जुन्या वहीची विटकी पाने
जुने पुराणे माझे गाणे
कशास गावे उगा स्मरावे
न झेपलेले तुझे उखाणे
पुन्हा पहाता जुने प्रश्न अन्
जुनी उत्तरे खुळ्या मनाने
उगाच वाटे रुचेल काही
सुचेल काही पुन्हा नव्याने
जळी मृगाच्या फसून गेले
सुकून गेले जुन्या श्रमाने
कुठून आले कुठे निघाले
अचेत वारू नव्या दमाने
विटून गेली जरी वही ती
स्मरून झाले नवेच गाणे
नवा सूर मी मजेत गाते
तुला घालते नवे उखाणे........