चवळई हरभरे

  • चवळईची जुडी एक
  • ओले हरभरे (सोलाणे) दोन वाट्या, शक्यतो थोडे मोड आलेले
  • लसूण दहा पाकळ्या
  • हिरव्या मिरच्या चार
  • खवलेले खोबरे अर्धी वाटी
  • मीठ
  • तेल
  • मोहरी, हळद
४५ मिनिटे
दोन जणांसाठी

चवळईची जुडी धुऊन पाने निवडून बारीक चिरून घ्यावीत.

हरभरे धुऊन घ्यावेत.

लसूण सोलून घ्यावी. मिरच्यांचे तुकडे करून ते लसणीबरोबर खलबत्त्यात खरडून घ्यावे.

लोखंडी कढईत तेल तापवावे. ते धुरावल्यावर त्यात मोहरी घालून ज्योत बारीक करावी. हळद घालावी. लसूण मिरचीचा खर्डा घालावा. तो खमंग झाला की चवळईची पाने घालावीत. ज्योत मोठी करून चटाचटा हलवावे. खलबत्त्यात पाव वाटी पाणी घालून धुऊन घ्यावा आणि ते पाणी घालावे. निम्मे खोबरे घालावे.

पाणी आळत आले की हरभरे घालून नीट परतावे. मीठ घालावे. ज्योत बारीक करावी. झाकण ठेवावे.

मधून मधून झाकण काढून परतावे. वाटल्यास पाण्याचा हबका माऱावा.

हरभरे निम्मे शिजले की उरलेले खोबरे घालावे व झाकण ठेवून शिजवावे.

(१) या भाजीला रस अजिबात नसतो. झुणक्यासारखी खडखडीत होते.

(२) यात लसूण-मिरची सोडल्यास कुठलाही मसाला नाही. त्यामुळे हिला चवळई आणि हरभऱ्याचा उग्र हिरवट कडसर वास येतो. त्यामुळे शेपू, मेथी असल्या पालेभाज्या नावडणाऱ्यांनी शक्यतो इकडे लक्ष देऊ नये.

(३) भाकरी, ही भाजी, लसूण शेंगदाणा चटणी हा एक चांगला बेत होतो.

स्वप्रयोग