गुळाची पोळी

  • गुळाचे सारण :
  • १ किलो गूळ (चिक्कीचा नको. )
  • १५० ग्रॅम तीळ
  • २०० ग्रॅम (साधारण १ वाटी) डाळीचे पीठ (बेसन)
  • ३/४ वाटी तेल
  • वेलदोडा पूड
  • कव्हर चे साहित्य :
  • ४ वाट्या कणीक
  • १/२ वाटी तेल
  • पाणी
  • पोळीला लावण्यासाठी साधारण १ वाटी तांदुळाची पीठी
दीड तास
३५ ते ४० पोळ्या

गूळ:

३/४ वाटी तेलात बेसन छान खमंग भाजून घ्या.

गूळ किसून घ्या. (चिरू नये.)

तीळ भाजून त्याचे कूट करा. १/४ चमचा वेलदोड्याची पूड घ्या.

आता हे सर्व एकत्र करून गूळ चांगला मळून किंवा कुटून घ्या.

कव्हर :

४ वाट्या कणीक १/२ वाटी तेल घालून पुरीच्या कणकेसारखे घट्ट मळून घ्या.

पोळी लाटताना :

२ पाऱ्या कणकेच्या आणि १ पारी गुळाची अश्या सारख्या पाऱ्या करा. २ कणकेच्या पाऱ्यांमध्ये गुळाची पारी घालून कडेने थोडी दाबून घ्या. कडा पूर्ण बंद करू नका. दोन्ही बाजूने  तांदुळाची पिठी लावून पातळ लाटून घ्या. पोळी मधून लाटावी म्हणजे गूळ कडेपर्यंत पसरतो.  पोळी पोळपाटाला चिकटू देऊ नये. त्यासाठी गरजेप्रमाणे तांदुळाची पिठी लावा. (पण गुळाची पोळी जास्त पिठी लावून पांढरी करून ती पोळपाटावर फिरवायची अपेक्षा ठेवू नये.)  पोळी पातळ लाटा नाहीतर ती नंतर मऊ पडेल.

पोळी भाजण्यासाठी शक्यतो बिडाचा/लोखंडाचा सपाट तवा व उलथणे वापरावे. गूळ तव्याला लागू नये यासाठी तव्याला किंचितसा  चुना लावावा. (काहीजण यासाठी तेल पण वापरतात.)

पोळी तव्यावर टाकली की, एका बाजूने व्यवस्थित भाजून घ्या. मग उलथण्याने उलटा व दुसऱ्या बाजूने भाजून घ्या. पोळी तव्यावरून काढली की, वर्तमानपत्रावर काढून ठेवा. पोळी उभी करून ठेवायची गरज नाही. पोळ्या एका वर एक ठेवू नयेत. नाहीतर त्या चिकटतील. पोळ्या जश्या जश्या गार होतील तश्या एका वर एक ठेवायला हरकत नाही.

पोळी भाजताना फुटली म्हणजेच जर गूळ बाहेर आला तर थेंबभर तेल सोडावे किंवा बाहेर आलेला गूळ उलथण्याने काढून घ्यावा. काळजी घेऊनही पोळी तव्याला चिकटली किंवा गूळ तव्याला लागलाच तर गॅस बारीक करून तवा उलथण्याने खरवडून स्वच्छ करून घ्यावा. मग पुढची पोळी घालावी. पोळ्या करताना गॅस मध्यम आचेवरच ठेवावा.

गुळाची पोळी नेहमी कणीदार साजूक तुपाबरोबर खावी. म्हणजे उष्ण होणार नाही व बाधणार नाही.

गेल्या संक्रांतीला पहिल्याच झटक्यात पोळ्या जमल्यामुळे सर्वांना देता आल्या आणि अमेरिकेत संक्रांत साजरी केली. या वर्षी तुम्ही पण बघा करून. लग्नाच्या आधी खायचं काम केलं, आता बनावयाचं करूया.

तिळगूळ घ्या, गोड बोला.

आई, सासूबाई, आजी, आजी, आजी(आजेसासूबाई).