घायाळ रुसण्याने तुझ्या मी, हसतेस तीही जीवघेणी
मिटतेस तेव्हा जीव जातो, खुलतेस तीही जीवघेणी
अविचल उभी असतेस केव्हा बुरुजापरी शालीनतेच्या
पदरापरी वाऱ्यावरीच्या ढळतेस तीही जीवघेणी
डसते मला आलिंगनीही अंतर तुझे राखून असणे
सोडून संकोचास जेव्हा भिडतेस तीही जीवघेणी
गुंता असा ज्यातून सुटका व्हावी, न व्हावी हे कळेना
छळतेस कोडे होउनी तू, सुटतेस तीही जीवघेणी
तू मैफिलीची ज्योत चंचल की आग तू वेड्या वयाची
जळतेस आम्हा जाळण्या अन् विझतेस तीही जीवघेणी
असता, चकोरा चांदणे तू, नसता रुते खंजीर हृदयी
संजीवनी जी पौर्णिमेला अवसेस तीही जीवघेणी
आताच झालो विद्ध पुरता, तू आठही ना गाठलेले
सोळा कसे शृंगार सोसू, सजतेस तीही जीवघेणी
घेतेस तू आकार मोहक, कौशल्य हे पाखरबटांचे
सुंदर परी पाषाणहृदयी, घडतेस तीही जीवघेणी