.....................................
एकदा कविताच माझी...!
.....................................
पौर्णिमेच्या चांदण्याचा भास तू होऊन ये!
रातराणीच्या फुलाचा श्वास तू होऊन ये!
जाणिवेला जाणवेना, आण ते काहीतरी...
जे मलासुद्धा कळेना, जाण ते काहीतरी...
एकदा स्वप्नातला सहवास तू होऊन ये!
गायचे आहे तरीही सूर केव्हाचे मुके...
सारखे माझ्या मनी दाटे निराशेचे धुके...
तान ये होऊन माझी... आस तू होऊन ये!
मुक्त, अस्ताव्यस्त हे माझे जिणे, तू छंद हो...
जा नवे सुचवून तू काही... नवा आनंद हो...
दुःख संपावे, असा विश्वास तू होऊन ये!
ये, सुखाला जन्मण्याआधी तुझे तू अंग दे...
ये, समाधानास माझ्या गर्द हिरवा रंग दे...
जो ऋतूंचाही ऋतू मधुमास... तू होऊन ये!
ये, अशी काही क्षणांसाठीच तू येऊन जा...
शब्द मी आहे रिता, मज अर्थ तू देऊन जा...
एकदा कविताच माझी खास तू होऊन ये!
- प्रदीप कुलकर्णी
.....................................
रचनाकाल ः २६ नोव्हेंबर २००८
.....................................