कीव...!

........................
कीव...!
........................

क्षुद्र हे पाहून सारे जीव!
राग नाही येत; येते कीव!

शब्द एखादा तरी तू बोल...
मीच का लेखी तुझ्या राखीव?

मी कुणावर ठेवला विश्वास?
गोष्ट ही आहे खरी ऐकीव!!

चांगले केलेस नक्षीकाम...
ही तुझी कविता किती कोरीव!

सांगती माझ्या मनाला क्लेश...
आपली मैत्री असे आजीव!

वागणे आहे; असो हे सैल...
चेहरा आहे तुझा घोटीव!

दिव्य तेजाचाच होई भास....
नेणिवेला भेटता जाणीव!

दुःख हे माझे न बांधेसूद...
वेदना माझी नसे रेखीव!

शब्दहो, थांबू नका इतक्यात....
आशयाची दूर आहे शीव!

- प्रदीप कुलकर्णी

........................
रचनाकाल ः ११ जून २००९
........................