महाजालावरील मराठीचा इतिहास-२

महाजालावरील मराठीचा इतिहास-२

महाजालावरील मराठीच्या इतिहासास एक तांत्रिकतेचा पदर आहे. जे तांत्रिक टप्पे दरम्यानच्या काळात गाठले गेले त्यांची काळाबरहुकूम नसली तरी टप्प्यांबरहुकूम दखल घ्यायलाच हवी.

महाजालावर मराठीची सुरूवात खरे तर परदेशस्थ भारतीयांनी काढलेल्या संस्कृत डॉक्युमेंटस  या संकेतस्थळावरून झाली. या संकेतस्थळाचा उद्देश भारतीय भाषांतील प्राचीन आणि अर्वाचीन साहित्याच्या संकलनाचा होता आणि आहे. त्यांनी इंग्रजी कळफलकावरून देवनागरी लिहीण्याची जी पद्धत विकसित केली तिला आय. ट्रान्स. (इंडियन लँग्वेज ट्रान्सलिटरेशन) म्हणतात. त्याच पद्धतीवर हल्लीच्या सर्व देवनागरी लेखनसुविधा आधारलेल्या आहेत. या स्थळावर हिंदी गाण्यांच्या शब्दांचे जे अभूतपूर्व संकलन करण्यात आलेले आहे त्याला जगाच्या इतिहासात तोड नाही. आय.ट्रान्स‌ सॉन्ज बुक (Itrans Songs Book)  या नावाने ते आजही दिमाखात स्थिर आहे.

कोकण रेल्वेच्या विकसनादरम्यान शुषा (शिवाजी) टंकांचा विकास होऊन ते वापरासाठी खुलेपणाने उपलब्ध झाले. ही मराठी भाषेच्या तांत्रिक विकासाची पहिली मोठी पायरी होती. मायबोली डॉट कॉमवरही देवनागरी लेखन त्यामुळेच शक्य होऊ शकले होते. दरम्यान फॉंटोग्राफरचा उपयोग करून किरण फाँटस, शनिपार फाँट इत्यादी अनेक फाँटस विकसित करून त्याआधारे संकेतस्थलेही बनवली गेली होती. अशाचपैकी बरहा फाँटसने आज आय.एम.ई. काढून सुंदर युनिकोड एकात्मिक लेखनाची सोय केलेली आहे. मात्र या सर्वात मनोगतावर उपलब्ध असलेली संपादनसुविधा सर्वात सशक्त आणि सोयीस्कर असल्याने लोक तिचा वापर करून इतर लेखनही करू लागले होते. महाजालापासून दूर असता वापरता येईल अशा युनिकोड संपादकाची खरीखुरी निकड मग जाणवू लागली होती. अशावेळी ॐकार जोशींनी गमभन उपलब्ध करून दिले. आजमितीला गमभनवर आधारित संकेतस्थळेच जास्त आहेत. मराठीच्या विकासास यामुळे सशक्त आधार मिळाला.

२००६ मध्ये राज्य मराठी विकास संस्थेने जनभारती (सीडॅक) आणि महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञानविभागाच्या सहकार्याने मराठी संकेतस्थळांची पहिली खुली स्पर्धा आयोजित केलेली होती. तिच्यात प्रभादेवी मुंबईच्या सचिन पिळणकरांच्या 'अवकाशवेध' ह्या संकेतस्थळाला पहिले पारितोषिक मिळाले. डॉ. बाळ फोंडके (सुप्रसिद्ध विज्ञानकथालेखक आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स कम्युनिकेशनचे माजी संचालक) आणि  प्रा. मं. गो. राजाध्यक्ष (जे जे स्कूल ऑफ अप्लाईड आर्टस चे माजी अधिष्ठाते) यांव्यतिरिक्त त्या त्या क्षेत्रांतील तज्ज्ञ परीक्षकांकडून परीक्षण करण्यात आलेले होते. या स्पर्धेत महेश वेलणकरांच्या मनोगताचा दुसरा क्रमांक आला होता.  दुवा क्र. १. पिळणकरांच्याच धरतीवर मग ट्रेक्क्षितिज हे फ्लॅशवर आधारित पदभ्रमणास वाहिलेले नितांतसुंदर संकेतस्थळ डोंबिवलीच्या मुलांनी तयार केले. आपल्या मनोगती जयंतराव कुलकर्णींचा अक्षय यात अग्रभागी होता.

यास्पर्धेनंतर लोकांना शासन याबाबतीत काही करत असल्याचे पहिल्यांदा जाणवले. मात्र सीडॅक यापूर्वीच टंकनिर्मिती, भारतीय भाषांतील परस्परांतील रूपांतरण (ट्रान्सलिटरेशन), शब्दकोषनिर्मिती, प्रकाशकीय शब्दओळख (ऑप्टिकल कॅरेक्टर रेकग्निशन) इत्यादी पैलूंवर काम करू लागलेली होती. मग प्रमोद महाजनांनी भारत सरकारचे माहिती तंत्रज्ञानखाते सुरू केले आणि भारतीय भाषांच्या विकासाकरता ठोस पाऊले उचलली. आय. आय. टी. पवई, आय. आय. टी. कानपूर इत्यादी संस्थाही आपापल्यापरीने तांत्रिक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी झटत होत्याच. या साऱ्यांचा परिपाक म्हणून भारत सरकारने युनिकोडनिर्मितीमध्ये सहभाग निश्चित केला. मनोगत मात्र युनिकोडचा अंमल करण्यात सर्वात आघाडीवर होते. युनिकोडचा मग मायबोलीनेही स्वीकार केला. पुढे सकाळने युनिकोडीकरण केले. आणि आता तर युनिकोड जनरहाटीचा भाग झालेले आहे.

भारत सरकारच्या माहिती तंत्रज्ञान खात्याच्या विद्यमाने भारतीय भाषांच्या विकासाखातर निराळे संकेतस्थळ मग काढण्यात आले. त्याद्वारे अनेक तांत्रिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. दयानिधी मरान त्या खात्याचे मंत्री असतांना तर देवनागरी लेखनाची सर्व संसाधने असलेली सीडी. त्यांनी मोफत वाटली. मी त्याच काळात माझे नाव तिथे नोंदवलेले असल्याने मलाही ती मिळालेली आहे. आता युनिकोडच्या नव्या संस्करणाबाबतही हे संस्थळ महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

दरम्यान वृत्तपत्रांनी आपापले युनिकोडीकरण सुरू केले. त्यांची त्यांची परस्परसंवादानुकूल संकेतस्थळेही उदयास आली. वाहिन्या आपापल्या उद्दिष्टांना साजेशी संकेतस्थळे मराठीत काढू लागल्या. अनुदिन्या लिहीणारेही सरसावले आणि सुरेश भट डॉट कॉम, गदिमा, पुल यांची संकेतस्थळे महाजालावर दिसू लागली. कवितेस, विशेषतः गझलेस बहारीचे दिवस आले. मराठी गझलेस वाहिलेली अनेक संकेतस्थले निर्माण झाली आणि मराठी कार्यशाळा उदयास आल्या. हा महाजालावरील मराठीच्या विकासाचा एक मोठा टप्पा ठरला आहे.