एक मी अन एक तू !

आमची प्रेरणा : भूषण यांची, गणिताच्या पेप्रातल्या भोपळ्यांची आठवण करून देणारी कविता शून्य मी अन शून्य तू

वाढवू शब्दांस कविते, एक मी अन एक तू
वाचकांना त्रास कविते, एक मी अन एक तू

लेखनाची योग्य तंत्रे लाभण्याचे .... राहिले !
डावलू सायास कविते, एक मी अन एक तू

सर्वमान्यत्वेच जणु की रोज आपण फाडतो- 
-कल्पनेचे  व्यास कविते, एक मी अन एक तू 

व्यर्थ ! सारे छंद चुकले, आणि वृत्तेही तशी
आज लावू क्लास कविते, एक मी अन एक तू !

गुणगुणू जाता, जगाचा मार खावा लाखदा 
पूर्वजन्मी डास कविते, एक मी अन एक तू !  

पाहते दुनिया दुपारी, आणि रात्री विसरते
मेमरीचा लॉस कविते, एक मी अन एक तू

विश्व हे स्वीकारते बघ  निर्विरोधे आपणा
हाच मिथ्याभास कविते, एक मी अन एक तू !

टोमणे बसती कवीला, लागती कोठे तुला?
देत टाळ्या हास कविते, एक मी? अन एक तू? (ह.घ्या)

पाय टाकावा तिथे डबकेच चिखलाचे निघे 
चंदनाचा  ध्यास कविते? एक मी अन एक तू !

शब्द कुठलाही असो, 'अर्थींधनी' उल्हास हो,
दोन फाल्गुन मास कविते, एक मी अन एक तू !

का छळावे एकमेकांना, तसे इतरांसही
घेउ या संन्यास कविते, एक मी अन एक तू !