रंग नभाचे...

रंग नभाचे क्षणाक्षणाला बदलत होते
कुणीतरी अस्वस्थ असावे.. समजत होते

आज अचानक काय बिनसले असेल ह्याचे
ह्याच मनाला काल कुठेही करमत होते

कशास होती सुरू तिथे ती चर्चा नक्की?
वरवर बघता सर्व चेहरे सहमत होते

मी काही ठरवून व्यथांना बिलगत नाही
जे होते ते माझ्याकडुनी नकळत होते

विचारण्याचा रोख चुकीचा असेल तर मग..
साध्या साध्या शंकांचीही.. हरकत होते

तुझ्यासारखे हळवे होते मेघ कालचे
गर्जत नव्हते, बरसत नव्हते.. तरळत होते

अजूनही ती सांज हुंदके रोखत होती
दिशादिशांवर अजून काजळ पसरत होते

अलगद पानावरती बसले फूलपाखरू
बहुधा माझ्या वहीत काही उमलत होते....