत आहे की या संपूर्ण कोर्स मध्ये जसं चित्र उभं केलं जातं, त्यापेक्षा बुद्ध तत्त्वज्ञान कित्येक पटींनी समृद्ध आणि अथांग आहे. नीटशी विपश्यना शिकण्यासाठी दहा दिवस हा अगदीच तुटपुंजा वेळ आहे. त्यामुळे या दहा दिवसात आपण विपश्यना तंत्र शिकलो किंवा आपल्या मनाचं शुद्धीकरण केलं गेलं किंवा आपल्यातल्या जुन्या निगेटिव्हिटीज बाहेर पडायला लागल्या असा समज साधकांच्या मनात संमोहन शास्त्राचा वापर करून निर्माण केला जातो. खरं तर विपश्यना म्हणजे फक्त मनाचं निरीक्षण करणं आणि संमोहन म्हणजे मनाला दावणीला बांधणं. त्यामुळे या दोन विरुद्ध टोकाच्या गोष्टी एकत्र आणल्या नसत्या तर फार बरं झालं असतं. आनापान सती सूत्र हे बुद्धाच्या महत्त्वाच्या सूत्रांपैकी एक. आणि विपश्यनेसाठी तर ही पूर्वतयारी आवश्यक. यात सांगितलेल्या श्वासोच्छ्वासाच्या सोळा पद्धती किंवा मनसमृद्धीच्या आस्थापनांवर आधारित त्यांचं वर्गीकरण या साऱ्या गोष्टींचा विपश्यना कोर्स मध्ये ओझरता उल्लेखही येत नाही. आणखी एक गोष्ट म्हणजे वेदना आणि संवेदना याबाबतीत गुरुजी आणि स्वतः गौतम बुद्ध यांच्यात मतभिन्नता असावी असं वाटतं! अर्थात संमोहन या मतभिन्नतेवरही झाकण घालतं.

विपश्यनेचा हा कोर्स करावा की करू नये हा पूर्णपणे ज्याचा त्याचा प्रश्न आहे. या कोर्समध्ये बुवाबाजी, अंधश्रद्धा वगैरे असली फसवा फसवी काही नाही. पण हे म्हणणं म्हणजे या औषधाचा उपाय काहीही झाला नाही तरी साइड इफेक्ट काही नाही असं म्हणण्यासारखं आहे. प्रश्न साइड इफेक्टचा नसतो तर मूळ इफेक्टचा असतो. आणि इथे मूळ इफेक्ट नक्की काहीच नाही. हा लेख लिहिण्याचा उद्देश एवढाच आहे की गोएंकाजींच्या विपश्यना कोर्समध्ये शिकवलं जाणारं तत्त्वज्ञान हे म्हणजे एक 'पॅकेज ऑफ इंस्टंट विपश्यना मिक्स' आहे हे तुमच्या लक्षात आणून द्यावं. तदनंतरही खऱ्या आणि रसभरित बुद्ध तत्त्वज्ञानाची गोडी चाखायची का कॅंड फूड खायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.

- समाप्त