कविता

वेड्यास एक सुचली वेड्या क्षणात कविता
टाळून चांदण्याला बसली उन्हात कविता

"फुरसत मिळेल तेव्हा मीही लिहीन" म्हणतो...
तोवर उरेल ना पण माझ्या उरात कविता?

गरजा नव्या युगाच्या जाणा; जमेल दोन्ही -
जमवा खिशात पैसा; जगवा मनात कविता

उकलून सर्व जेव्हा येतील विश्वसूत्रे
राहील काय त्याही नंतर जगात कविता?

कळतो अजून रोजच मीही मला नव्याने
कळलीच पाहिजे का एका दमात कविता?

पटवू तुला कसे... पण पटवू तरी कशाला?
आहे; अजून आहे माझ्यातुझ्यात कविता!