ह्यासोबत
महाजालावरील मराठीचा इतिहास-१
हा विषय एकट्याने अंकित करावा असा नाही. एका लिखाणात संपूर्ण होणाराही नाही. म्हणून जे जे आठवत आहे त्यानुसार इथे लिहीण्याचा प्रयत्न करत आहे. मनोगतींना विनंती आहे की त्यांनी यथायोग्य भर यात घालावी म्हणजे ही संहिता परिपूर्ण होऊ शकेल. चर्चेला सुरूवात व्हावी म्हणून खालील मजकूर लिहीला आहे. चूकभूल द्यावी घ्यावी. यथाशक्ती भर घालावी ही विनंती.
१९९६ च्या गणेश चतुर्थीला मायबोली डॉट कॉम ची स्थापना झाली. परस्पर-प्रतिसादानुकूल (इंटरऍक्टीव्ह) वापरसुविधा असलेले पहिले मराठी संकेतस्थळ म्हणून त्याचा उल्लेख करावा लागेल. मायबोलीने मात्र तसा दावा कधीही केला नाही. मायबोलीच्या पाऊलखुणा शोधण्यातच ते समाधानी राहिले. त्याची निर्मितीच मुळी अनिवासी भारतीयांच्या परस्परांतील सुसंवादास मायबोलीचा आधार असावा म्हणून झाले होते. अजय गल्लेवाले यांनी कुटुंबास मनोरंजनाचे साधन म्हणून निर्माण केलेल्या या संकेतस्थळाकडे, लवकरच, परदेशात (विशेषतः अमेरिकेत) सुस्थापित झालेल्या मराठी भाषकांनी सुसंवादाचे सक्षम साधन म्हणून पाहायला सुरूवात केली. हा संवाद अर्थातच इंग्रजी कळफलकावरून रोमन लिपीत मराठी लिहीण्यातून होत असे. पुढे देवनागरी टॅग लावून ’शिवाजी’ टंकात देवनागरीत मराठी लिहीण्याची सोय, मायबोलीवर महेश वेलणकरांच्या कौशल्याने निर्माण झाली. मग तिथे कायम रोमन लिपीत मराठी लिहीण्याची सवय झालेले जुने जाणते, आणि नव्याने मायबोलीस रुजू झालेले देवनागरीत दिमाखात लिहू शकणारे यांच्यात तुंबळ युद्धे सुरू झाली. भावना महत्त्वाची की भाषा इथपासून तर ऑफिसात बसून देवनागरी लिहीता येत नाही अशा स्वरूपाच्या अडचणींचा मुकाबला सक्षमपणे केला गेला. काही परदेशस्थ व्यक्तींना तर मायबोलीने एवढे वेड लावले की मायबोलीचे व्यसन कसे सोडवावे हा विषयच मायबोलीवर एके काळी चर्चिला जात असे. मायबोलीने आपल्या पत्रव्यवहारसुविधा, वधुवरसूचन आणि दिवाळीअंकविक्री इत्यादी आपल्या वापरकर्त्यांना लागणाऱ्या सोयी उपलब्ध करवून देत देत स्वावलंबन साधले. रंगीबेरंगी सदरात सभासदांना स्वतःच्या मालकीची जागा ठराविक आकार घेऊन देऊ केली आणि थोडक्यात मराठी ब्लॉगिंगलाच सुरूवात केली असे म्हणावे लागेल.
पुढे २००४ साली गणेशोत्सवाच्या सुमारास मनोगताची निर्मिती झाली. महेश वेलणकरांना देवनागरीचा सार्थ अभिमान होता म्हणून त्यांनी जेव्हा मनोगत डॉट कॉम ची निर्मिती केली, तेव्हाच १०% हून जास्त रोमन लिपीत असणाऱ्या नोंदी प्रकाशितच होऊ नयेत अशी व्यवस्था केली. उत्तम शुद्धलेखनाची आणि शब्दचिकित्सकाची अभूतपूर्व सुविधा उपलब्ध करून दिली. आणि जे स्वप्न महाराष्ट्र सरकारने खरे तर पुरे करायला हवे होते ते त्यांनी प्रत्यक्षात उतरवले. मराठीतून वेळकाळाच्या नोंदींसकट सर्वच्या सर्व संकेतस्थळ संपूर्णपणे देवनागरीत सुस्थापित करण्याचे. या त्यांच्या मराठीस, प्रमाण भाषेस आणि शुद्धलेखनास सुवर्णयुग पुनःप्राप्त करून देण्याच्या दैदिप्यमान प्रयत्नामुळे महाजालावर मराठी दिमाखात वावरू लागली. मात्र त्यामुळे लेखनाकरता जे अतिरिक्त कष्ट घ्यावे लागत त्यामुळे उत्स्फूर्त लेखन करणारे थोडे नाराज झाले. कसं का होईना पण कसेतरी मराठी लिहू शकण्यात समाधान मानणारे वा तितपतच जमू शकणाऱ्या लोकांना शुद्धलेखनाचा जाच जाणवू लागला. त्याचवेळी अद्वातद्वा, अर्वाच्य, अघळपघळ आणि अनिर्बंध जवळिकीने सार्वजनिक संकेतस्थळांवर लंगोटीयारांच्या मांदियाळीत वावरावे तसे वावरू पाहणाऱ्यांवर प्रकाशनपूर्व संमतीची अट लादून मनोगत प्रशासनाने त्यांची फारच गोची केली. त्यांची त्यामुळे घुसमट होऊ लागली. पण स्वतंत्र संकेतस्थळ स्थापन करण्याची क्षमता अजून कुणाही एकाजवळ निर्माण झालेली नव्हती. अशातच २००६ च्या जानेवारीत मनोगतच्या विदागाराला भोक पडले. त्यातूनही बव्हंशी विदा सहीसलामत सोडवण्यात प्रशासनास यश आल्याने महाजालावरील मराठीच्या इतिहासात एक यशोगाथा रुजू झाली.
मग राज जैन यांनी स्वतंत्रपणे माझे शब्द संकेतस्थळ निर्माण केले पण त्यातील सुविधा मायबोली वा मनोगताच्या आसपासही नव्हत्या. मात्र त्यात पी. डी. एफ., एम. पी. ३. इत्यादी फाईल्स साठवण्याची सुविधा वापरकर्त्यांना उपलब्ध करून देण्यात आलेली होती. तशी सुविधा इतर कुठल्याही मराठी म्हणवणाऱ्या संस्थळावर पाहण्यात आलेली नाही. दुर्दैवाने हे संस्थळ राज यांना अभंग राखता आले नाही. त्याचा विधिवत अस्त झाला आणि त्यावर आपापल्या फाईल्स अपलोड करणाऱ्यांच्या फाईल्स नाहीशा झाल्या. शशांक जोशींनी मि. उपक्रम डॉट ऑर्ग काढले. त्यात गंभीर साहित्यास प्रकाश मिळावा असा उद्देश राखण्यात आला. पण त्यांनी त्यात कविता तसेच इतर हलक्याफुलक्या लेखनास वा गप्पाटप्पांना वावच न ठेवल्याने रसिक मराठी लोक काहीसे दूरच राहिले. तरीही महत्त्वपूर्ण तांत्रिक, वैज्ञानिक, शास्त्रीय आणि अभ्यासपूर्ण लेखन मराठीत करू चाहणारेही काही कमी नव्हते. त्यांनी ते स्थळ बहरास आणले. मराठीस मोलाच्या शास्त्रीय लिखाणाची भेट दिली.
कवितारसिक आणि केवळ परस्परांशी महाजालावर गप्पाटप्पा करू पाहणारे लोक मात्र नाराजच होते. त्यांना व्यासपीठ मिळाले ते चंद्रशेखर ऊर्फ तात्या अभ्यंकरांनी, नीलकांत घुमरेच्या तांत्रिक साहाय्याने काढलेल्या मिसळपाव डॉट कॉम मुळे. मात्र, ज्या शुद्धलेखनापासून, शिस्तीपासून सुटका करण्याकरता मिसळपावची निर्मिती झाली होती त्याच शुद्धलेखन आणि शिस्तीकरता मिसळपाववर आणीबाणी पुकारण्याची पाळीही पुढे आलीच. त्यामुळे या नियमांची गरजच अधोरेखित झाली. तरीही मिसळपाव हॉटेल त्याच्या स्वरूपामुळे लोकप्रियतेकडे वाटचाल करू लागले. महाजालावरील सामान्य मराठी सज्जनांची गरज भागवू लागले.
माहिती तंत्रज्ञानांतर्गत व्यवसायांमध्ये सतत संगणकावर आणि महाजालावर वावर असणाऱ्या मराठी लोकांची संख्या दरम्यान वाढतच होती. त्यामुळे सहज मराठी लेखनाच्या सुविधा मिळताच मराठी साहित्यिक निर्मितीस अभूतपूर्व गती मिळाली. अशाप्रकारचे सारेच लोक आपापले व्यक्तीगत अनुभव लिहू लागले. खूप सकस साहित्याची निर्मिती झाली. आणि प्रचंड प्रमाणात निकस साहित्य जन्मास आले. अमेरिकेतील प्रवासाचे वर्णन इतक्या जणांनी लिहीले की वाचणाऱ्यांना कंटाळा येऊ लागला. आपापल्या विकारांची गाथा लिहीणारेही कमी नव्हते. प्रेमकवितांना ऊत आलेला होता तर त्यावरील विडंबनांना पोत्याने जन्मास घातले जाऊ लागले.
या काळात परस्पर-संवादानुकूल नसलेली अनेक संस्थळे महाराष्ट्राभूमीतच उदयास आली. रामरामपावण डॉट कॉम, मराठी वर्ल्ड डॉट कॉम इत्यादीकांनी आपापल्यापरी जुन्या मराठी साहित्याचे संकलन अतिशय झपाट्याने केले. नव्या साहित्यासही खूपच प्रोत्साहन दिले.
सामान्यतः पूर्वीचे प्रथितयश लेखक (पु. ल., आचार्य अत्रेंसारखे सन्मान्य अपवाद वगळता) व्यावहारिक जीवनात नाकारले गेलेले, अपयशी, मास्तरकी करणारे, पोथ्या लिहीणारे, लेखनिक होते. या घडीला घडणारे साहित्यिक नव्या जोमाचे आहेत. निरनिराळ्या क्षेत्रांमध्ये उच्चतम प्राविण्ये मिळवलेले आहेत. त्यांचेकडे भरपूर लेखनविषय आहेत, लेखनमाध्यमे आहेत आणि लेखनसमयही आहे. म्हणून अभूतपूर्व कसाचे अपरिमित साहित्य निर्माण झाले आहे. अर्थात या साहित्यास सर्वसामान्य वाचकांचे दरवाजे बंदच होते. अजूनही हीच अवस्था कमी-अधिक प्रमाणात तशीच आहे. हे साहित्य सर्वसामान्य मराठी वाचकांस उपलब्ध होईल तो सुदिन. खरेतर यातील निवडक साहित्यास मुद्रित प्रकाशनांमध्ये त्वरेने आणण्याची गरज आहे.
आज महाजालावर वावर असणारे आणि महाजालविन्मुख अशा दोन गटांमध्ये वाचक विभागलेले आहेत. लेखकही. पहिले वाचक पडद्यावरच वाचणारे आहेत तर दुसऱ्या गटातील वाचक, मुद्रित माध्यमे वाचत आहेत. मुद्रित माध्यमातही महाजालावरील लेखक उतरू लागले आहेत. पण मुद्रित माध्यमात लिहीणाऱ्यांना त्यामुळे अभूतपूर्व स्पर्धेस तोंड द्यावे लागत आहे. आणखी एका प्रकारच्या लेखकांनी मराठीस स्वतःच्या दावणीला बांधलेले दिसून येत आहे. ते आहेत वृत्तपत्रांतून स्तंभलेखन करणारे वृत्तपत्रांनी निवडलेले लेखक. अशांची पुस्तकेच मुद्रित प्रकाशन व्यवसायावर आपली छाप राखून आहेत.