जरा विसरून जावे तर हवा कळवायला आली
तुझ्या वक्षातल्या मदहोश गंधाच्या उलाढाली
तुला जे पाहिजे होते तसे केलेस तू सारे
तुला माझी मजा आली मला याची मजा आली
इथे नाहीस तू माहीत आहे पण मनासाठी
जरा हाका तुला मारून जातो खालच्याखाली
रडावे बालकाने, केस कापावे हजामाने
तशी ही जिंदगी म्हणते, चला झाली, चला झाली
कुठे होतो निघालो मी, तुझ्यापाशी कसा आलो?
मला नाही मिळाले मद्य की मी वाकडा चाली!
पुरेशी लाकडे केव्हाच माझी जाहली गोळा
निघावे वाटते, आयुष्य साले मोडता घाली!