घराच्या फाटकाजवळच मी एक कृष्णकमळ लावले होते. तेव्हाच कोणीतरी शेरा मारला होता की कृष्णकमळाजवळ साप येतात असा. पण एक तर मला त्या फुलांचा सुगंध मनापासून आवडतो अन भर वस्तीत कुठले आले साप बीप? असे म्हणून मी आपले दुर्लक्षच केले होते. तसे नाही म्हणायला पाठीमागच्या शाळेच्या आवारात एक दोन वेळा एक मोठा साप दिसला होता पण किती तरी वेळा सांगूनही त्या शाळेच्या मुख्याद्यापकांनी दुर्लक्षच केले होते अन शिवाय तिथे एक मूंगूसही दोन चारदा दिसले होते. कशी छान गुण्यागोविंदाने नांदणारी जोडी होती तिथे. पण तो साप कधी इकडे तिकडे भटकलेला पाहिला नव्हता, त्यामुळे मी ही जास्त विचार केला नव्हता त्या बाबतीत.
पण या वेळी स्टाफमधली एक मुलगी धावत सांगत आली की बागेत साप आहे. दारापाशी एक छोटंसं कमळांसाठी तळे किंवा हौद बांधून घेतला होता, त्यात तो पाणी पितोय असे म्हणणे होते तिचे! साप पाणी पितात की नाही कोण जाणे! पण ऑफिसमधली एक एक जबाबदार व्यक्तिमत्वं बाहेर गेलेली होती, त्यामुळे मलाच काहीतरी करणे भाग होते. शिवाय ऑफिसच्या वर राहणारी मीच, त्यामुळे बघायला गेले आधी कुठे काय साप आहे तो. मला काही तो दिसला नाही, पण सगळे अगदी छातीठोकपणे सांगत होते की तो आहेच... एवढा एवढा लांब आहे, खूप मोठठा आहे इत्यादी इत्यादी. आता काय करावे बरे या विचारात पडले असताना वरच्या बाल्कनीतून किंचाळ्या सुरू झाल्या... माझ्या मुलीच्या.. " आई ग! साप असेल तर मी आता बाहेर कशी जाऊ? माझा संध्याकाळचा क्लास बुडेल ना आता! " वगैरे वगैरे. खरे तर तिची परीक्षा चालू होती पण संधीचा फायदा घेत तिने मजा बघायला बाल्कनीतच ठाण मांडले. "गप्प ग! इतका वेळ तो राहणार नाहीये इथे.. तुझे ओरडणे आधी बंद कर बघू.. " असे म्हणून मी तिला गप्प केले खरे पण माझ्याही मनात शंकेचे काहूर उठले. आता हा गेलाच नाही इथून, तर मग संध्याकाळी काय? ऑफिस तर बंद होईल, एक एक जण घरी निघून जातील, मग फक्त मी, मुले अन बाबा! बाहेर कसे जाणार? त्यात मुलगा रात्री क्लासहून येणार, कुठे पाय बिय पडला तर? बाप रे!! आता काय करू? असा विचार करत सल्ल्यासाठी मुंबईला कामानिमित्त गेलेल्या नवऱ्याला मी फोन केला, " असे असे झालेय. आता काय करू मी? " म्हणून. नवरा हुशार आहे हे माहीत होते, पण आपत्कालीन व्यवस्थापनात तो इतका निपुण असेल याची मला आधी कल्पना नव्हती. त्याने मला अगदी शांतपणे सांगितले, " आपल्या फँमिली डॉक्टरला फोन कर. " " कशाला ते? " " अग, म्हणजे तो सापाच्या विषावरचा उतारा ( anti venom ) का काय ते आणून ठेवेल ना. " भले! म्हणजे आलेला साप आमच्यापैकी कोणाला ना कोणाला तरी चावणारच आहे, असा त्याचा ठाम विश्वास दिसला. आता नवऱ्याकडूनही काही मदत होण्यासारखी नाही हे मी समजून चुकले. अचानक आठवले, आपल्या मागे शाळेत साप दिसला होता तेव्हा कोणीतरी सर्पमित्राचा नंबर दिला होता. " लावा रे फोन. " अशी ऑफिसमध्ये ऑर्डर सोडली. पण काही केल्या त्याला फोन लागेना. पलिकडेच एक पोलिस स्टेशन होते, तिथे मी चक्क एकाला पिटाळले. म्हटले, पोलिसांनी काहीतरी तरी मदत नको का करायला सामान्य जनतेला? " येतील का तिथले कोणी की हसतील उगीच? उडवून लावतील का? " जाणाऱ्याने शंभर प्रश्न उभे केले. " अरे, जा तर खरा, बोलावून तर बघ, " असे म्हणून त्याला पाठवलेच.
"शेजारी विचारू या का? " पण एका बाजूला वृदध आजी आजोआजोबाच राहत असत. ते काय मदत करणार? दुसऱ्या बाजूचा शेजारी नवीनच आलेला होता. फारशी ओळख नव्हती, पण त्यालाही एक लहान मूल होते. तेव्हा भावनिक आवाहन करून त्याला मदतीला बोलावू या, असा विचार केला अन गेले त्याच्याकडे. तो बिचारा मात्र पटकन आला मदतीला. " थांबा, माझ्या साईटवरून माणसे बोलावतो" म्हणाला. व्यवसायाने बिल्डर होता तो. " माझ्या साईटवरच्या माणसांना सवय आहे " म्हणाला. मला ऐकून अगदी सुटल्यासारखे वाटले. त्याच्याकडचे एक दोन लोक आलेही पटकन. त्यांनी मारे एक गोणते, एक काठी वगैरे बरोबर आणली होती. अर्धा पाऊण तास प्रयत्न करूनही शेवटी काही साध्य झाले नाही. साप तिथल्याच एका बिळात, बहुधा उंदीरमामांनी केलेल्या, लपून बसला असावा. पण तो तिथेच आहे याची मात्र खात्री देत होते ते.
थोडया वेळाने ते म्हणू लागले साप तुमच्या पाण्याच्या मीटरकडे जाऊन बसला आहे. हे पाण्याचे मीटर एका खडडयात होते अन वरून एक सीमेंट टाईल झाकलेली होती. तेवढयात शेजाऱ्याने मला विचारले, " तुमच्याकडे रॉकेल मिळेल का हो थोडे? " " रॉकेल आणि कशाला ते? " " नाही म्हणजे इथे थोडे ओतून पेटवून देऊ या, साप लगेच गुदमरून येईल बाहेर किंवा मरेल तरी. " मला एकदम कसेतरीच वाटले. एखाद्या प्राण्याला आपल्या घरात असे जिवंत जाळून मारणे बिरणे म्हणजे... छे! छे! माझ्या पचनी पडण्यासारखे नव्हते. पण आता यावर आपली मते द्यावीत एकदम स्वतंत्र बाणा वगैरे दाखवून तर मदतीला आलेला हा शेजारी पण जायचा पळून, म्हणून त्याला " बघते घरात " असे म्हणून वर आले. बाबांनाही ही कल्पना मान्य नव्हतीच. उगीच इकडे तिकडे केल्यावर आठवले, की आपल्याकडे रॉकेल नाहीच आहे. हुश्श! खाली येऊन शक्य तेवढा चेहेरा सरळ ठेऊन शेजाऱ्याला सांगून टाकले, "नाही हो घरी रॉकेल! " त्याच्याकडेही नव्हतेच, त्यामुळे सापासकट आम्ही सगळेच सुटलो.
या आधी दोन वेळा आमच्याकडे दोन कुत्री येऊन मेली होती. अर्थात त्यात आमचा काही हात नव्हता. रस्त्यावरची मरायला टेकलेली कुत्री येऊन सावलीत झोपत. हाकलूनही जात नसत. पण दोन्ही वेळा त्यांनी प्राण सोडल्यावर मात्र आम्हाला ते फार अवघड झाले होते. एक तर म्युनिसीपालिटीची माणसे बोलावूनही येत नसत अन तो लग्गेच सुटणारा वास. छे.. फारच अवघड झाले होते ते. असाच एकदा गच्चीत एक पक्षी मरून पडला होता. पण पक्ष्याची विल्हेवाट लावणे सोपे होते. या जागेतच काहीतरी आहे की काय असे वाटू लागले होते. अन वरून आता हा साप!
एवढयात पोलिस स्टेशनवरचा इन्स्पेक्टर एक शिपाई बरोबर घेऊन दाखल झाला. त्याला सगळा प्रकार सांगताच तो म्हणाला, " सगळे ठीक आहे हो, पण आम्हाला नाही येत ना साप बीप पकडता " या वेळेपर्यंत एकंदरीत काहीतरी गडबड चालू आहे हे कळून रस्त्यावरून येणारी जाणारी माणसे डोकावू लागली होती. गर्दी जमू लागली होती. अनाहूत सल्ले देण्याचे कार्यही अविरत चालू झाले होते. " मला जे येते आहे तेवढे काम मी करतो " असे म्हणत त्याने निदान ती गर्दी हटवायचे काम तरी केले, अन मग खडा पारश्यासारखा तो आपला तिथेच ठिय्या देऊन उभा राहिला. शेजाऱ्याची इथून तिथे धावपळ अन फोन चालूच होते. सर्पमित्रालाही फोनचा आमचा प्रयत्न चालू होताच.
मग एकदाचा त्या सर्पमित्राचा कसाबसा फोन लागला. तो येतो म्हणाला, पण तो खूप लांब होता. निदान एक अर्धा तास तरी लागेल म्हणाला. तोपर्यंत त्या सापावर लक्ष ठेवा म्हणाला. त्याला हलू देऊ नका. कुठे जातोय ते बघत राहा, असा आदेश त्याने फर्मावला. आता हे कसे करायचे होते कोणास ठाऊक. हा आदेश त्या पोलिसाला अन शेजाऱ्याला सांगताच ते म्हणाले, हे तर आम्ही आधीपासूनच करतो आहोत की.. तो बघा त्या पानाआड डोळा दिसतो आहे ना तो त्या सापाचाच आहे. मला काही डोळा बिळा दिसला नाही पण ठीक म्हणून विश्वास ठेऊन टाकला. एवढे कर्तव्य बजावत उन्हात उभे होते ना ते!
अखेर एकदाचा तो सर्पमित्र आला. बरोबर पिशवी, साप पकडायचे त्याचे आयुध सगळा सरंजाम होता. तो आल्यावर या लोकांनी त्याला तो डोळा दाखवला अन काय गंमत, तो निघाला चक्क एका बेडकाचा! सापाने बहुधा त्याला अर्धमृत करून सोडून दिले असावे, अन स्वतः दुसरे काही खाद्य खाऊन जरा सुस्तावून पडला असावा. अन्यथा एवढा वेळ तो एका ठिकाणी राहणे शक्य नव्हते. म्हणजे तो पोलिस अन आमचा शेजारी एवढा वेळ एवढया उन्हात एका बेडकावर लक्ष ठेऊन उभे राहिले होते. मी आपले हसू गपकन गिळून टाकले.
सर्पमित्राने मात्र अगदी १५ ते २० मिनिटांतच तो साप पकडला अन आम्हा सगळ्यांना हुश्श झाले. अतिशय मोठा म्हणजे जवळ जवळ १० ते १२ फूट अन पिवळाधमक साप होता तो. मात्र त्याच्या मते साप पकडायला लागलेला वेळ खूप जास्त होता. अन याला कारण आमची बाग. " किती कचरा करून ठेवला आहे इथे! किती ही अडचण! आधी ती झाडे कमी करा, सगळी उंदीर घुशींनी बिळे करून ठेवली आहेत. या सापांना आयते लपून बसायला मिळते मग! एवढीशी तर जागा, कशाला हवीत एवढी झाडे बिडे? इथे सीमेंटींग करून घ्या ताई तुम्ही! असे नका ठेऊ हे सगळे! " घ्या! म्हणजे इथे लोक झाडे लावा, पर्यावरण सांभाळा, हिरवे गार वातावरण निर्माण करा" म्हणून घोशा लावतात, तर याने एकदम उलटीच तलवार चालवली. मला अन माझ्या शेजाऱ्याला उभे करून त्याने विषारी, बिनविषारी साप, त्यांच्या जाती, सापांच्या सवयी इत्यादी बरेच बौद्धिक घेतले. सगळे कळल्यासारखे वाटले खरे त्या वेळी परंतु नंतर मात्र पाटी कोरीच राहिल्याचे जाणवले. परत जर साप निघाला तर तशीच अन तेवढीच गाळण उडेल याची १०० टक्के खात्री. सवयीशिवाय नुसता साप बघून विषारी की बिनविषारी कसे समजायचे? कोणत्याही गोष्टीत सराव हा हवाच ना? असो, फोन नंबर तर होताच त्या बापडयाचा आमच्याकडे.
आमच्याकडे निघालेला साप मात्र बीन विषारी पिवळी जर्द धामण होती म्हणे. त्याने अगदी परत पिशवीतून काढून नीट दाखवली. सपकन त्या सापाने त्याच्या दंडाभोवती वेढा घातला. दुपारच्या कलत्या उन्हात ते एकदम सोनेरी वाकी घातल्यासारखे दिसले खरे. एक तर त्याच्या अंगावर अतिशय सुरेख नक्षी अन वरून ती विलक्षण सुंदर सोनेरी झगझगीत कांती! मी वाकीची उपमा चक्क बोलून दाखवली अन शेजाऱ्याच्या डोळ्यात, 'प्रसंग काय अन या बाईला आपले दागिनेच सुचताहेत' हे भावही नीट वाचले. "आता तुम्ही या सापाचे काय करणार? " या पृच्छेला त्याने लांब जंगलात नेऊन सोडून देणार असे सांगितल्यावर मात्र मनाला समाधान वाटले खरे.
नंतर घडल्या प्रकाराचे थोडे हसूच आले, पण त्या वेळी मात्र घाबरायला झाले होते हे ही खरेच.
इति सर्पाख्यान सुफळ संपूर्ण!