लंघन....

लंघन....आयुर्वेदातील एक महत्त्वपूर्ण चिकीत्सा. माझी बहीण आयुर्वेदीक वैद्य आहे. तिला काही झाले आहे म्हणून सल्ला विचारला की ती पहिली गोष्ट सांगते की लंघन कर. आम्ही जरा वैतागतो काय हे लंघन सांगते. पण आजकाल जरा तिचे ऍकतो लंघन करतो छान वाटते हो. पूर्वीच्या काळचे उपासतापास म्हणजे नुसता देवदेव नव्हता, तर निरोगी आयुष्याचे ते नियोजन असायचे. त्यामुळे पुर्वीचे लोक दूध, तूप, लोणी, गोडधोड खाऊनही निरोगी होते. कोलेस्टोरॉल, मधुमेह, रक्तदाब, असले रोग त्यांच्या जवळपासही फिरकत नव्हते.

आता म्हणजे आपण इतके 'कॅलरी' बाबतीत उहापोह करत राहतो, त्यासंबंधीचे अगाध ज्ञान मिळवत राहतो पण प्रत्येकाला  वाढते वजन, कोलेस्टोरॉल हे आणि असे अनेक आजार जगू देत नाही. पूर्वीचे लोक भोळेपणाने देवाच्या धाकाने उपासतापास करायचे आणि पर्यायाने निरोगी राहायचे.

माझी बहीण बहीण एकच सल्ला देते.... लंघन आणि भरपूर झोप. ती स्वतः लहानपणापासून आजारी पडली की दोन दोन दिवस फक्त झोपते. खाणे नाही, पिणे नाही. आईला औषध द्यायचे असेल तरी ते शक्य व्हायचे नाही कारण ती मेल्यासारखी झोपायची. पण दोन दिवसांनी खणखणीत बरी. तीच आता डॉक्टर आहे. आणि अजूनही ती तेच करते. आणि सगळ्यांनाही तेच सांगते. अनुभव आणि अभ्यास दोन्ही आहे. आता आम्हीही तेच करतो. लंघन जरा जडच जाते. पण प्रयत्न करतो. झोपेसाठी काही प्रयत्न करावे लागत नाहीत. ती लगेच येते. पण खरंच हो 'लंघन' उपयोगी पडते.

बघा तुम्हीही प्रयत्न करून. आणि कसे वाटते ते कळवा. तुमचा काही वेगळा अनुभव असेल तर तो ही मनोगतींबरोबर वाटा.