महाजालावरील मराठीचा इतिहास-६

महाजालावरील मराठीचा इतिहास-६

"यू-ट्यूब" कंपनी २००५ च्या फेब्रुवारीत स्थापन झाली. ही एक महाजालावरील, जालसंजीवित (ऑनलाईन) दृकदर्शनांतील अग्रगण्य कंपनी आहे. जालानुभावाद्वारे जगभरातील मूळ दृकदर्शने अवलोकन करणे आणि इतरांसोबत वाटून घेणे यांकरताचे पहिले संस्थान आहे. "यू-ट्यूब" कंपनी लोकांना, आपल्या संकेतस्थळावर; संकेतस्थळे, भ्रमण-उपकरणे, अनुदिन्या आणि विरोपांद्वारे; दृकदर्शने (व्हिडिओ क्लिप्स) सहज चढवू देते आणि वाटून घेऊ देते.

"यू-ट्यूब"वर प्रत्येकजण दृकदर्शने अवलोकन करू शकतो. लोक वर्तमान घटनांचे चक्षुर्वैसत्यं दर्शन घेऊ शकतात, त्यांच्या त्यांच्या छंद, स्वारस्यांबाबतची दृकदर्शने शोधून काढू शकतात आणि वैचित्र्यपूर्ण, नेहमीपेक्षा निराळी दृकदर्शने पाहू शकतात. जसजसे लोक विशेष घटना चित्रित करू लागले आहेत, तसतसे "यू-ट्यूब" त्यांना उद्याचे प्रसारक होण्यास समर्थ करत आहे.

"यू-ट्यूब" करता २००५ च्या नोव्हेंबरात सिक्विआ कॅपिटल यांनी अर्थपुरवठा केला आणि डिसेंबरात औपचारिकरीत्या संकेतस्थळ स्थापन करण्यात आले. नोव्हेंबर २००६ मध्ये गूगलने "यू-ट्यूब" विकत घेतले. "यू-ट्यूब" ने अनेक मजकूर-पुरवठादार कंपन्यांसोबत करार केले आहेत. त्या आहेत सी. बी. एस., बी. बी. सी., युनिव्हर्सल म्युझिक ग्रुप, सोनी म्युझिक ग्रुप, वॉर्नर म्युझिक ग्रुप, एन. बी. ए. वगैरे.

आता या सगळ्याचा महाजालावरील मराठीच्या इतिहासाशी काय संबंध आहे असे वाटू शकेल. मात्र मराठी दृकदर्शने, चित्रणे, श्राव्य मजकूर आणि महाजालावरील मराठीच्या सर्व प्रकारच्या वावरासच या घटनांमुळे मोठा वेग प्राप्त झाला. एकतर भ्रमण-उपकरणांमध्ये चित्रीकरणाची सोय उपलब्ध झाली आणि दृकदर्शनांचा सुळसुळाट झाला. अर्थातच मराठी लोकही यात मुळीच मागे नव्हते. शिवाय, दूरदर्शनवाहिन्यांचे मुद्रित कार्यक्रम, त्यांमध्ये होणारा जनसामान्यांचा सहभाग आणि फोफावत चाललेली पत्रकारितेची क्षितिजे यांमधून अशा प्रकारच्या संचिका परस्परांपर्यंत ताबडतोब पोहोचवण्याकरता एक सशक्त माध्यम त्यामुळे प्राप्त झालेले होते. मग ई-स्निप्स इत्यादी तत्सम संकेतस्थळांच्या लोकप्रियतेची लाटच आली. जसा सर्वच भाषिकांच्या दृकदर्शनांचा अपार प्रसार सुरू झाला तसाच तो मराठीचाही झाला. या घटनेचा महाजालावरील मराठीच्या इतिहासात अत्यंत मोठा प्रभाव पडल्याचे दिसून येते.

ई-स्निप्सवरच्या प्रसार सामर्थ्याचे वर्णन करणारे हे चित्रच पाहाः

या साऱ्या सामर्थ्यांचा तत्काळ प्रभाव होऊन महाजालावर मराठीचा वावर वाढला.

लिखित संहिता, कागदपत्रे, प्रकाशचित्रे आणि दृकचित्रणे, संगीत आणि आवाज इत्यादी संचिका वा संचिकांचे अख्खे कप्पेच, संपूर्ण जालपृष्ठे, दुवे आणि जालसंजीवित पद्धतींनी केलेली दृकदर्शने ही सगळी त्यांच्या संकेतस्थलांवर चढवणे आणि नियंत्रित पद्धतींनी वाटून देणे शक्य झाले. ही क्रांती अभूतपूर्व होती. मराठी यामुळे झपाट्याने महाजाल व्यापू लागली. इतर भारतीय भाषिकांच्या मानाने मराठी माणूस महाजालशिक्षित असण्याचे प्रमाण जास्त आहे, उच्चविद्याविभूषित असण्याचे प्रमाण जास्त आहे, हरहुन्नरी असण्याचे प्रमाण जास्त आहे यामुळे, किंवा महाराष्ट्र शासनाने नॉलेज कॉर्पोरेशन काढून प्रजाजनांना मोठ्या प्रमाणात प्रशिक्षित केल्यामुळे असेल पण या तंत्रज्ञानातील क्रांतीचा पुरेपूर उपयोग करून मराठी माणसांनी महाजालावर आपला वावर अधिक लक्षणीय केला यात संशय नाही.

ही संकेतस्थळे परक्यांवर अवलंबून आहेत. त्यांचे सेवादाते ती सेवा का आणि कशी मोफत देत आहेत हे स्वतंत्र अभ्यासाचे विषय आहेत. मात्र मराठीच्या अभिव्यक्तीकरता खुद्द मराठी माणसांच्या नियंत्रणाखालील सेवादाते असावेत, ते मराठीच्या मुक्त आणि स्वावलंबी प्रसारास सामर्थ्य द्यावेत या इच्छा मात्र अजूनही स्वप्नरंजनच ठरत आहेत ही दुर्दैवाची गोष्ट आहे.

या संदर्भात, 'मायबोली' वा 'मनोगता'बाबत एक गोष्ट मात्र मला अभिमानाने सांगावीशी वाटते आहे, ती म्हणजे मराठी मायबोलीच्या लेकरांनी मायबोलीस दिलेली ही ओसरी हिरावली जाण्याची सुतरामही शक्यता मला जाणवत नाही.

आपल्या 'प्रवासीं'च्याच शब्दांत सांगायचे झाले तरः

नको अवाढव्य राजवाडा ।
निजायला ओसरी असावी ॥
नको दिखाव्यास गोड गप्पा ।
मनात प्रीती खरी असावी ॥