महाजालावरील मराठीचा इतिहास-५

महाजालावरील मराठीचा इतिहास-५: विकी मराठीचा शुभारंभ

इंग्रजी भाषेतील विकीपीडिया ह्या मुक्त ज्ञानकोशाची सुरुवात १५ जानेवारी २००१ ला झाली. तर मराठी विकिपीडियाची स्थापना १ मे २००३ ला झाली. याबाबतची सर्व माहिती त्यांच्याच मुखपृष्ठावर उपलब्ध असल्याने ती इथे देण्याचे काही प्रयोजन नाही. दुवा मात्र देत आहे. विकिमराठी मुखपृष्ठ

मराठी विकिपीडियाच्या परिचयात विकी मराठीचा परिचय या दुव्यावर खालील माहिती दिलेली आहे.

"अशा विश्वाचे स्वप्न पाहा की ज्यात प्रत्येक मनुष्यमात्र संपूर्ण ज्ञानाच्या गोळाबेरजेत मुक्तपणे देवाणघेवाण करू शकेल. तशी आमची बांधीलकी आहे. विकिपीडिया  हा एक मुक्त ज्ञानकोश आहे. विकीतंत्रज्ञानावर आधारीत मिडीयाविकी हे सॉफ्टवेअर वापरून हा ज्ञानकोश तयार केला आहे. विकिमिडीया फाउंडेशन ही विनानफ्याच्या तत्त्वावर चालणारी संस्था ह्या ज्ञानकोशाच्या व्यवस्थेचे आणि नियंत्रणाचे काम पाहत आहे.

हा मुक्त ज्ञानकोश जगातील सर्व भाषांमध्ये लिहिला जात आहे, मराठीचा पण यात समावेश आहे. या मुक्त ज्ञानकोश चे वैशिष्ट्य हया ज्ञानकोशाचे कुणीही सहज संपादन करू शकते. अनेक मराठी बांधव व भगिनी यास सक्रिय हातभार लावत आहेत.

विकिपीडियाशिवाय, बहुभाषी डिक्शनरीकरिता विक्शनरी, मूळ दस्तावेज पुस्तके पाण्डूलिपी आणि स्रोत इत्यादीकरिता विकिस्रोत, तर नवीन पुस्तकांच्या निर्मितीकरिता विकिबुक्स, अवतरणांच्या संचयाकरिता विकिक्वोटस, बातम्यांकरिता विकिन्यूज, चित्र छायाचित्र ध्वनी आणि चलचित्रमुद्रीका आणि इतर फाइल्सच्या संचयाकरिता विकिकॉमन्स इत्यादी सहप्रकल्पांसोबतच विकिमिडीया फाऊंडेशन विकिस्पेसिज नावाचा जैवकोशाचा पण कणा आहे.

विकिमिडीया फाउंडेशन तीच्या संकेतस्थळांच्या सुसूत्रीत व्यवहाराच्या दृष्टीने मेटाविकी निती नियमावलींचे चर्चा व नियमन करते, मिडीयाविकी संकेतस्थळावरून सॉफ्टवेअर डेव्हलपर लोकांचे व वापरणाऱ्यांचे कार्य चालते तर विकिमिडीया फाउंडेशनचे स्वत:चेपण संकेतस्थळ आहे जेथे प्रवेश मर्यादित स्वरूपातच उपलब्ध केला जातो. मिडीयाविकी सॉफ्टवेअरच्या इतर भाषांत भाषांतरणाचे काम ट्रांस्लेट विकीत होते आणि सॉफ्टवेअर संबंधित सूचना आणि तक्रारींची दखल बगझीला येथे घेतली जाते.

तुम्ही मिडीयाविकी सॉफ्टवेअर स्वत:चे मराठीतील स्वतंत्र संकेतस्थळ घडवण्याकरितासुद्धा वापरू शकता अथवा चक्क या सॉफ्टवेअरच्या डेव्हेलपमेंटमध्ये सहभाग घेऊ शकता."

मराठी विकीवर मराठी भाषेच्या बाबतची काही प्राथमिक माहितीही दिलेली आहे. आज जर कुणीही अशा माहितीच्या शोधात असेल आणि ती 'महाराष्ट्र शासनाच्या', 'मराठी साहित्य संस्कृती मंडळा'च्या वा 'मराठी साहित्य परिषदे'च्या संकेतस्थळांवर शोधायचा प्रयत्न करेल तर त्याचे समाधान होऊ शकणार नाही अशीच परिस्थिती आहे. अशा अवस्थेत मराठी विकीवरील मराठी भाषेच्या माहितीवर विकीवरील मराठी भाषा पृष्ठ या दुव्यावर जाऊन कुणाला समाधानकारक माहिती मिळू शकली तर असे वाटू शकेल की मराठी विकीची निर्मिती; हा महाजालावरील मराठीच्या इतिहासातला एक महत्त्वाचा टप्पा आहे.

याशिवाय जगभरातील मराठी भाषकांनी मराठी विकीला दिलेल्या प्रतिसादातून मराठी भाषा, संस्कृती आणि व्यवहार यांविषयी मोलाची माहिती मराठी विकीवर गोळा होताना दिसत आहे. या कारणानेही महाजालावरील मराठीच्या इतिहासात या टप्प्याचे योगदान महत्त्वपूर्ण ठरावे. विकी मराठीच्या शुभारंभामुळे महाजालावर मराठीचा वावर निस्संशय वाढला आहे.