पडेल विनोद

पडेल विनोद

अनेक वर्षांपूर्वीची घटना आहे. महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्याच्या एका छोट्याशा मंगळवेढा नामक तालुक्यात माझे वडील काही कामानिमित्ताने गेले होते. छोटेसे गाव, साधी माणसे. बोलीभाषा मराठीच असली तरी पुण्यापेक्षा जरा वेगळी. शिवाय बोलण्यात कानडी व तेलुगू भाषेचेही अनेक शब्द! वडील मुक्कामाला तेथील शाळामास्तरांकडे उतरले होते. शाळामास्तरही सच्छील, साधेभोळे गृहस्थ. घरात ते आणि त्यांची पत्नी दोघेच. हाताखालील बारीकसारीक काम करायला एक म्हातारा गडी, बस! त्यांचे घरही पत्र्याचे छत असलेले, दोन खोल्यांचे, त्यांच्यासारखेच साधेसे! बाहेरच्या बैठकीच्या खोलीत एक दिवाणवजा पलंग, एक लहान टेबल, दोन लाकडी खुर्च्या, एक पत्र्याची खुर्ची व एक फडताळ एवढेच सामान... म्हणायला एक जुना रेडिओ व टेबलावर ठेवलेल्या पंख्याच्या जोडीला सरस्वतीची प्रतिमा व भिंतींवरचे गांधीजी व नेहरुंचे फोटो हीच काय ती खोलीची सजावट.

मास्तरांच्या पत्नी कमी शिकलेल्या पण अतिशय आतिथ्यशील होत्या. पुण्याहून आलेल्या पाहुण्यांना आपल्या गावचे खास पदार्थ करून खायला घालायचा त्यांनी चंगच बांधला होता. परिणामी एके दुपारी भरपूर, मिष्टान्नयुक्त सुग्रास भोजन केल्यावर माझ्या वडीलांना वामकुक्षी केल्याशिवाय पर्यायच नव्हता. त्यामुळे ते जेवणपश्चात घरातील एकमेव खाटेवर, म्हणजेच बाहेरच्या पलंगावर आडवे झाले. मास्तर सुट्टीचा दिवस असल्याने घरीच होते. तेदेखील खाली चटई अंथरून थोड्या वेळासाठी लवंडले. मास्तरांच्या पत्नी तेव्हा स्वयंपाकघरात खरकटे वगैरे आवरून जेवायला बसणार होत्या.

वडील झोपेतून तासाभराने उठले तेव्हा मास्तर कोठे दिसेनात. वहिनींकडे चौकशी केली तशी त्यांनी काहीतरी कामासाठी मास्तर बाहेर गेल्याचे सांगितले. एव्हाना मास्तरांच्या पत्नीचे जेवणखाण, आवरणे वगैरे उरकले होते व त्या स्वयंपाकघरात भाजी निवडत बसल्या होत्या. पाहुण्यांसाठी ती माऊली पहाटेपासून सतत स्वयंपाकघरात खटत होती. वडील त्यांना सहज पुण्याकडच्या शैलीत म्हणाले, "वहिनी, दमला असाल.... जरा पडा थोडं... बरं वाटेल! " पण मास्तरांच्या पत्नीने माझ्या वडीलांकडे विचित्र नजरेने पाहण्यापलिकडे काहीही प्रतिक्रिया दिली नाही. वडीलांनाही अचानक जाणवले की घरातल्या एकमेव खाटेवर आपण डाराडूर झोपल्यावर पाठीचा त्रास असणाऱ्या वहिनी आडव्या होणार तरी कोठे! काहीसे ओशाळून वडील थोड्या वेळाने पुन्हा म्हणाले, "अहो वहिनी, किती दमाल! मी वाटलं तर बाहेर पडवीत बसतो वारं खात, पण तुम्ही जरा पडा बरं... " पुन्हा मास्तरांच्या पत्नीकडून एक विचित्र कटाक्ष! हा जरासा गोंधळलेला. वडीलांनी त्यांना अजून एक-दोन वेळा आग्रह केला, पण दर वेळी त्या अजूनच गप्प गप्प होत गेल्या. शेवटी वडीलांनी त्यांना सांगणे सोडून दिले. तेवढ्यात सांगावा आल्यामुळे वडीलांना ते ज्या कामासाठी त्या गावी गेले होते त्या कामासाठी बाहेर जावे लागले.

वडील मास्तरांच्या घरी परतले तेव्हा दिवेलागणी होऊन गेली होती. मास्तर काहीतरी लिहिण्यात मग्न तर त्यांची पत्नी स्वयंपाकघरात रात्रीच्या जेवणाची तयारी करत होती. वडीलांनी हातपाय धुतले व बसले तशी मास्तरांच्या पत्नीने आतून गरमागरम चहा आणला. थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर पत्नीने मास्तरांना खुणावले. मास्तरही जरा खाकरले. "अहो साहेब, तुम्हाला विचारयचंच राहून गेलं की! आज दुपारी तुम्ही आमच्या बायकोला नक्की काय सांगत होता? ती तर फार घाबरून गेली होती.... म्हणाली, साहेब मला सारखं पडायला सांगत होते..... तिला वाटलं तिची काय चुकी झाली की काय.... नाहीतर साहेब असं कसं म्हणतील! " मास्तरांचा चेहऱ्यावरही कुतुहल व गोंधळाचे भाव होते. वडीलांनी दुपारचे वहिनींबरोबरचे बोलणे त्यांच्या कानावर घातले, तरीही पतीपत्नीच्या चेहऱ्यावरचा गोंधळ काही मिटेना! थोड्या वेळाने मास्तर जराशा रागावलेल्या स्वरात उद्गारले, "ते काही असो साहेब, तुम्ही आमच्या बायकोला असं सांगायला नको होतं.... तिला पडून बिडून काही लागलं असतं तर मग!! " त्यांच्या ह्या उद्गारांसरशी माझ्या वडीलांना ब्रह्मसाक्षात्कार झाला की ह्या मंडळींना आपल्या बोलण्याचा अर्थच कळालेला नाही. त्यांनी शेवटी मास्तरांचे बोलणे मध्येच तोडत त्यांना 'पडणे' म्हणजे पुण्याच्या बाजूला, पुणेरी भाषेत 'आडवे होणे, आडवे पडणे' ह्या अर्थीही वापरतात असे सांगितल्यावर मास्तरांचा चेहरा पाहण्यासारखा झाला. एवढा वेळ गप्प असलेल्या मास्तरांच्या पत्नी पदरात तोंड लपवून जे खो खो हसत सुटल्या ते रात्री उशीरापर्यंत त्यांना मधूनच हास्याच्या उकळ्या फुटत होत्या. मास्तर आणि वडील देखील बोलीभाषेच्या फरकामुळे घडलेल्या ह्या विनोदाचा किस्सा नंतर अनेक दिवस इतरांना सांगत होते आणि आजही संधी मिळाली की मोठ्या खुबीने अजूनही लोकांना रंगवून रंगवून सांगत असतात!

--- अरुंधती कुलकर्णी.