दिव्यदृष्टी १

    बरीच दुखणी ही सर्वसाधारणपणे अशी असतात की बहुतेक व्यक्तींना कधीतरी त्यांना तोंड द्यावेच लागते.सर्दी, खोकला, गोवर. कांजिण्या ही त्यातील काही. या प्रकारात मोडत नसूनही माझ्या लहानपणी टॉन्सिल्स वाढणे हे दुखणे फारच प्रचारात होते म्हणजे वारंवार सर्दी खोकला होणाऱ्या मुलाला डॉक्टराकडे घेऊन गेले की त्याच्या टॉन्सिल्स तरी  वाढलेल्या असायच्या किंवा नाकातले हाड तरी. निदान आमच्या गावात तरी हा प्रकार सर्रास आढळायचा. आमच्या घरातच माझ्या मोठ्या बहिणीच्या टॉन्सिल्स वाढल्या असे त्यावेळी सरकारी दवाखान्यात जे डॉक्टर होते त्यानी जाहीर केले आणि तिच्या रडण्या ओरडण्या आणि चावण्याचाही मुलाहिजा न बाळगता शस्त्रक्रिया करणारा आपला हात  तिच्या धडपडीमुळे किंवा चावण्यामुळे मुळीही कापू न देता तिच्या टॉन्सिल्स काढल्या तेव्हांच त्याना चैन पडले. टॉन्सिल्सच्या शस्त्रक्रियेनंतर आइस्क्रीम खायला मिळते हा एक त्या काळात चैनीचा भाग असला तरी त्यासाठी त्या दिव्यास तोंड द्यावे असे कोणाला वाटेलसे मला तरी वाटत नाही. माझ्या दुसऱ्या धाडसी भगिनीने तर एकटीने दवाखान्यात जाऊन आपले नाकातले हाड काढून घेतले.या बाबतीत त्या दोघींची आणि त्या शल्यकर्मींचीही  प्रशंसा करावी तेवढी थोडीच असे मला वाटते. 
       माझ्याही बाबतीत या दोन्ही शक्यता (म्हणजे टॉन्सिल्स आणि नाकातील हाड वाढणे) वर्तवण्यात आल्या होत्या तरीही त्यावेळी ज्या डॉक्टरांची नेमणूक आमच्या गावच्या दवाखान्यात झाली होती त्यांना त्यांच्या संथ स्वभावानुसा्र की माझ्या धास्तावलेल्या चेहऱ्याकडे पाहून कोण जाणे या गोष्टीची फार घाई करावी असे वाटले नाही आणि पुढे माझ्या सुदैवाने मोठ्या बहिणीबरोबर मुंबईस जावे लागले तेव्हां तेथील तिच्या डॉक्टर मैत्रिणीकडे जाण्याचा योग आला आणि तिने मला एकदा आ वासायला लावून जे निदान केले त्यानुसार या दोन्हीचीही,म्हणजे टॉन्सिल्स आणि नाकातले हाड काढायची आवश्यकता नाही असे ठरले. माझ्या भगिनींच्या अंगी असलेल्या धाडसाचा लवलेशही माझ्यात नसल्याने  मलाही तसेच व्हावे असे वाटत होते अर्थात अशा बाबतीत माझ्या मताची इतरांनी फार पर्वा केली असती अशातला भाग नाही.पण घरच्या आर्थिक परिस्थितीलाही हे निदान अनुकूल होते.आणि ते माझ्या पथ्यावर पडले.
      डोळे येणे हे दुखणेही असेच फारच सार्वत्रिक असायचे आणि ते अजूनही असते.आणि तेही अगदीच किरकोळ समजले जाते. पण मला मात्र  कळायला लागण्यापूर्वीच खुपऱ्या नावाचे भयानक दुखणे झाले होते आणि त्यावरील त्यावेळचा खुपऱ्या फोडणे हा उपायही तितकाच भयानक होता म्हणजे त्यात पोर कायमचे आंधळे होण्याची शक्यता असे,पण माझ्या सुदैवाने मी त्यातून सहीसलामत पार पडलो आणि त्यामुळेच की काय कोणास ठाऊक डोळे येणे या किरकोळ दुखण्याला मला कधीच तोंड द्यावे लागले नाही.आणि बरीच वर्षे डोळ्यांचा कोठलाची त्रास मला सोसावा लागला नाही.पण वयाची चाळिशी उलटण्यापूर्वीच पुस्तक अथवा वर्तमानपत्रातील बारीक अक्षरे  वाचायला मला त्रास होऊ लागला आणि माझ्या पेशास ते परवडणारे नसल्यामुळे मी मुकाट्याने नेत्रवैद्याकडे जाऊन योग्य त्या नंबरचा चष्मा आणून वापरायला सुरवात केली.
       त्यानंतर अनेक वर्षे मधून मधून नंबर बदलण्यापलीकडे डोळ्यांकडे लक्ष देण्याचे काही कारण पडले नाही.पण एकदा नंबर काढण्यासाठी नेत्रतज्ञाकडे गेल्यावर "काका,आता नंबर बदलून उपयोग नाही कारण त्यामुळे तुमच्या दृष्टीत काही सुधारणा होणार नाही" हे ऐकल्यावर मी दचकलोच,म्हणजे त्याने काका म्हटल्यामुळे नाही (कारण आता मी आजोबाही झालो होतो) पण दृष्टीत काही सुधारणा होणार नाही हे ऐकून ! कारण खर तर मला काहीच त्रास होत नव्हता.असलेल्या चष्म्याने मी वर्तमानपत्रही वाचू शकत होतो फक्त कधी कधी घरात उजेड जरा कमी येतो अशी तक्रार मी करत होतो आणि त्यामुळे  खिडकीसमोर जाऊन किंवा दिवा लावून वाचण्याची पाळी यायची. तरीही त्यांचे पुढचे वाक्य ऐकून बरे वाटले नाही."तुमच्या डोळ्यात मोतीबिंदू वाढत आहे आणि त्यामुळे शस्त्रक्रिया करावी लागेल"
     यापूर्वी शस्त्रक्रिया करण्यापेक्षा त्या टाळण्याचीच संवय असल्यामुळे ही पण टळेल अशी अंधुक आशा वाटत होती.तरी सगळ्यांकडूनच ही शस्त्रक्रिया म्हणजे काय अगदीच किरकोळ बाब ! तुम्ही जाता केव्हां ,टेबलावर आडवे पडता केव्हां आणि शस्त्रक्रिया पार पडते केव्हां हे समजतदेखील नाही.अशा भाषेत या शस्त्रक्रियेचे वर्णन ऐकायला मिळायचे या सगळ्यांमध्ये डॉक्टर्स आणि या दिव्यातून पार पडलेले माझे समवयस्क मित्र यांचा समावेश होता.आजकाल कोणत्याही शस्त्रक्रियेच्या बाबतीत अगदी बायपास सर्जरीच्याबाबतीतसुद्धा  डॉक्टर आणि शस्त्रक्रियातून पार पडलेले मित्र असेच सांगतात. बायपास झालेले आणि टेबलावरच ज्यांना शेवटचा श्वास घ्यावा लागला असे मित्र काही सांगायला भेटूच शकले नाहीत.अर्थात डोळ्याची ही शस्त्रक्रिया आता फारच सोपी झाली आहे याची मलाही कल्पना होती.त्याच वेळी मला अमेरिकेत जायचे होते त्यामुळे शस्त्रक्रिया अगोदर करणे आवश्यक आहे की अमेरिकेतून परत आल्यावर केली तर चालेल यावर विचारणा केल्यावर मात्र मला अपेक्षित म्हणजे अमेरिकेतून परत आल्यावर केली तरी चालेल हेच उत्तर मिळाले.आणि तिकडून आल्यावर हीही कदाचित टाळण्यात आपल्याला यश मिळेल असे वाटून गेले.
      अमेरिकेत सहा महिने राहून परत आलो.अमेरिकेत असताना बरीच पुस्तके वाचली संगणकावर दिवस दिवस वाचन लेखनही केले आणि तरी मला डोळ्यांना कसलाच त्रास जाणवला नाही त्यामुळे डोळ्याच्या बाबतीत डॉक्टरांचीच काहीतरी  गफलत झाली असावी असेच मला वाटू लागले.कारण सहा महिन्यापूर्वी मला जसे दिसत होते अगदी तसेच आल्यावरही दिसत होते.त्यामुळे औरंगाबादला गेल्यावर माझ्या डॉक्टर भावाला मी म्हणालोसुद्धा की मोतिबिंदू वगैरे काही नाही असे मला वाटते.यावर तो हसून म्हणाला ,  "सगळ्यांना असेच वाटते " आणि खरेच त्याच्या नेत्रविशारद मित्रानेही त्यालाच दुजोरा दिला आणि  आता मात्र  लगेचच शस्त्रक्रिया करून  घ्यायला हरकत नाही असाच सल्ला मला दिला. त्यांच्याकडे नवीन लेसरच्या सहाय्याने शस्त्रक्रिया करण्याची ज्याला फेको इमल्शन पद्धत म्हणतात ती सुविधा नव्हती एवढेच नव्हे तर ती त्या वेळी औरंगाबादमध्येही कोठेच नव्हती. आणि असलेली माझ्या डॉक्टर भावाच्या मते अगदीच प्राथमिक स्वरूपाची होती त्यामुळे ती मला पुण्यातच करून घ्यावी लागेल असे त्याचे मत पडले.मी पुण्यात असल्यामुळे मलाही तेच सोयिस्कर ठरेल असे म्हणून लगेच त्याच्या माहितीच्या पुण्यातील नेत्रविशारदाला फोन करून त्याला भेटण्याची तारीखही त्याने ठरवूनही टाकली.थोडक्यात ही शस्त्रक्रिया आता मात्र टळणार नव्हती.