कुदळ-फावड्याने सतत काम करून हाताला पडलेल्या घट्ट्यासारखा तो रस्ता डोंगरावर उमटला होता. तकतकणाऱ्या बांबूंचे बेडे रस्त्याला बिलगले होते. रस्त्याच्या पातळीवरून त्या घराचे छप्पर फक्त दिसत होते आणि ते एखाद्या राक्षसी वारुळासारखे भासत होते. माळ्याच्या खिडकीतून आतल्या अंधाराचा चतकोर तुकडा विटकरी रंगाच्या भिंतीवर हलका डाग दिल्यासारखा उमटला होता.
खाली अंगणात उतरणाऱ्या पायऱ्या पावसाच्या संततधारेने बुळबुळीत झाल्या होत्या. पायऱ्यांच्या पातळीत मन मानेल तसा फरक पडत गेला होता. नाक, हनुवटी, कोपर, गुडघा यापैकी एकही न फोडून घेता खाली उतरणे नवख्या माणसाला कठीण होते. पायऱ्यांच्या दोन्ही बाजूंना बांबू रोवून त्यांची टोके डोक्यावर एकमेकांना बांधली होती आणि त्यावरून जुईचा वेल सोडला होता.
अंगणाच्या खपल्या निघाल्या होत्या. त्या भिजवलेल्या शिळ्या भाकरीच्या तुकड्यांसारख्या दिसत होत्या. त्यांत भेंड्याचे लांब दांडके पाय रोवून उभे होते. त्यामधून मुंगसासारख्या केसांचे हाडकुळे मांजर शेपटीचे टोक आभाळाकडे रोखून फिरत होते.
ओसरीची पावठणी शेणाने सारवलेली होती. त्यावर शुभ्र रांगोळी रेघली होती.
ओटीवरच्या माचल्यावरून एक पाय खाली सोडून, आणि वरती मुडपून ठेवलेल्या पायाच्या मांडीवर शिरा काढलेले पान पसरून दत्तूभटजी स्वस्थ बसले होते. त्यांचे तासलेले डोके आणि सुरकुत्या पडलेला चेहरा हिरवेचार दिसत होते. जीर्ण झालेल्या शरीरावर एक जवळपास तितकेच जीर्ण धोतर होते. खाली अदबशीर अंतर राखून बसलेल्या यशवंतावर ते आपली मातकट बुबुळे चिकटवून बसले होते. परिस्थितीने गुडघ्यावर आलेला दीनवाणा यशवंता आशेने त्यांच्याकडे पाहत होता.
"काय समजलाएस? हे असे कष्ट उपसणे म्हणजे खायची कामे नव्हेत ती. काय? आजकाल शेंबडा पोरदेखिल कुंडल्या पाहतो. पण समजतांय कोणास? पडताळा शून्य. या घरात कसलासुद्धा भ्रष्टाकार नाही खपवून घेतलेला हां. विटाळशी बाईस घरात यावयास बंदी. आमच्या हिलासुद्धा चार दिवस गोठ्यात ठेवीत असे. काय? आता आत्मस्तुती म्हणून नव्हे, पण सत्य ते सांगतो. अजून भेटतात माणसे, की 'दत्तूभटजी, तुमचे होष्यमाण अचूक निघाले' म्हणून. तो खालच्या बंदरावरच्या भंडारवाड्यातला प्रकाश. त्याला सांगितलिवती की बाबा शनी-मंगळ युती तुझ्या प्रकृतीस अनिष्ट. नाही ऐकलीन. थांबावयास किती सांगत होतो, दर दीड महिना. पण नाही. पडली धाड, नि बसला जेलात अडीच वर्षं. पाय धरलंन सुटून आल्यावर. सांगण्याचा मुद्दा असा, की ते तंत्र पाळायास हवे. थोरामोठ्यांचे बोल, अचूक निघणारच. पण त्यास शुद्धता हवी. पावित्र्य हवे. म्हारांच्या गळ्यात गळे घालून बसता, मग देव कशास पावेल?"
मळकट खाकी कपडे घातलेला सुरेश आतून डब्याची पिशवी घेऊन आला आणि बराचसा पारा उडालेल्या आरशात बघून उरल्यासुरल्या केसांचा भांग काढू लागला.
"आज कुठे रे दौरा?" दत्तूभटाचे पुत्रप्रेम उफाळून आले.
"एक कोंडिवली, एक बिरभाटे, एक वेलदूर, नायटाऊटला चिपळूण" सुरेशने पाठ केल्यासारखे एकसुरी उत्तर दिले आणि तो उंबरा ओलांडून बाहेर पडला.
"तर मी म्हणतो येश्या, एक वेतोबाची शांत करून टाक. दोन नारळ, पाच खण, अकरा सुपाऱ्या, दोन ब्राह्मण जेवायला नि सव्वाएकवीस रुपये दक्षिणा. नाही, म्हणजे एक ब्राह्मणसुद्धा चालेल. आणि तशी दक्षिणा सव्वाअकरा पुरेल. परिस्थिती बदलली आहे बाबा, जुळवून घ्यावे लागते."
आतमध्ये चुलीचा धूर कोंडला होता. छपरावर तरंगताना छान निळसर दिसणारा तो धूर आत जीव घुसमटवीत होता. एका चुलीवर भात रटरटत होता. दुसरीवर तवा तापत होता. ओचापदर खोचलेल्या सावित्रीकाकू झपाझपा हात उचलीत होत्या. दत्तूभटजींची बडबड ऐकताना त्यांच्या मनाच्या पडद्यावर स्मृतींच्या लोलकावरून परावर्तित होणारे काळेकरडे किरण फटकारे मारत होते.
लवलवीत बांध्याची सावित्री कंदिलाची वात चढवून उगाचच सामानाची माफक प्रमाणात हुसक-पासक करीत होती. ते केवळ निमित्त. पुढे काय होईल याच्या कल्पनेने तिच्या पोटात बाकबूक होत होती आणि वारंवार अंगावर शहारे येत होते. 'नच सुंदरी करू कोपा' या पदासारखे होईल की 'विलोपले मधुमीलनात या' या पदासारखे?
"ढणाढणा वाती चढवून उजेड पाडायला तुझ्या बापसाने रॉकेलची पिपे नाहीयेत दिलेली हुंड्यात. की सकाळी परसाकडला गेल्यावर रॉकेल पडते मापभर?" किरट्या आवाजात गर्जना करीत सावित्रीचा मालक आला. कंदिलाची वात उतरली. झाडाचा पाला ओरबाडावा तशी तिची वस्त्रे ओरबाडली गेली. आपल्या तिसऱ्या बायकोच्या अंगाला त्याने किळसवाणे हिसके दिले. रातकिड्यांच्या किरकिरीने सावित्रीचे हुंदके पचवून टाकले.
खळ्यात पावले वाजली. "काय दत्तूभटजी?" असे सवयीचे दोन शब्द उच्चारून लेले तलाठ्यांनी झोपाळ्यावर बूड टेकले. झोपळा समजेल न समजेल असा किरकिरला. सावित्रीकाकूंची पोळी तव्यावर पडली.
धूर्तपणे यशवंताकडे पाहत दत्तूभटजींनी सुपारी कातरायला घेतली. "बगतांय पैशांची जुळनी कशी काय जमतां ती" पुटपुटत यशवंता बाहेर पडला.
"काय दत्तूभटजी, आमच्या कुंडलीत आहे का काही योग कुटुंबासमवेत राहण्याचा? कंटाळा आला बुवा दर शनिवार-रविवार रत्नागिरीस फेऱ्या घालून." लेल्यांनी आणखी एक सरावाचे वाक्य उच्चारले आणि ते झोपाळ्यावरून उठले. हातावर पाणी घेऊन पाटावर बसेस्तोवर सावित्रीकाकूंनी भात उकरला होता.
"काय, सुरेशचे ठीक आहे का आता?" लेलेंनी सलामी दिली.
"बघायचे काय होते ते. मी तरी कुठे पुरी पडणारै सगळ्याला?" अजूनही सावित्रीकाकूंचा आवाज तलम होता. "मनोरमा गेल्यापासून आहे तस्सा आहे. त्यातून तुम्हांला म्हणून सांगत्ये हो, सावत्रपणाची अढी पहिल्यापासूनच त्याच्या मनात. आता मी काय स्वतः होऊन या घरात आले?"
लेले तलाठी गांगरले. त्यांचे ओढाळ मन अजूनही बांधा टिकवून असलेल्या सावित्रीकाकूंची त्यांच्या बायकोच्या थुलथुलीत देहाशी तुलना करीत राहिले. पटापटा घास घेत त्यांनी जेवण संपवले आणि गडबडीने ते उठून गेले.
सावित्रीकाकूंनी मुळेमास्तरांचा आणि जोशीमास्तरांचा डबा भरून तयार केला आणि घडश्याच्या कृष्णाला बोलावून तो पोचता करायला दिला. मग त्या चुलीसमोर जराश्या टेकल्या. घोटभर कॉफी घ्यावी म्हणून त्यांनी भांडे चुलीवर चढवले आणि हातासरशी लेलेभाऊंचे रिकामे ताट उचलून शेणगोळा फिरवून टाकला.
शेणाचा वास सावित्रीला अपरिचित नव्हता. गोठ्यातली कामे तिच्या पाचवीलाच पुजलेली होती. पण त्या रात्री तिला बाजूला बसलेली पाहून तिच्या मालकाचे पित्त खवळले. तिला लाथांनी तुडवीत गोठ्यात नेऊन ढकलली आणि साऱ्या घरावर गोमूत्र शिपडून त्या पवित्र ब्राह्मणाने भडाभडा आंघोळ केली.
तांबू गायीचा विषण्ण शांततेला मधूनच दचकवणारा उष्ण निःश्वास तिची सोबत करीत राहिला. गव्हाणीतल्या गवतात काहीतरी खसपसले. सावित्रीच्या अंगातले बळ पाझरून गेले. कशीबशी सरकत जाऊन तिने तांबूच्या पायाला मिठी मारली. स्वतःच्या वासरालादेखिल जवळ फिरकू न देणारी ती मारकुटी गाय सावित्रीचे तोंड चाटत राहिली.
तो पवित्र बाह्मण दुसऱ्या रात्री चोरपावलांनी गोठ्यात आला आणि आपली पिसाट वखवख भागवून शुद्ध होण्याकरता विहीरीवर निघून गेला. आंघोळ करताना त्याने रेकून म्हटलेले अथर्वशीर्ष नुकत्याच उगवलेल्या चंद्राला शरमेने काळेठिक्कर करीत राहिले.
कॉफीचा कप आणि ताटवाटी विसळून सावित्रीकाकू उभ्या राहिल्या. चेहऱ्यावर तरारून आलेला घाम त्यांनी लुगड्याला टिपून घेतला.
नुकतेच चालायला शिकल्याप्रमाणे दत्तूभटजी डुगडुगत उभे राहिले. माचल्यावरचा पंचांगाचा पसारा त्यांनी आवरून ठेवला आणि पुढच्या दाराला आतून कडी घातली. सावध पावले टाकत ते स्वैंपाकघराच्या दारात आले आणि उभे राहून सावित्रीकाकूंना निरखू लागले.
त्यांची गिळगिळीत नजर आपल्या अंगाला चिकटल्याचे जाणवताच सावित्रीकाकू तटकन उभ्या राहिल्या. त्यांचे शरीर पुतळ्यासारखे स्थिर झाले आणि त्यातून रक्ताऐवजी शिशाचा रस वाहू लागला.
दत्तूभटजींनी स्वैंपाकघरात पाऊल घातले तशी सावित्रीकाकू अलगद खाली वाकल्या. चुलीतला एक मजबूत टोणका त्यांच्या बोटांच्या पकडीत घट्ट आवळला गेला.
लाकडावर लाकूड आपटावे तसा आवाज झाला. स्वच्छ सारवलेल्या जमिनीवर खाली पडलेल्या दत्तूभटजींच्या तोंडातून आलेला रक्ताचा ओघळ जमिनीत जिरत राहिला.
सायीखालचे दूध नासावे तसे ओल्या हिरव्या वासाच्या पांघरुणाखाली दडलेल्या त्या घरातले आकाश नासून गेले.
त्या घरातून बाहेर पडून शेवाळाने माखलेल्या पायऱ्या चढून गेले की तो रस्ता आपला ओबडधोबड देह पसरून बसला होता. त्याला या कशाचीच दाद-फिर्याद नव्हती. अनेक मृतदेह आणि मृतमने वाहून नेण्यास तो समर्थ होता.