दिव्यदृष्टी २

         माझ्या बऱ्याच मित्रांच्या मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया औरंगाबादजवळील जालना येथील गणपती नेत्रालयात झाल्या होत्या पण माझ्या भावाच्या मते ते पुरेसे अद्ययावत नाही. खरे तर फार पूर्वीपासून मोतिबिंदूच्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत.अगदी माझ्या आठवणीत मी माझ्या मित्राकडे सहज भेटायला गेलो तर एकदम तो डोळ्यावर पट्टी आणि काळा चष्मा घालून बसलेला दिसला आणि मग काय झाले विचारायचे कारणच नव्हते.आणि या मोतिबिंदूच्या शस्त्रक्रियेला खर्च अगदी क्षुल्लक झालेला.जालन्यालाही तो खर्च बराच कमी म्हणजे फक्त पाच हजार रु.इतकाच झालेला.त्या मानाने मी आता करत असलेल्या शस्त्रक्रियेचा खर्च चांगलाच तगडा म्हणजे एका डोळ्यासाठी बावीस हजारापासून ते अगदी सत्तर हजारपर्यंत असे मला सांगण्यात आले होते.मी असे उद्गार भावासमोर काढताच तो म्हणाला अजूनही तुला चार पाच हजारात शस्त्रक्रिया करता येईल.तुझा मोतिबिंदू पिकू दे तुला मुळीच दिसेनासे झाले की तो पूर्वीच्या पद्धतीने काढून टाकू.नेहमीप्रमाणे व्यवस्थित भूल देऊन शस्त्रक्रिया करू.दोन तीन दिवस रुग्णालयात रहा आणि नंतर महिनाभर डोळ्यावर पट्टी,चार पाच महिने काळा चष्मा, वाचायचे नाही टी.व्ही.पहायचा नाही.आहे का तयारी ?" असे ऐकल्यावर मी कशाला हो म्हणतोय ? थोडक्यात या सगळ्या गोष्टींची किंमत एवढी होती. 
         ठरल्याप्रमाणे आम्ही दोघे त्या *** लेसर आय इन्स्टिट्यूटमध्ये  गेलो.खरोखरच अगदी अद्ययावत अशी ती होती. पचेचाळीस व्यक्तींना बसता येण्याएवढा प्रशस्त हॉल,उजवीकडे दोन स्वागतिका,डावीकडे चार तपासणीच्या खोल्या त्यात सर्व आधुनिक उपकरणे,प्रत्येक खोलीत वेगवेगळे नेत्रतज्ञ,शस्त्रक्रिया करण्याचे तीन शल्यकक्ष त्याला प्रत्येकाला जोडून रुग्णाना शस्त्रक्रियेपूर्वी तयार करण्यासाठी खोल्या,स्वच्छतागृहे अशी सगळी व्यवस्था  शिवाय  वातानुकूलन होते हे ओघानेच आले..आम्ही गेल्यावर स्वागतिकेने आम्हाला बसायला सांगून आमची माहिती नोंदवून घेतली.
         तपासणीसाठी परीक्षण कक्षात शिरल्यावर मला एका खुर्चीत बसवून एका परिचारिकेने मला "काका जरा  मान वर करा " म्हणून एका औषधाचे दोन थेंब डोळ्यात टाकून डोळे मिटून घ्यायला सांगितले.आणि मी आज्ञाधारकपणे खुर्चीतच मान वर आणि डोळे बंद अशा अवस्थेत बसलो. थोड्या वेळाने तीच पुन्हा दुसऱ्या औषधाचे थेंब डोळ्यात टाकायला आली तेव्हां कवायत करताना " आइज राइट ’ अशी आज्ञा दिल्यावर सैनिक जसे मान उजवीकडे ठेऊनच चालतात तसा मी मान वर करूनच बसलेला आहे हे पाहिल्यावर "काका,मान सारखी वर ठेवायचे कारण नाही"असे सांगून पुन्हा डोळे उघडायचा हुकूम दिला आणि पुन्हा मान वर करायला लावून दोन थेंब औषध दोन्ही डोळ्यात घालून पुन्हा डोळे मिटायला सांगितले.यावेळी मात्र मी डोळे जरी मिटलेले ठेवले तरी मान मात्र लगेचच सरळ केली.
         या दोन दोन थेंबांनी माझ्या बाहुल्या विस्फारित झाल्याने मला काहीच दिसेनासे झाले आणि त्यानंतर तिने एक फोल्डर आणून " हे वाचा यात मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेची ,या संस्थेची ,होणाऱ्या खर्चाची वगैरे सर्व माहिती दिलेली आहे." असे सांगितल्यावर " आता मला तूच वाचून दाखव " असे म्हणण्याचीच पाळी आली.पण बरोबर बायको असल्यामुळे तिने वाचून दाखवायला हरकत नाही असे मी ठरवले पण ती चष्मा बरोबर बाळगत नाही ( नवरा नाहीतर चष्मा यापैकी एका वेळी एकच) त्यामुळे तोही प्रश्न उरला नाही.पण मग तेथील डॉक्टरणीनेच थोडक्यात " अगदी साधी शस्त्रक्रिया आहे.भूलही द्यावी लागत नाही इंजेक्शनसुद्धा नाही फक्त डोळ्यात एक औषध टाकले जाईल आणि तेवढ्यानेच तो भाग पुरेसा बधिर होईल.नंतर  एक सूक्ष्म छेद घेऊन भिंगाचा ढगाळ झालेला भाग खरवडून टाकला जाईल आणि त्याच छेदामधून नवीन भिंगाचे रोपण करण्यात येईल.बस,ही सगळी क्रिया करण्यास फक्त वीस मिनिटे लागतील.आणि अर्ध्या तासातच तुम्ही बाहेर पडून व्यवस्थित चालू लागाल." हे सगळे आता मी डोळे आणि कान उघडे ठेऊन ऐकत होतो.
           लेसर आय इन्स्टिट्यूट या नावावरून ही शस्त्रक्रिया लेसरच्या सहाय्याने करणार असे मला वाटले पण प्रत्यक्षात या शस्त्रक्रियेसाठी वापरण्यात आलेली पद्धत सोनोलेस आहे.लेसरचा उपयोग करून डोळ्याचा नंबर पूर्णपणे नाहीसा करण्याची शस्त्रक्रिया करतात असे मी नंतर माहिती पत्रक वाचल्यावर समजले.मोतिबंदूच्या शस्त्रक्रियेनंतर ज्या प्रकारचे भिंग बसवण्यात येते त्याच्या किंमतीनुसार शस्त्रक्रियेचा खर्च येतो.                           
            नंतर सर्व तपासण्या निरनिराळ्या खोल्यात होऊन त्या तपासण्यांचे अहवाल पाहून त्यांनीही दोन्ही डोळ्यांच्या शस्त्रक्रिया कराव्या लागतील असाच सल्ला दिला.आणि हे सांगून आमच्या हातातील फोल्डरमध्ये तपासण्यांचे अहवाल लावून त्यातील   एक फाइल व त्यासाठी योग्य तारखा ठरवल्या.डाव्या डोळ्याची सहा एप्रिलला आणि उजव्याची आठ एप्रिलला
           डोळ्याची शस्त्रक्रिया किती साधी याविषयी त्या हॉस्पिटलमध्ये दूरदर्शन पटलावर तिचे चित्रीकरणच दाखवलेले होते आणि तुमच्या डोळ्यावर प्रत्यक्ष शस्त्रक्रिया कशी करण्यात ते येईल हे त्यावर आपल्याला पहायला मिळते.पण मन चिंती ते वैरी न चिंती म्हणतात ना ते अगदी खरे आहे,कारण शस्त्रक्रिया या शब्दाचाच धसका मोठा असतो. माझ्या बाबतीत त्याला आणखी एक कारणही होते.
          माझ्या वडिलांचे एक मित्र होते.या गृहस्थाला नऊ मुलगे आणि एक मुलगी.त्या मुलातील मोठा डॉक्टर.सगळ्यात धाकट्याच्या आणि त्याच्या डॉक्टर भावात वीस वर्षाचे अंतर. धाकट्याच्या डोळ्यात थोडासा दोष होता.म्हणून ह्या डॉक्टर भावाने त्याच्या डोळ्याची शस्त्रक्रिया त्याच्या मित्राकडून करून घेतली आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे त्यातच धाकट्याचे निधन झाले ही गोष्ट माझ्या वडिलांच्या मित्राने मनाला फारच लावून घेतली आणि त्यातून ते सावरलेच नाहीत. त्यानीच ही हकीकत मला सांगितली.अर्थात या गोष्टीला आता चांगली तीस पस्तीस वर्षे झाली होती.त्यामुळे असे काही माझ्या बाबतीत घडेल असे वाटत नसले तरी अगदी एका डिटरजंटच्या जाहिरातीतील दोन वड्या पाण्यात बुडवून " ही पाण्यात गळेल की टिकेल " असे म्हणण्ऱ्या गृहस्थाच्या तालावर " हा डोळा जाईल की राहील?" हे द्वंद्व काही माझा पिच्छा सोडत नव्हते. त्याचबरोबर त्यातल्या त्यात सहा तारखेच्या शस्त्रक्रियेत एका डोळ्याला काही इजा झालीच तर निदान दुसरा एक डोळा तरी राहील अशी मनाची समजूतही  घालत होतो. 
            सहा तारखेच्या शस्त्रक्रियेसाठी अशी मानसिक तयारी झाली त्याचबरोबर त्याच दिवसापासून काही द्रवऔषधीचे थेंब डोळ्यात घालायला सांगितले होते.आमच्या घराजवळील केमिस्टकडे ते सहज मिळतील असे वाटले पण घरी आल्यावर त्या केमिस्टकडे विचारणा केल्यावर ते सर्व मागवून घ्यावे लागतील असे कळले.अर्थात अजून शस्त्रक्रियेला दहा बारा दिवस असल्याने मागवून दोन दिवसात मिळाले तरी चालण्यासारखे होते तरी त्यावेळी मात्र लेसर इन्स्टिट्यूजवळील केमिस्टकडेच घेतले असते तर बरे झाले असते असे वाटून गेलेच.पण तपासणीनंतर बाहेर पडल्यावर डोळ्यातील बाहुली विस्फारणामुळे डोळ्याची अवस्था बरीच बिकट झाल्यामुळे चालणेच मुश्किल झाले होते ,त्यात उन्हाचा कडाका त्यामुळे केव्हा एकदा घरी जातोय असे झाले होते.
          पण सुदैवाने योग्य वेळेत ड्रॉप्स मिळाले.एक प्रकारचे ड्रॉप्स  मिळाले नाहीत असा फोन नेत्रालयात केल्यावर त्यानी दिलेल्या क्रमांकावर फोन केल्यावर त्या केमिस्टने अगदी घरी औषध आणून देण्याची तयारी दाखवली आणि अगदी वेळेवर औषध आणून दिलेही.त्यातील काही दोन्ही डोळ्यात तर काही डाव्याच डोळ्यात घालायचे होते.शिवाय काही तीन वेळा तर काही चार वेळा,परत दोन प्रकारच्या ड्रॉप्स मध्ये अर्धा तास तरी जायला हवा.आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यातील कोणतेही औषध घालायला विसरून चालणार नव्हते.एक दिवस स्मरणशक्तीवर विसंबून रहायचे ठरवले पण ती डोळ्यापेक्षाही इतकी कमकुवत झालेली की एकादे औषध घातले तरी ते घातले की नाही याची शंकाच मनात रहायची. ही सगळी कसरत व्यवस्थित जमावी म्हणून मी एका नोंदवहीसारखी नोंद कागदावर करणे सुरू केले आणि त्यावर औषधाचे नाव आणि घालावयाच्या वेळा लिहून ठेवल्या आणि औषध घातले की त्या वेळेवर  खूण करायची असे केल्यावर सगळी औषधे व्यवस्थित डोळ्यात जाऊ लागली. 
      एक गंमतीची गोष्ट म्हणजे मी मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करणार म्हट्ल्यावर जणु सगळीकडे त्याचे पेवच फुटले.,म्हणजे माझ्या एका मित्राचीही शस्त्रक्रिया त्याच वेळी झाली.माझ्या सौभाग्यवतीच्या मामांच्याही डोळ्याची शस्त्रक्रिया त्याच काळात झाली.औरंगाबादच्या माझ्या मित्राचे बंधू पुण्यात स्थायिक झाले आहेत सहज त्यांची गाठ घ्यायला म्हणून गेलो तर त्यांच्याही डोळ्यावर काळा चष्मा म्हणजे त्यांचीही तीच शस्त्रक्रिया झालेली.हे सगळेजण माझ्याच वयाचे असण्याचा हा परिणाम आणि प्रत्येकाने वेगळ्याच डॉक्टरकडून करून घेतलेली म्हणजे पुण्यात नेत्रतज्ञांचाही सुकाळ झालेला दिसतो.
       शस्त्रक्रियेपूर्वी रक्त आणि लघवीची तपासणी रक्तातील साखरेच्या प्रमाणाच्या निश्चितीसाठी करणे आवश्यक होते.ते प्रमाणापेक्षा अधिक आढळल्यामुळे माझ्या एका  स्नेह्याला शस्त्रक्रियेच्या टेबलावरून परत खाली उतरावे लागले होते. दुसऱ्या एका मित्राला  याच शस्त्रक्रियेपूर्वी  ईसीजी पण काढायला सांगितला होता.पण सुदैवाने मला त्याची आवश्यकता भासली नाही.
          घराजवळच्याच एका पॅथॉलॉजी लॅबमध्ये मी या तपासण्या करायला गेलो. एकदा अगदी सक्काळी सक्काळी काही न खाता पिता आणि दुसऱ्यांदा जेवण करून दीड ते दोन तासानंतर.सकाळी तेथील सहाय्यक मुलीने खुर्वीवर बसवून डाव्या हाताला दंडावर प्रथम स्पिरिटच्या बोळ्याने पुसून मग सुई खुपसून पुरेसे रक्त काढले  आणि  "काका नुसते दाबून ठेवा उगीच हालवू नका " असा प्रेमळ इशारा दिला.आता त्या पोरी काका म्हणतात याची सवय झालीय उद्या आजोबा म्हटले तरी काय बिघडणार आहे ? आणि घरी आलो.दुपारी जेवण करून पुन्हा एकदा तीच कवायत करायला गेलो.तेथील मुलीने रक्त आणि लघवी घेऊन " बसा थोडा वेळ आणि रिपोर्ट घेऊनच जा." असे सांगून माझी तिसरी फेरी वाचवण्याचा प्रयत्न केला. .
       रिपोर्ट घेऊन घरी आल्यावर उघडून पाहिले तर  रक्त व लघवीच्या अहवालानुसार साखरेचे प्रमाण योग्य मर्यादेत होते  पण हेमोग्रम मध्ये रक्तातील एसोनोफिल (एक प्रकारच्या पांढऱ्या पेशी) या घटकाचे प्रमाण जे ६% पेक्षा कमी असायला हवे ते चक्क १८%  आहे असे त्या अहवालात नमूद केल्याचे आढळले.संध्याकाळी भावाला फोन करून अहवाल वाचून दाखवला आणि त्यालाही तो खटकला.त्या घटकामुळे कफ शरीरात आहे असे समजते आणि त्यामुळे खोकला येण्याची शक्यता असते असे तो म्हणाला.पण मला तर गेले कित्येक दिवस मुळीच सर्दी किंवा खोकला नव्हता असे मी सांगितले आणि हे त्यालाही मी नुकताच औरंगाबादहून आलेला असल्यामुळे माहीत होते.पण त्याचा बाऊ न करता तेवढीच चाचणी दुसऱ्या प्रयोगशाळेतून करून घे असा सल्ला त्याने दिला.
         त्या तपासणीसाठी सकाळी काही न खाता पिता जाणे आवश्यक नसल्यामुळे शांतपणे दुसऱ्या प्रयोगशाळेत जाऊन परत रक्ताचा नमुना देण्याचा विचार केला.या प्रयोगशाळेत खुद्द डॉक्टरीणबाईच हजर होत्या त्यामुळे कशासाठी हेमोग्रम हवा आहे ही विचारणा झाली.मी अर्थातच माझी मोतिबिंदूची शस्त्रक्रिया इ. माहिती दिली.त्यावर डॉकटरीण बाईनी मग एवढी एकच चाचणी कशी चालेल असाही प्रश्न विचारला,यावर घडलेली सर्व हकीकत सांगणे मला सयुक्तिक न वाटल्यामुळे असत्याचा आधार घेऊन " माझे बंधु डॉक्टर औरंगाबादला आहेत त्यानी बाकीच्या तपासण्या केल्या एवढी एक आयत्यावेळी सांगितली म्हणून तुमच्याकडे आलो असे सांगावे लागले.व त्यांचे समाधान झाले व रक्ताचा नमुना घेण्याची आज्ञा त्यानी आपल्या सहाय्यक कर्मचाऱ्यास केली. संध्याकाळी अहवाल तयार होता.आश्चर्य म्हणजे त्या अहवालानुसार रक्तातील एसोनोफिलचे प्रमाण फक्त ३% होते. पहिला चुकीचा अहवाल देणाऱ्या प्रयोगशाळेवर ग्राहक न्यायालयात दावा करावा की काय असा फक्त विचार मनात डोकावला पण कृती नाही कारण तेवढा वेळ आणि उत्साह दोन्हींचा अभाव.
       अशा प्रकारे शस्त्रक्रियेला अनुकूल प्रकृती असल्याचा निर्वाळा मिळाला. नेत्रतज्ञानी अहवाल फक्त दूरध्वनीवर वाचून दाखवा प्रत्यक्ष येऊन दाखवण्याची आवश्यकता नाही मात्र शस्त्रक्रियेसाठी येताना बरोबर घेऊन असे सांगितले होते आणि त्याप्रमाणे मी अहवाल  वाचूनही न दाखवता  फक्त माझ्या बंधूंचा हवाला देऊन त्याच्यामते अहवाल योग्य तसा आहे एवढेच सांगितल्यावर त्यांनी ओके म्हणून सहा तारखेस येताना तो अहवाल घेऊन येण्यास सांगितले.
         सहा तारखेस डाव्या डोळ्याची शस्त्रक्रिया करण्याचे ठरले होते आणि त्यासाठी साडेआठची वेळ देण्यात आली होती.आमच्या घरापासून त्यांची संस्था बरीच दूर असल्याने आणि रिक्षावाल्यांचा काही भरवसा नसल्यामुळे मी त्यांना जरा उशीर झाला तर चालेल का असे अगोदरच विचारून ठेवले होते.डाव्या डोळ्यात सकाळी उठल्यापासून एक औषधाचे थेंब सहा वेळा तर दुसऱ्या औषधाचे दोन्ही डोळ्यात चार वेळा ही कसरत करायची होतीच.त्याच्या वेळाही त्यानी लिहून दिल्या होत्या. हे सर्व वेळेत आटोपून नऊच्या आत लेसर संस्थेत पोचायच्या कल्पनेने मला रात्री झोप जरा मधून मधूनच लागत होती,बाकी मी जागाच होतो.शेवटी वेळेत पोचण्यासाठी डाव्या डोळ्यातील शेवटचे दोन थेंब अगदी रिक्षात बसल्यावरच घालायचे मी ठरवले.पण इतके सगळे करून अगदी वेळेत संस्थेत पोचलो तेव्हां आम्ही जणु हॉल झाडायलाच पोचलो.म्हणजे शस्त्रक्रियेपूर्वी सगळी स्वच्छता बरोबर होत आहे याची खात्री आम्हाला करता आली.आमच्या पाठोपाठ थोड्याच वेळाने आणखी एक कुटुंब तशाच शस्त्रक्रियेसाठी तेथे हजर झाले.
        त्या दिवशी एकूण चार शस्त्रक्रिया ठरलेल्या होत्या आणि सगळे आमच्या पाठोपाठ तेथे हजर झालेच.अर्थात माझा पहिला नम्बर होता त्यानुसार मला आणि माझ्यापाठोपाठच आलेल्या गृहस्थांना पाचारण करण्यात आले.शल्यकक्षापूर्वी असलेल्या कक्षात आम्हाला निर्जंतुक पाण्याने हात धुवून निर्जंतुक अंगरखे,विजारी व टोप्या आमचे पहिले कपडे तसेच ठेवून त्यावरून घालायला देण्यात आले.हे कपडे बहुतेक दारासिंग ऐन तारुण्यात असताना त्याचे माप घेऊन शिवण्यात आलेले असल्याने त्याच्या आत कोणत्याही व्यक्तीला अंगावरील कपड्यांसह प्रवेश करून समाविष्ट होणे सहज साध्य होते.त्याप्रमाणे आम्ही दोघांनी ते कपडे चढवून मधल्या खोलीत प्रवेश केला.तेथील बिछान्यावर आम्हाला बसवून आमच्या डोळ्यात काही औषधी थेंब बाहुली विस्फारणासाठी टाकण्यात आले.मी डोळे मिटून पडलो असताना डॉक्टरांनी जवळ येऊन "काय कसे वाटतेय" असे विचारल्यावर सारेगम मधील पची म्हणजे पल्लवी जोशीची आठवण आली पण "अशा वेळेला जसे वाटायला पाहिजे तसच " हे माझे उत्तर न ऐकताच ते आत गेले आणि नंतर लगेचच मला आत बोलावण्यात आले.
       आत एक बिछानेवजा टेबल होते.त्यावर शस्त्रक्रिया उपकरण बसवलेले होते.त्या टेबलावर मला बसून नंतर आडवे होण्यास सांगितले गेले.डोक्याकडील भागास पेशंटचे डोके हलू नये अशा प्रकारचा चाप बसवलेला होता त्यात माझे डोके बसवण्यात आले.प्रकाशझोत माझ्या डोळ्यावर रोखण्यात आला.उजवा डोळा झाकण्यात आला.डाव्या डोळ्याभोवती एक प्रकारचे लेपन करण्यात आले.त्यानंतर त्यावर व्यवस्थित निर्जंतुक स्वच्छीकरण करण्यात आले. त्यानंतर  डोळ्यात घालण्यात आलेल्या द्रवाच्या थेंबामुळे डोळ्याचा भाग बधिर करण्यात आला.आणि प्रकाशाकडे पाहण्याची सूचना देण्यात आली.उजवा डोळा झाकण्यात आला.डाव्या डोळ्याभोवती एक प्रकारचे लेपन करण्यात आले.त्यानंतर त्यावर व्यवस्थित निर्जंतुक स्वच्छीकरण करण्यात आले. माझ्या डोळ्यात घालण्यात आलेल्या द्रवाच्या थेंबामुळे डोळ्याचा भाग बधिर झाल्यामुळे त्या डोळ्यावर दोन ते अडीच  मिलिमिटर लांबीचा छेद घेण्यात आला आणि त्यात स्वनातीत (अल्ट्रासाउंड )  उपकरण घालून अभ्राच्छादित भिंगाचे चूर्ण करण्यात आले आणि त्याच उपकरणातून ते बाहेर शोषण्यात आले.पहिले भिंग काढून त्याच छेदातून  प्लास्टिकच्या भिंगाची घडी आत सरकवण्यात आली आणि योग्य जागी ते उघडले जाऊन तेथे बसवले गेले त्याची थोडेफार हालचाल करून शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांनी ते योग्य जागी आणले आणि तो छेद टाका वगैरे काही न घालता बंद करण्यात आला  .ही सगळी क्रिया चालू असताना योग्य त्या द्रव जंतुनाशकांचा वापर चालूच होता त्यामुळे भिंगाचे चूर्ण त्यात मिसळून त्याचे शोषण सहज करता आले.मला फक्त भिंगाचे चूर्ण होताना खरवडल्याचे जाणवत होते आणि अर्थातच थोडेसे दुखत होते,ते म्हणजे अगदी जोरात डोळा दाबल्यास जसा डोळा दुखेल तशा स्वरुपाचे. कुठल्याच प्रकारची भूल मला दिलेली नसल्याने  डॉक्टरांच्या सर्व क्रिया मला समजत होत्या.पण उजवा डोळ्यावरील आच्छादनामुळे आणि डावा डोळा केवळ प्रकाशाकडे रोखल्यामुळे पाहणे शक्य नव्हते.मात्र हा सर्व भाग माझी बायको तेथील दूरदर्शन पटलावर पहात होती आणि नंतर हे तिने मला सांगितले.
      दहा पंधरा मिनिटातच हा प्रकार आटोपला. आणि माझ्या उजव्या डोळ्यावरील आच्छादन आणि डोक्याचा चाप काढून  लगेचच त्यानी मला उठायला सांगितले.मी उठून बसलो. त्यातील मुख्य शल्यतज्ञाने मला डोळे उघडून आपला हात माझ्यासमोर धरून
" ही किती बोटे आहेत ?"  हा ठेवणीतला प्रश्न विचारला आणि मला ती तीन बोटे आहेत हे दोन्ही डोळ्याने दिसत असल्याने उगीचच खोटे सांगून त्यांची फसवंणूक
करायचे कारण नव्हते पण त्याहीपेक्षा याच शस्त्रक्रियेला पुन्हा तोंड देण्याची इच्छा नव्हती म्हणून " तीन" असे उत्तर देऊन त्यांचे समाधान
केले आणि आता जायला काही हरकत नाही असे त्यानी म्हटल्यावर उठलो. त्यानी मला आधार देण्याचा प्रयत्न केला पण तो न घेताच मी तरातरा चालत बाहेर आलो.