ऒस्करच्या निमित्तानेः बेंजामीन बटन आणि साहित्याचं चित्रपटीकरण

सालाबादप्रमाणे ऒस्कर नॉमिनेशन्स डिक्लेअर झाले आणि स्लमडॉग मुळे इथे चर्चेला वेगळेच उधाण आले. नेहमीप्रमाणे स्पर्धेतले इतर चित्रपट पाहण्याची उत्सुकता होतीच. त्यामुळे "द क्युरियस केस ऒफ बेंजामिन बटन" नावाचा चित्रपट इंटरनेटवरून डाउनलोड करून बघितला. चित्रपटाची कल्पनाच भन्नाट होती. एखाद्या व्यक्तीला आपले आयुष्य बालपण ते म्हातारपण असे न जगता उलटे जगायला मिळाले तर काय गंमत होईल अशी ती कल्पना.  

मृत्युशय्येवर पहुडलेली डेजी आपल्या मुलीला उलटं चालणारं घड्याळ बनवणाऱ्या घड्याळबाबाची हकिकत सांगते. मग एक डायरी वाचायला सांगते. बेंजामिन बटनची हि डायरी. पहिलं महायुद्ध संपलेल्या दिवशीच रॉबर्ट बटनच्या घरात अगदी जराजर्जर अवस्थेतलं मूल जन्माला येतं. आईचा बाळंतपणातल्या मृत्यूचा अपशकुन घेऊन आलेलं इतकं विद्रूप मूल रॉबर्टला सहन होत नाही आणि तो ते एका वृद्धाश्रमाच्या पायरीवर टाकून येतो. तिथल्या डॉक्टरांच्या सल्ल्याविरुद्ध तिथली सेविका क्विनी ते मूल आपलं मानून ठेवून घेते. तिथल्या वयोवृद्धांमध्ये बेंजामिन रमतो. तिथल्या एका आजीबाईंच्या नातीबरोबर, डेजीबरोबर, त्याची गट्टीपण जमते. सरत्या काळानुसार तरुण होत जाणाऱ्या बेंजामिनच्या आयुष्यात नवीन मित्रांच्या ओळखी (पिग्मी व कॅप्टन), वेश्यागमन, सागर सफरी, वीवाहितेबरोबर प्रेम प्रकरण, युद्ध, डेजीच्या मैत्रीचे प्रेमात रुपांतर, तिचा सहवास, पितृसुख अशा सर्व रोमांचकारी गोष्टी घडत जातात आणि त्याचं एक "लार्जर दॅन लाईफ" असं व्यक्तिमत्त्व तयार होतं. मग डेजीवरची आपली जबाबदारी टाळण्यासाठी यौवनात (म्हणजे त्याच्या सांख्यिक वयाच्या पन्नाशीत) डेजीला सोडून गेलेला बेंजामिन तिला बालवयातचं भेटतो. शेवटी डेजी त्याच वृद्धाश्रमात स्वत: दाखल होवून बेंजामिनची त्याच्या शेवटच्या दिवसात (शिशुअवस्थेत) देखभाल करते.

मला स्वत:ला चित्रपट आवडला पण तितका ग्रेट वाटला नाही. चित्रपटाचे छायाचित्रण सुंदर आहे. पटकथा अशा प्रकारच्या चित्रपटांना साजेलशा गतीने कधी संथ होणारी तर कधी वेळकाळाच्या उड्या मारत जाणारी आहे. खूप सारी रंगीबेरंगी पात्रे त्यांचे चित्रविचित्र जीवन प्रवास यांची रेलचेल होतीच. दिग्दर्शन, कलाकारांची कामे उत्तमच. चित्रपटावर १९९४ च्या टॉम हॅंक्सच्या "फॉरेस्ट गंप"ची छाया स्पष्टपणे जाणवत होती (पटकथेचा सहलेखक "फॉरेस्ट गंप"चा पण पटकथालेखक आहे हे नंतर समजलेच). म्हणूनच हा चित्रपट तितका ग्रेट वाटला नाही.

चित्रपटाबद्दलची इतर माहिती मिळवायला सुरुवात केली आणि चित्रपट साहित्यकृतीवर आधारलेला आहे हे कळले. अल्पायुषी ठरलेल्या फ्रान्सिस कि स्कॉट फिटझजेराल्ड या लेखकाच्या त्याच नावाच्या ("टेल्स ऒफ द जॅझ एज" या कथासंग्रहातल्या) लघुकथेवर बेतलेला आहे. लघुकथेची कल्पना लेखकाला मार्क ट्वेनच्या "मानवी आयुष्यातला सगळ्यात चांगला भाग सुरुवातीला येतो आणि सर्वात वाईट भाग शेवटी येतो हे किती शोचनीय आहे" या उद्गारावरून सुचली. सर्वसाधारण वातावरणातल्या फक्त एका माणसाच्या आयुष्यात असं विरुद्ध दिशेनं जगण्याची परिकल्पना दाखवण्याचा प्रयत्न म्हणजे ही विलक्षण कथा होय. कथापण डाउनलोड करून वाचली. आणि काहीसा आश्चर्याचा धक्काच बसला. कथेतला आत्मा चित्रपटात कुठल्या कुठं गायब झाला आहे. कथेतल्या बेंजामिनचं आयुष्य खूपच वास्तववादी रेखाटलं आहे. त्याच्या निसर्गदत्त देणगीमुळे (की वैगुण्यामुळे? ) त्याला सोसावी लागलेली कौटुंबिक व सामाजिक अवहेलना व कुचेष्टा याचं परिणामकारक चित्रण लेखकानं त्याच्या कथेत केलं आहे. बेंजामिनच्या आईवडलांपासून त्याच्या बायकोमुलापर्यंत सगळ्यांनाच त्याच्या उलट्या वाहणाऱ्या वयाचं कोड उलगडत नाही. आणि त्यामुळे आपल्या माणसांकडूनच मूर्ख, हट्टी, वेडा अशी त्याची संभावना केली जाते. विचित्र प्रकारचं एकटेपण त्याच्या वाट्याला येतं. वय समजण्यात होणाऱ्या चुकीमुळे घडणाऱ्या गमती जमती आणि त्याच्या जोडीला बेंजामिनच्या वाट्याला येणारी सुख-दु:ख असा संमिश्र पट लेखकानं मांडला आहे.

पण चित्रपटकर्त्यांनी खूपच वेगळा मार्ग पत्करला आहे. वरती सांगितलेली मूळ कल्पना हेच चित्रपट आणि लघुकथेतलं सर्वात मोठं (आणि कदाचित एकमेव) साम्य आहे. त्यामानाने फरक खूपच आहेत. चित्रपटाचा कालखंड साठ वर्ष पुढं ढकलला आहे. बेंजामिनच्या आईचा मृत्यू, वृद्धाश्रमातलं वास्तव्य, सागर सफरी, वीवाहितेबरोबरच अफेअर, त्याचं गायब होणं अशा बऱ्याचशा ठळक गोष्टी पटकथालेखकांनी शोधून काढून बेंजामिनच्या आयुष्यात घुसडल्या आहेत. आता हे सर्व ओढून ताणून दाखवायची काय गरज होती? जेव्हा आपण एखाद्या साहित्यकृतीवर आपला चित्रपट बेततो तेव्हा त्या साहित्यकृतीचा आत्माच हरवणार नाही एव्हढी महत्त्वाची काळजी घ्यायला नकोय का? आता कट्टर चित्रपट-कलावादी लगेच बाह्या सरसावून अभिव्यक्तिस्वातंत्र्य वगैरे आरडा ओरडा चालू करतील. पण हे अभिव्यक्तिस्वातंत्र्य आणि चित्रपटीकरणाचे हक्क विकत घेणे वगैरे कायदेशीर बाबी जरी मान्य केल्या तरी एखाद्या कलाकृतीला (आणि कलाकाराला त्याच्या सृजनाबद्दल) थोडातरी आदर दाखवायला नको का? जेव्हा मूळ साहित्यिकच आपल्या कृतीच्या चित्रपटरुपावर खूश नसेल तर चित्रपटकर्त्यांच काहीतरी चुकतंय हे नक्कीच. तो चित्रपट स्वतंत्र कलाकृती म्हणून कितीही चांगला असला तरी. किंवा त्या साहित्यिकाचं चित्रपटनिर्मितीच ज्ञान कितीही तोकडं असलं तरी. चित्रपटकर्त्यांचा नेहमीचा मुद्दा असतो की तांत्रिक मर्यादांमुळे चित्रपट बनवताना मूळ साहित्य कृतीत काही बदल घडवावे लागतातच. पण मला हा मुद्दा तितकासा पटत नाही. तिथेच तर प्रतिभा शक्ती पणाला लावावी लागते आणि कोणत्याही प्रकारच्या कला निर्मितीत तेच तर कलाकारासमोरचं मोठं आव्हान असतं. त्याच्या स्वप्नांना, त्याच्या कल्पनांना कलेच्या माध्यमातून वास्तवात उतरवणं. त्यात जर त्यानं तडजोड केली तर ती त्यानं स्वत:शीच केलेली बेईमानी नसेल का? आता यामध्ये चित्रपटासारख्या कलाकृतीच बाजारमुल्य इत्यादी गोष्टींचा विचार मी बाजूलाच ठेवलेला आहे.

शेवटी मला एका पटकथाकाराच्या प्रामाणिकपणाची गोष्ट सांगावीशी वाटते. त्याला एक पुस्तकाचं चित्रपट रुपांतर करायला सांगितलं होतं पण काही केल्या त्याला त्याच्या मनातलं सगळं कागदावर उतरायला जमेना. खूप खूप विलक्षण अस्वस्थतेत आणि द्विधा मनस्थितीत त्याने ते दिवस घालवले. अगदी एका संहिता लेखनाच्या शिबिराला हजेरी लावून आपल्याला काही नवीन गवसतंय का हे शोधायचा प्रयत्न केला. अखेर त्याने हार मानून जे काही त्याने या काळात बरबटलं होतं (मनातल्या द्विधा परिस्थितीबद्दल आणि अस्वस्थतेबद्दल) तेच जसंच तसं चित्रपट निर्मात्यांना सादर केलं. आणि काय आश्चर्य? त्यांना त्याच विचित्र पटकथेवर चित्रपट बनवावासा वाटला, त्यांनी तो बनवला आणि तो चालला देखील. "ऍडाप्टेशन" नावाचा तो चित्रपट आणि चार्ली काउफमन नावाचा तो पटकथा लेखक. सगळ्यात गमतीची गोष्ट म्हणजे त्यानं त्याच्या कथेमध्ये त्याच्या मनातली द्विधा परिस्थिती साकारण्यासाठी त्याच्या भावाचं, डोनाल्डचं पात्र तयार केलं आणि चित्रपटाच्या श्रेयनामावलीत त्याच्या (नसलेल्या) भावाच्या नावाचा समावेश पण केला. या भावांच्या जोडीला ऒस्कर नॉमिनेशन पण मिळालं.