संवाद

सगळीकडे नीरव शांतता पसरली होती. अति-उशीरा झोपणारी काही कुत्री आणि अति-लौकर उठणारे काही पक्षी परस्परांना न समजणाऱ्या भाषेत बोलत होते.

कावऱ्याबावऱ्या नजरेने आजूबाजूला बघत तो त्या दरवाज्यासमोर उभा राहिला. दार ठोठावावे की नाही याबद्दल त्याच्या मनात चाललेले युद्ध त्याच्या चेहऱ्यावरून परावर्तित होत होते.

हळूहळू आसमंत उजळू लागले.

त्याच्या मनाचा तराजू हेलकावे खात असतानाच अलगद समोरचे दार उघडले. दारात ती उभी होती.

तिच्या चेहऱ्याला वय नव्हते. एखाद्या खोल डोहासारखे तिच्या चेहऱ्यावर सौंदर्य उमटले होते. स्वविनाशी अभिलाषा उत्पन्न करण्याचे सामर्थ्य त्या चेहऱ्यात होते.

झोपेत चालत असल्यासारखा तो तिच्यामागे चालत गेला आणि पलंगावर बसला.

तिने कोमल नजरेने त्याच्याकडे पाहिले. 'तुला काय सांगायचे आहे ते मला आधीच माहीत आहे. पण ते ऐकायला मी उत्सुक आहे' असे ती नजर कुजबुजत होती.

अस्वस्थपणे तो आजूबाजूला पाहत राहिला. शिकाऱ्याच्या तावडीत सापडलेल्या सावजाने प्राण एकवटून शेवटची उसळी मारावी तशी अखेर त्याने उचल खाल्ली. त्याच्या चेहऱ्यावर यंत्राची निर्जीवता आली.

"मी असा अचानक येऊन हजर झालो आहे. पण हे अपरिहार्य झाले होते. हा मार्ग जितक्या स्पष्टपणे मला दिसत होता तेवढ्याच स्पष्टपणे दुसरा कुठला मार्ग मला शक्य नाही हेही दिसू लागले म्हणून मी आलो.

"आपले आधी काय बोलणे झाले होते याची आठवण करून देण्याची गरज नाही.

"पावसाळ्या अंधाऱ्या रात्री चिंब भिजलेल्या प्रवाश्यावर चिखलातून पावले मोजत असताना वीज चमकून जावी तसा तुझा सहवास मला लाभला.

"क्षणकाळ टिकणाऱ्या त्या विजेचे 'तू आहेस' एवढेच आश्वासन पुरेसे असते.

"पण ते चिरकाळ टिकणारे नसते. तहान लागल्यावर पाणी मिळाले तर त्याने जन्माची तहान भागत नाही.

"आपण केव्हातरी पाणी प्यायलो होतो या आठवणीवर मी कायमची तहान मिटवण्याचा प्रयत्न केला. पण सरकत्या काळाबरोबर ती आठवण जीर्ण होत नष्ट झाली. आणि त्या आठवणीची आठवण, त्याची आठवण, असे समोरासमोर धरलेल्या आरशांमधल्या असंख्य प्रतिबिंबांसारखे ते सगळे काल्पनिक वाटू लागले.

"जन्म ते मृत्यू हा प्रवाह गढूळ होऊ नये म्हणून मी प्रयत्न केले. पण ज्या अज्ञात शक्तीने आपले उगमस्थान ठरवले, काठांची बंधने घातली, त्याच विकृत शक्तीने हा प्रवाह मध्येमध्ये खळबळून टाकला.

"त्या अनुभवांची आठवण झाली की अजूनही थरकाप होतो आणि डोळ्यांसमोर धुके दाटते. आधीच अंधुक दिसणारी वाट त्या धुक्यात दिसेनाशी होते आणि आपण प्रवास करतो आहोत की नाही याचा संभ्रम पडतो.

"माझ्या हातून जे जे काही घडते त्याला एकमेवाद्वितीय कलाकृती म्हणून मान्यता मिळते. पण स्तुतीच्या शब्दांनी मनाची भूक भागत नाही.

"ते शब्द भेसूरपणे कुठलातरी अंधारा कोपरा दाखवत राहतात. अंधाऱ्या कोपऱ्यांची ही मालिका कधी संपतच नाही.

"या सर्व गोष्टींमध्ये आश्रय म्हणून मी आपल्या सहवासाच्या आठवणीचे प्रेत जपले होते. पण त्या प्रेताचे अवशेष आता नाश पावले आहेत.

"त्यामुळे एक गोष्ट पुन्हा विचारल्याखेरीज मला राहवत नाही.

"तुझा कायमचा सहवास मला लाभेल का?

"दुबळेपणाने काजळून टाकलेले माझे मन 'हे शक्य नाही' असे कण्हते आहे. जरी तसे असले, तरी मृत्यू तर आपल्या हातात आहे ना? मरायचे नाही म्हणून जगायचे या केविलवाण्या नाटकावर मग मी पडदा पाडेन. वावटळीतल्या धुळीसारखे माझे जीवन भिरभिरवणाऱ्या त्या अज्ञात शक्तीला मी माझे अस्तित्व एकदा तरी दाखवून देईनच देईन. "

वाहता धबधबा अचानक थबकावा तसा काळ थबकला. आणि थबकल्याबद्दल शरमून घाईघाईने पुढे निघाला.

"देश, समाज, संस्कृती असल्या रुक्ष गोष्टींशी मनाची सांगड घालणाऱ्या भाषेमध्ये मी तुला काही सांगणार आहे. कारण त्या सावलीमागची आकृती तुला दिसेल असे मला वाटते. "

नाजूक स्पर्शाने तंबोरा छेडावा तसा तिचा आवाज उमटला.

"मी जे बोलणार आहे त्याला हळवेपणाने अवास्तव महत्त्व देण्याचे कारण नाही. तुला अनवट असलेला एक राग मी तुला देते आहे असे समज. एक राग जाणल्याने संगीताचे आकलन होत नाही, कारण संगीताचे आकलन झाल्याखेरीज एकही राग गळ्यावर चढत नाही.

"तुझ्या प्रश्नाचे उत्तर मी देऊन टाकते. ते शक्य नाही. पेटवल्यावर मेणबत्ती काही कालानंतर संपून जाते तितकेच हे अटळ आहे.

"पण मला त्याबद्दल दु:ख होत नाही. कारण ती अज्ञात शक्ती मधूनमधून आपल्याला इशारे देत असते. आपणच ते इशारे नाकारून त्या शक्तीच्या पूजनात किंवा निंदेत व्यग्र होऊन जातो.

"जळत्या मेणबत्तीच्या दृष्टीने 'पेटवता हात' म्हणजे जी अज्ञात शक्ती. पण त्या हाताला मेणबत्ती पेटवायची गरज उत्पन्न करणारे आणिक कोणीतरी आहे. तसेच ही शक्तीही अंतिम नाही.

"मग आपली स्वतःची कीव करत आक्रोश करायचा हा खेळ हास्यास्पद वाटू लागतो.

"अमर्याद पसरलेल्या जाणीवांच्या विश्वात आपल्या जीवनाचा स्वतंत्र तुकडा काढायचे प्रयत्न सफल होत नाहीत.

"कारण चंद्रप्रकाशाचा तुकडा काढता येत नाही.

"पण चंद्रप्रकाश काय आहे हे जाणले तर त्याचे तुकडे पाडायचाही खटाटोप कुणी करत नाही.

"तू जर स्वतःचे जीवन संपवलेस तर तू त्या शक्तीच्या हातातील खेळणे बनला आहेस हे सिद्धच होईल.

"माझ्या अनुभवावरून सांगते, जन्माला आल्यापासून मृत्यू होईपर्यंतचा काळ म्हणजे जीवन नव्हे. आपल्या सामूहिक आकलनशक्तीला समजणाऱ्या या दोनच घटना असल्याने त्यांचे अवडंबर माजवले जाते.

"जीवन अथांग पसरले आहे. आणि आपल्या स्वयंपूर्ण मनाची जोड त्याला आहे. भावभावना या सामूहिक झाल्या. आणि शरीराच्या भुकेसारखीच मनाची भूक भागवल्यासारखे करणाऱ्या रूढी जन्मल्या.

"प्राणांतिक प्रेम करावे असे वाटणारे स्वतःच्या मनाखेरीज परिपूर्ण कोण तुला सापडेल? दोन मनांचे मीलन ही कितीही हवीहवीशी वाटणारी कल्पना असली तरी त्या मीलनाच्या क्षणीदेखिल ती मने दोन आहे ते सांगावे लागते यातच त्याचा फोलपणा आहे.

"उंच खिडकीतून एखाद्या मुलाने बाहेर डोकावावे तशी आपली कुठलीतरी जाणीव सतत मनाबाहेर बघत असते आणि आपल्या दीनवाणेपणाची जाणीव करून देत असते. स्वतःच्याच मनात डोकावून बघितले म्हणजे हा आक्रोश निरर्थक होतो.

"आणि मृत्यूची संकल्पना नष्ट होते. "

काळाचा बिनआवाजी प्रवाह घोंगावत आला आणि त्या दोघांना वेढून पुढे निघून गेला.