आले वडी

  • किसलेले आले २ वाट्या
  • साखर २ वाट्या
  • रिकोटा चीझ (स्निग्धांश ९ग्रॅ) पाऊण वाटी
  • साजूक तूप २ चमचे
१ तास
२ जण

एका पातेल्यात साखर व किसलेले आले एकत्र एकसारखे करून घ्या. नंतर मध्यम आचेवर कढई ठेवा. ती तापली की त्यात थोडे साजूक तूप घाला व एकत्रित केलेले आले व साखर यांचे मिश्रणही घाला. हळूहळू साखर वितळायला लागेल. आता आच थोडी वाढवा. काही वेळाने साखर वितळून हे मिश्रण उकळायला लागेल. हे मिश्रण शिजत आले की रिकोटा चीझ घाला व कालथ्याने एकसारखे ढवळा. काही वेळाने हे सर्व मिश्रण शिजून कोरडे पडायला लागेल व गोळा बनायला लागेल. अधूनमधून कालथ्याने ढवळत रहा.  थोड्यावेळाने गॅस बंद करून हे मिश्रण थोडे कालथ्याने घोटून घ्या व नंतर लगेच एका ताटलीत काढा. या ताटलीला आधी थोडा तूपाचा हात लावून घ्यावा. ताटलीत मिश्रण ओतल्या ओतल्या त्यावर तूपाचा हात लावलेला एक पसरट प्लॅस्टीकचा कागद ठेवून सर्वबाजूने एकसारखे थापून घ्या. नंतर गरम असतानाच कालथ्याने  वड्या कापा. हे मिश्रण खूप गार झाले की वड्या काढून डब्यात ठेवा.

थंडीसाठी उपयुक्त!

स्वानुभव