स्तुती मंत्र

'स्तुती करावी परमेश्वराची, करू नये कधीही व्यर्थ नराची"

अनेक सुभाषिते आपण सतत ऐकत असातो. सारीच काही अनुकरणीय असतील असे नव्हे. वरील सुभाषित असेच अननुकरणीय! यातील पुर्वार्धासंदर्भात - परामेश्वराची करण्याबाबत - मी  बोलत नाही आहे.   माझा प्रश्न ''नरा''ची स्तुती करण्यासंबंधी आहे.

माझे म्हणणे, की जिथे जिथे स्तुती करता येईल तिथे तिथे ती अवश्य करावी! असे केल्याने, ते काम करणाऱ्याची कळी खुलते. आपण केलेल्या कामाचे चीज होते आहे हे पाहून तो खूष होतो. आपली कोणी तरी दखल घेत आहे, ही भावनाच मोठी सुखद असते. त्याच्या हातून अधिक चांगली कामगिरी होत राहते. बूट पॉलिशवाल्याने बूट छान चमकवून दिले, रिक्षावाल्याने नेमक्या ठिकाणी वेळेत आणून सोडले, तर तसे त्याला जरुर सांगा!

एखादे पुस्स्तक आवडले तर, लेखकाला चार ओळींचे- पन्नास पैशांचे कार्ड टाकलेत तर? अनुभवा तरी त्या लेखकाचा प्रतिसाद!

घरातील पत्नीला, सुनेला आज भाजीत मीठ कमी झाल्याचे आपण सांगतो; परंतु कढी चांगली झाल्याचे का सांगत नाही? ते सांगितल्यावर काय होते पाहा बरे! एरवी अन्य कोणत्या तरी कारणावरून होणारी घरातील चिडचिड आता संपलेली आढळेल!

दुसऱ्याला प्रसन्न करता करता आपले ही मन प्रसन्न होते. किंबहुना आनंदाच्या नव्या लाटांची निर्मिती आपोआप होत राहते. एक सकारात्मक विचार फुलत राहतो. पसरत जातो. जग कटू अनुभवाने भरलेले / भारलेले आहे, हे खरेच! पण त्यात मधु-घट ही ठिकठिकाणी आहेत.  ते सतत कसे भरलेले राहतील हे पाहणे आपलेच काम नाही का?  

स्तुती करायची म्हणजे खोटी स्तुती करायची असे नव्हे! तो तोंडपुजे पणा होईल. आपण खोटी स्तुती करत आहात हे ऐकणाऱ्याला ही चटकन उमगते. ते त्याला नक्कीच आवडणार नाही. मी खोटी स्तुती करायला सांगत नाही.   पण स्तुती करण्यायोग्य गोष्टी शोधायला मात्र हव्यात. त्या सापडतात ही! परवाच मी एका उपाहारगृहात गेलो होतो. तेथे घेतलेला खाद्य पदार्थ तितकासा चांगला नव्हता. पण तेथे लावलेली गाणी मस्त होती. खाद्य पदार्थाची मी स्तुती केली नाही; त्या जुन्या हिंदी गाण्यांच्या निवडीची केली!

ही स्तुती निरपेक्ष हवी. त्यातून काही तात्कालिक लाभाची अपेक्षा असू नये. नाही तर त्यातील मजा गेलीच म्हणून समजा!

लक्षात असू द्या, स्तुती (केलेल्या कामाची पोच) ही एक सकारात्मक कार्य प्रेरणा आहे. आपण घरी असा, दारी असा, की एखाद्या कार्यालयात काम करीत असा, चांगले कार्य-परिणाम साधायचे असतील तर या 'स्तुती-मंत्रा'चा वापर कधी ही विसरू नका!