दिव्यदृष्टी ---३

  दिव्यदृष्टीचे दोन भाग लिहून वाचकांसमोर ठेवल्यावर आता वर्षभराने मी आणखी काय नवीन सांगणार की मिळालेल्या दिव्यदृष्टीमुळे मला काही अधिकचे दिसू लागले असा वाचकाचा समज व्हायची शक्यता आहे पण  या भागात आलेला  अनुभव अधिक लोकांपर्य़ंत पोचायला हवा असे वाटत असल्यामुळे लिहावे वाटले.
         नेत्रबिंदूच्या शस्त्रक्रियेपूर्वी शल्यतज्ञानी व नंतरही माझ्या बऱ्याच मित्रांनी  माझा काही वैद्यकीय विमा आहे का अशी विचारणा  केली होती पण दोघांनाही मी नकारात्मकच उत्तर दिले होते.आपण यापूर्वी वैद्यकीय विमा घ्यावयास पाहिजे होते असे मला वाटून मात्र गेले.पण आता ती वेळ गेली होती.माझ्या औरंगाबादच्या मित्रांनी अशीच शस्त्रक्रिया मात्र एक पैसाही न घालवता केली होती कारण त्यानी दूरदृष्टीने (जी दिव्यदृष्टी प्राप्त झालेल्या मला नव्हती हे आता दिव्यदृष्टी प्राप्त झालेल्या त्यांच्या डोळ्यात मला स्पष्टपणे दिसत होते.) योग्य वेळी म्हणजे सेवानिवृत्त व्हायच्या सुमारास वैद्यकीय विमा उतरवला होता.
       मध्यंतरी मी ज्या बॅंककर्मचाऱ्याकडून नेहमी अमेरिकेला जाताना प्रवासविमा उतरत असे त्यानेही मला वैद्यकीय विमा उतरवण्याची विनंती केली होती त्याची आठवण झाली आणि त्याचबरोबर मला एकदम एक गोष्ट आठवली ती म्हणजे सेवानिवृत्तीपूर्वी मीही एक अशा प्रकारच्या विम्याची पॉलिसी घेतली होती.त्यावेळी आयकरात सवलत मिळवण्यासाठी जी बचत करणे आवश्यक असे त्यासाठी माझे एक सल्लागार मित्र यानी ती योजना माझ्या गळी उतरवली होती.त्यानुसार माझ्या पत्नीच्या नावावर ती घ्यायची होती कारण त्या वयोमर्यादेत ती बसत होती.त्या योजनेत एकदाच एक रक्कम भरून दोघांनाही आयुष्यभर पाच लाखापर्यंत रुग्णालय व औषधयोजनेचा खर्च मिळण्याचा करार होता.५८व्या वर्षानंतर काही विशिष्ट रक्कम रोखीने मिळण्याचाही वायदा होता.ही योजना यू टी आय ची ज्येष्ठ नागरिकांसाठीच बनवलेली आहे असे या मित्र सल्लागाराचे म्हणणे होते.मी तरी त्यावेळी केवळ आयकरात सवलत मिळवणे या एकमेव उद्दिष्टाने त्यावेळी त्या योजनेत पत्नीच्या नावावर २४५०० रु.गुंतवले.ही गोष्ट होती १९९३ सालची त्यामुळे त्यावेळी  Senior citizen Unit Plan 1993 असेच त्या योजनेचे नाव होते.आणि आता १६ वर्षानंतर मला त्याची आठवण होत होती.मधल्या काळात एक दोनदा त्या योजनेचा वार्षिक अहवाल आला होता व नंतर मी आणि UTI दोघेही ही गोष्ट जणु विसरूनच गेलो.आणि आता एकदम मला त्या योजनेची आठवण झाली.
         आता त्या योजनेचे काय झाले असेल याचाही मला अंदाज करणे शक्य नव्हते,मध्ये UTI  मध्ये बरेच आर्थिक गोंधळ झाले होते आणि युनिटधारकांना बऱ्याच आर्थिक नुकसानीस तोंड द्यावे लागले होते असे माझ्या कानावर आले होते.आर्थिक गुंतवणुकीच्या बाबतीत मी फारसा तज्ञ नसल्यामुळे माझा कधी फारसा फायदा झाला नाही तरी फारश्या नुकसानीसही मला तोंड द्यावे लागले नव्हते त्यामुळे या UTI  च्या गोंधळाचा मला काही उपसर्ग झाला नव्हता पण आता एकाद्या वेळी या बाबीकडे योग्य वेळी लक्ष न दिल्याचा दुष्परिणाम कदाचित आपल्याला भोगावा लागेल असे वाटून गेले.पण आता शस्त्रक्रिया तर झालीच आहे तरी आपण एकेकाळी गुंतवलेल्या रकमेचे काय झाले ते तरी पहावे म्हणून पत्नीच्या नावावर योजना घेतलेली असल्यामुळे तिच्याच नावाने "माझ्या नवऱ्याची मोतिबिंदूची शस्त्रक्रिया झाली आहे तरी तो खर्च भरून मिळण्यासाठी मला काय करावे लागेल.’ अशी विचारणा करणारे पत्र मी पॉलिसीवर दिलेल्या पत्त्यावर पाठवले.आणि मी ती गोष्ट विसरूनही गेलो.
       जवळजवळ एक महिन्याने बेलापूर येथील UTI च्या कार्यालयातून त्या योजनेचे नाव SCUP असे बदलले आहे आणि कार्यालयाचे नाव UTITSL (Unit Trust of India Technical Services Ltd.) झाले आहे पण पूर्वीचा करार मात्र अजून अस्तित्वात आहे असे पत्र आले. या पत्रास उत्तर पाठवून मी त्याना शस्त्रक्रियेच्या तारखा व खर्च कळवला.पत्राची नोंद रहावी म्हणून यावेळी मात्र पत्र मी कुरियरने पाठवले. या पत्रालाही उत्तर तेवढ्याच गतीने म्हणजे जवळजवळ एका महिन्याने आले.मधल्या काळात मी ईमेल पाठवून (सुदैवाने त्यांच्या पहिल्या पत्रावर ईमेल पत्ता होता) त्यांचा पाठपुरावा करू लागलो कारण ते अधिक सोपे होते पण त्यांच्या कूर्मगतीवर त्याचा फारसा परिणाम होत नव्हता.तरी त्यांच्या या दुसऱ्या पत्रात त्यानी शस्त्रक्रियेचा खर्च मिळण्यासाठी कोणते कागदपत्र आवश्यक आहेत याची यादी दिली होती.त्यात १)रुग्णालयाचे मुक्तिपत्र २)उपचार करणाऱ्या वैद्याचे पत्र ३) रुग्णालयाचे बिल व अहवाल या तीन गोष्टीव्यतिरिक्त आणखी एका गोष्टीची मागणी केली होती ती म्हणजे ३) लॉगबुकची प्रत अथवा अद्यावत केलेले मूळ लॉगबुक.
          ही लोगबुकची काय भानगड आहे ते मला कळेना.UTI च्या कार्यालयास एक पत्र कुरियरने पाठवले व .त्या कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक पत्रावर होता तो मी शल्यतज्ञास देऊन लॉगबुक म्हणजे काय विचारणा करण्यास सांगितले त्यावर लगेचच त्याचे उत्तर आले की त्या क्रमांकावर फोन केला की wait for the operator एवढाच संदेश येत रहातो.मी पण फोन करून तोच अनुभव घेतला.अनेक ईमेल पाठवले तरी एकाचेही उत्तर नाही. शेवटी नेत्ररुग्णालयाच्या दररोजच्या रुग्णांच्या यादीत माझे नाव असणारे पान म्हणजेच लॉगबुक असावे असा तर्क माझ्या डॉक्टर बंधूनी केला आणि त्यानुसार शल्यवैद्यानी माझ्या शस्त्रक्रियेच्या दिवशीच्या त्यांच्या रुग्णालयाच्या रुग्णयादीच्या ज्या दोन पानावर माझे नाव होते ती दोन पाने छायांकित करून मला पाठवली आणि आमच्या मते UTITSL ला हव्या असलेल्या कागदपत्रांची पूर्ती झाली म्हणून तो सर्व कागदपत्रांचा गठ्ठा कुरियरने शस्त्रक्रियेनंतर तीन महिन्यानी पाठवला आणि आता आपला धनादेश केव्हां येतो याची वाट पहात बसलो. 
        पंधरा दिवसांनी खरोखरच UTITSL कार्यालयातून एक कुरियर आले.मी मोठ्या उत्सुकतेने ते उघडले आणि पहातो तो काय मी पाठवलेले सर्व कागदपत्र परत आलेले होते आणि सोबत पत्र आणि त्यात " तुमची शस्त्रक्रिया खर्च भरपाईची मागणीची पूर्तता करता येत नाही कारण मूळ लॉगबुकची प्रत सोबत जोडली नाही,सबब तुमचे सर्व कागदपत्र
परत पाठवत आहोत." मी कपाळावर हात मारून घेतला.
        पुन्हा एकदा लोगबुक या विषयावर पत्रव्यवहार सुरू केला,"तुम्ही लॉगबुक म्हणजे काय हे कळवल्याशिवाय लॉगबुक कसे पाठवणार?" अशा अर्थाचे पत्र कुरियरने पाठवून अनेक ईमेल पाठवले.फोनवर काही कळण्याची तर काही आशाच नव्हती.प्रत्येक ईमेलला व पत्रास लोगबुक पाठवा असा धोशा लावणारे उत्तर मिळत असे.
         मी ज्या मित्र सल्लागाराकडून पॉलिसी घेतली होती दुर्दैवाने आता तेही हयात नव्हते.औरंगाबादच्या डॉक्टर भावाला कळवल्यावर त्याने त्याच्या परिचयाच्या UTI एजंटाला गाठून त्याच्याकडे चौकशी केली त्यावेळी त्याला अशी माहिती मिळाली की लॉगबुक हे UTI कडून प्रत्येक SCUP सभासदास मिळत असते.त्यावर सभासदाने घेतलेल्या वैद्यकीय उपचाराची व त्यासाठी UTI ने दिलेल्या खर्चभरपाईची नोंद असते.हे कळल्यावर मीच UTI ला "तुमच्याकडून अशा प्रकारचे लॉगबुक मला मिळाले नाही आणि आजपर्यंत मला कोठलाही वैद्यकीय खर्च भरपाई UTI कडून मिळाला नाही असे कळवल्यावर तत्परतेने त्यानी लॉगबुक कोणत्या दिवशी पाठवले होते त्या दिवसाची माहिती दिली त्याला एक तपाहून अधिक काळ लोटला होता आणि तसे काही UTI कडून मला मिळालेच नव्हते.त्यामुळे मी जरा कडक शब्दातच UTI ला कळवल्यावर त्यानी ईमेल करून एक शपथपत्राचा नमुना पाठवला.त्यानुसार मी मला मिळालेले लॉगबुक गहाळ केल्यामुळे मला दुसरे मिळावे अशा प्रकारचे शपथपत्र २०० रु.च्या गैरन्यायिक स्टॅम्पपेपरवर करून द्यावे असे पत्रही सोबत जोडले होते.
     शपथपत्र करण्याची शासकीय सेवेत असूनही मला क्वचितच पाळी आली होती.एकदाच यापूर्वी ते केले होते ते माझ्या पत्नीचे नामांतर करताना पण त्याला बरीच दशके लोटली होती.पण काही कामानिमित्त औरंगाबादला जावे लागले आणि भावाने त्याच्या ओळखीच्या एका वकिलाला फोन करून कळवले व त्याने न्यायालयात बोलावले.ओळख आहे या आधारामुळे माझी धास्ती बरीच कमी झाली होती.पण आम्ही न्यायालयात गेल्यावर ओळख असणारा वकीलच हजर नव्हता पण नंतर कळले की त्याची काही आवश्यकता नसते."कायद्याच बोला"मध्ये दाखवल्याप्रमाणे वकील मंडळी आमच्या अंगावर तुटूनच पडली जणु ती आमचीच वाट पहात होती आमचे शपथपत्र करायला अनेकजण तयार होते.आम्ही स्टॅम्पपेपर घेऊनच गेलो होतो त्यामुळे आमचे काम लगेच झालेच पण शपथपत्र या प्रकाराची माझी भीती आणि त्याविषयीचा आदर दोन्हीही एकदमच नष्ट झाली.कारण आम्हाला अजिबात न ओळखणाऱ्या वकिलांची फौज आम्ही काहीही केले असल्याची वा न केल्याची ग्वाही अगदी शपथेवर आणि पाहिजे तशा साक्षीने करायला तयार होते आणि तरीही ते शपथपत्र म्हणजे पवित्र लेख आहे यावर UTI सह भारतातील कोणत्याही शासनसंस्थेचा विश्वास होता.
     तो पवित्र कागदाचा मसुदा UTI ला पाठवल्यावर त्या कार्यालयासही आमच्याकडून लॉगबुक गहाळ झाले यावर विश्वास बसून त्यानी यावेळी मात्र बरीच कार्यक्षमता दाखवून पंध्रा दिवसातच लॉगबुकची नवी प्रत पाठवली.त्यावर आमची छायाचित्रे लावून व इतर माहिती भरून ते आम्ही पुन्हा UTITSL  च्या कार्यालयास पाठवले.त्यात आवश्यक ती माहिती भरून UTITSL कडून पुन्हा ते आमच्याकडे पाठवण्यात आले आणि आता पुन्हा एकदा ते आमच्या शल्यवैद्याकडे आवश्यक ती माहिती भरून ( ती मीच भरली होती) त्यापुढे सह्या करण्यासाठी पाठवले आणि त्यानीही त्वरित सह्या करून व कार्यालयाचे शिक्के मारून परत माझ्याकडे पाठवले.आता पूर्वी पाठवलेले कागदपत्र या लॉगबुकसह पाठवले की आपले काम झाले या गोड समजुतीने मी सर्व कागदपत्र परत २५ जानेवारी २०१० या दिवशी UTITSL  च्या कार्यालयास पाठवले.त्यावेळी माझी शस्त्रक्रिया पार पडून जवळजवळ दहा महिने लोटले होते.
      त्यानंतर आपले काम झाले  आणि लवकरच आपला धनादेश येईल अशा समजुतीत मी राहिलो.पण कसचे काय.माशाने गिळलेल्या माणकासारखे सर्व कागदपत्र गिळून UTITSL चे कार्यालय अगदी स्वस्थ बसले.अनेक ईमेल पाठवूनही त्यांची समाधी भंग पावायला तयार नव्हती.शेवटी दोन महिने वाट पाहून मी इन्टरनशनल कन्झ्यूमर राइट्स प्रोटेक्शन कौन्सिल (ICRPC) कडे दाद मागण्याचे ठरवले आणि  UTITSL तसे  कळवलेही.हो उगीच त्याना धनादेश पाठवायची इच्छा असेलच तर त्यानी मला तसे कळवावे अर्थात त्यांचा तपोभंग या तंबीनेही झाला नाही.आणि अशा प्रकारचे पत्र आपल्याला आले आहे याची पोचही देण्याची इच्छा त्याना झाली नाही.
       अर्थातच मला  ICRPC कडे दाद मागण्याची तयारी करावी लागली.त्यासाठी आतापर्यंतच्या सर्व पत्रव्यवहाराच्या प्रती आणि ICRPC ला देय रु.२५०/-.चा डी.डी.मी कुरियरने ३ मे २०१० या दिवशी पाठवले आणि त्यांच्याकडून त्याची पोच लगेच ईमेलने आली पण त्यात त्यानीही मला दमातच घेतले होते.म्हणजे
"तुमची तक्रार मिळाली त्यावर कार्यवाही ६० दिवसात करण्यात येईल.त्या साठ दिवसात कार्यवाहीविषयी कोणत्याही प्रकारची विचारणा आम्हास करून तुमचा व आमचा वेळ उगीचच व्यर्थ घालवू नये.तक्रारी येतात त्या क्रमाने त्यावर कार्यवाही करण्यात येते.तक्रार नोंदवण्याच्या पद्धतीत तुमची काही चूक आढळल्यास तक्रारीची नोंद घेण्यात येणार नाही.बाहेरगावचे धनादेश स्वीकारण्यात येणार नाहीत पण नजरचुकीने असा धनादेश वटवण्यात आला तर ती रक्कम परत मिळणार नाही.तुमच्या तक्रारीवरील कार्यवाही तुम्हास ईमेलने कळवण्यात येईल.६० दिवसात जर काही समजले नाही तर तुम्ही ईमेल करून आमच्याकडे चौकशी करू शकता." म्हणजे ICRPC हा प्रकार UTITSL च्याही वरताण दिसला.
      हे पत्र अर्थात त्यांच्या पद्धतीचाच भाग होते तरीही आता ६० दिवस हातावर हात धरून बसणे भाग होते.त्याच काळात बराच काळ प्रलंबित असलेले पारपत्र एकदाचे माझ्या हातात पडले आणि लगेच आमची अमेरिकेत जाण्याची तयारी सुरू झाली त्यामुळे शस्त्रक्रियेची रक्कम रु.४६,०००/- व त्यावर कुरियर,शपथपत्र इ.बाबींवर झालेला आणखी हजारभर रुपयांचा खर्च या सगळ्यावर पाणी सोडूनच आपल्याला अमेरिकेस जावे लागणार अशी खात्री मला वाटू लागली.कारण समजा आमच्या गैरहजेरीत धनादेश पाठवण्याची बुद्धी UTITSLला झालीच तरी आम्ही परत येईपर्यंत तो मुदत बाह्य होऊन तो पुन्हा  UTITSL ला पाठवून दुसरा धनादेश मागवणे ही कटकट करावी लागली असती किंवा तो धनादेश आम्हाला मिळालाच नसता तर पुन्हा एकदा शपथपत्र करून UTITSL च्या गळी ते उतरवावे लागले असते.
    पण  अचानक ७मेला UTITSL ने पाठवलेले पत्र कुरियरने मला मिळाले. माझ्या ICRPC च्या दणक्याचा इतका त्वरित परिणाम होईल असे वाटले नव्हते. पण तेथेही माझी निराशाच झाली कारण त्यानी कळवले होते
"तुम्ही शस्त्रक्रिया पुण्यात केलेली असल्याने मुंबईमधील कार्यालय खर्चाची भरपाई करण्यास असमर्थ असल्याने ते सर्व कागदपत्र पुण्याच्या कार्यालयास पाठवले आहेत"
     पुण्यात UTITSL चे कार्यालय आहे ही बातमी मला आताच कळली. मुंबई कार्यालयास ही गोष्ट पूर्वीपासूनच माहीत असणार हे उघड होते अशा परिस्थितीत सुरवातीपासूनच त्यानी मला त्याच कार्यालयाशी संपर्क साधायला सांगायला काय हरकत होती मला समजले नाही.त्या कार्यालयाचा दूरध्वनीक्रमांक मात्र त्यानी माझ्यापासून लपवून ठेवला होता मात्र पत्ता व संपर्क व्यक्तीचे नाव कळवण्याची मेहेरबानी केली होती.माझ्या आळशी स्वभावानुसार मी त्या कार्यालयास माझ्या शस्रक्रिया भरपाईची  मागणी करणारे एक पत्र कुरियरने पाठवले व स्वस्थ बसलो.पण पुण्याचे कार्यालयही मुंबई कार्यालयाचेच अंग होते त्यामुळे माझ्या या पत्राला प्रतिसाद शून्य होता.तोवर आमची अमेरिकेला जाण्याची तारीख ठरली होती त्यामुळे त्या कार्यालयास पुन्हा एक पत्र कुरियरने पाठवून आम्ही अमेरिकेला सहा महिन्यासाठी जात असल्यामुळे माझी भरपाईची रक्कम माझ्या बॅंकेच्या खात्यातच भरावी असे खात्याचा क्रमांक देऊन कळवले.
    अर्थात पुणे कार्यालय या दोन्ही पत्रांची दखल घेईल असे वाटत नसल्यामुळे आंतरजालावर शोध घेऊन पुणे कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक मी मिळवला व त्या कार्यालयाशी प्रत्यक्ष संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू केला.असा प्रयत्न जारीनेच करणे आवश्यक होते कारण मुंबई कार्यालयाप्रमाणेच हे कार्यालयही दूरध्वनीस प्रतिसाद देण्यात अगदी नर्मदेतला गोटाच होते.येऊन जाऊन wait for the operator ची रेकॉर्ड येथे ऐकायला मिळत नव्हती मात्र फोने उचलायला मात्र कोणी तयार नव्हते पण बऱ्याच प्रयत्नांती एकदाचा फोन लागला आणि देवदूताचा यावा तसा संपर्कव्यक्तीचाच स्वर ऐकू आला.मी त्याला मुंबई कार्यालयाचे पत्र मला आल्याचे सांगताच अगदी कमी वेळात त्याने माझी कागदपत्रे पुणे कार्यालयास आलीच नाहीत असा बॉंबगोळा माझ्यावर टाकला पण मी त्याला मुंबई कार्यालयाच्या पत्राचा संदर्भ दिल्यावर चौकशी करण्याचे आश्वासन मात्र त्याने मला दिले.हा अधिकारी माझ्याच उपनावाचा असल्यामुळे की काय सौजन्यपूर्वक बोलत होता आणि त्याच्या बोलण्यात तो काही लपवाछपवी करत आहे असे वाटत नव्हते अर्थात त्याला चौकशीसाठी वेळ देणे आवश्यक होते.
     मधल्या काळात चारपाच दिवस मला  औरंगाबादला जाऊन तेथील काही कामे पार पाडावयाची होती त्यानुसार आम्ही जाऊन परत आल्यावर लगेचच पुणे कार्यालयास दूरध्वनी करण्याचा प्रयत्न मी केला पण या वेळी दुसऱ्याच एका गृहस्थाने तो घेतला व संपर्क अधिकारी अजून आले नाहीत असे त्याने सांगितले.पण आता त्याचा पिच्छा सोडायचा नाही असे ठरवून मी अगदी S.T.D.operator च्या चिकाटीने पुन्हा पुन्हा दूरध्वनी लावत बसलो कारण प्रत्यक्ष जाऊन काहीच न होण्यापेक्षा ही गोष्ट जास्त सोपी होती.अखेर एकदा हवा तो फोन लागला व संपर्कअधिकाऱ्याने माझे कागदपत्र आल्याचे वृत्त मला दिले आणि त्यावर कार्यवाही चालू आहे असे सांगितले.
        अमेरिकेस जायला एक आठवडाच उरला असता पुन्हा एकदा तेवढ्याच चिकाटीने UTITSL च्या पुणे कार्यालयास फोन केला याही वेळी संपर्क अधिकारी बऱ्याच कष्टाने सापडला पण यावेळी मात्र त्याचे उत्तर ऐकून माझा माझ्या कानावर विश्वासच बसेना कारण त्याने "तुमचा धनादेश UTI mutual fund च्या कार्यालयास पाठवला आहे"असे सांगितले यावर तो धनादेश मलाच का पाठवला नाही वगैरे गोष्टींवर चर्चा करण्यापेक्षा तो जेथे पाठवला असे त्याने सांगितले तेथे प्रत्यक्ष जाऊन तो मला मिळेल का याची चौकशी करणे मला इष्ट वाटले.सुदैवाने मी प्रत्यक्ष गेल्यास तो मला मिळेल असे सांगून त्या कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक व सम्पर्क व्यक्तीचे नाव त्याने मला सांगितले.
     सुदैवाने मॉडॅल कॉलनीतील त्या कार्यालयाचा  पत्ता माझ्या एका मित्राच्या घराजवळचाच होता असे मला वाटले आणि त्या मित्राला फोन करून मी तसे विचारल्यावर त्यानेही त्याच्या घरापासून फक्त पाचच मिनिटाच्या अंतरावर ते कार्यालय आहे व आम्ही त्याच्याकडे गेल्यावर त्या कार्यालयात आपण जाऊ असा दिलासा दिला.शेवटी अमेरिकेला जायला फक्त पाचच दिवस उरले असता इतके दिवस वाट पाहिलेला धनादेश मिळण्याची शक्यता निर्माण झाली.मोडेल कॉलनीतील कार्यालयास मात्र काही केल्या फोन लागेना शेवटी पुन्हा UTITSL च्याच पुणे कार्यालयास प्रयत्नपूर्वक फोन लावल्यावर तेथील संपर्क अधिकाऱ्याने तुम्हाला निश्चित चेक मिळेल असे सांगितले आणि दुसऱ्या दिवशी आम्ही तिकडे जायचे ठरवले.
        दुसरा दिवस हा आमच्या जायच्या तयारीच्या दिवसातील एक दिवस होता तरीही पत्नीने मोठ्या मिनतवारीने आपला वेळ या कार्यासाठी द्यायचे कबूल केले कारण पॉलिसी तिच्या नावावर असल्यामुळे तिच्या सहीची आवश्यकता भसली तर उगीच पंचाईत व्हायला नको असे तिला वाटले. पण यावेळी मात्र संपर्काधिकाऱ्याने ज्याच्या शस्त्रक्रियेची खर्च भरपाई त्याच्याच नावावर धनादेश आहे असे सांगितले तरीही नैतिक पाठिंबा असावा म्हणून तिला बरोबर घेतलेच व प्रथम त्या मित्राच्या घरी गेलो.र्तेथून मी व माझा मित्र असे आम्ही दोघेच UTI mutual fund च्या कार्यालयास गेलो.खरोखरच ते कार्यालय मित्राच्या घरापासून हाकेच्याच अंतरावर होते.
     कार्यालयात गेल्यावर ज्या संपर्कव्यक्तीचे नाव मला सांगण्यात आले होते ती बरोबर आजच रजेवर आहे असे कळले.मी माझ्या कामाचे स्वरूप सांगितल्यावर तेथील एका माहीतगार व्यक्तीने असा धनादेश आलाच नाही असा नन्नाचाच पाढा लावला.शिवाय संपर्क व्यक्ती ज्या कपाटात धनादेश ठेवते त्याच्या किल्ल्याही स्वत:कडेच ठेवून रजेवर राहिली होती.थोडक्यात आज धनादेश मिळण्याचे लक्षण काही दिसे ना.UTITSL च्या पुणे कार्यालयातील संपर्क अधिकाऱ्याचे नाव घेऊन त्यानी आज मला धनादेश निश्चित मिळेल असे मी सांगू लागताच एका टेबलाकडे आम्हाला पाठवून तेथील व्यक्तीस डुप्लिकेट चाव्यांचा उपयोग करून ते कपाट उघडून त्यात धनादेश आहेत का याचा शोध घेण्यास सांगण्यात आले.
      त्यावेळी नुकत्याच पडलेल्या जोरदार पावसामुळे त्या भागातील दूरध्वनी यंत्रणा पूर्ण कोसळली आहे असे आम्हाला सांगण्यात आले त्यामुळेच मला काल कितीही प्रयत्न केला तरी फोन लागत नव्हता.(आतापर्यंत फोन लागूनही उपयोग होत नव्हता ही गोष्ट वेगळीच) त्यामुळे चाव्यांचा जुडगा बाळगणारे प्रमुख अधिकारी त्यांच्या भ्रमणध्वनीवर मुख्य कार्यालयाशी बोलत होते त्यामुळे चाव्या मिळण्यासाठी त्यांचा भ्रमणध्वनी आटोपणे आवश्यक होते आणि संपर्कयंत्रणा ठप्प झाल्यामुळे त्याना बरेच काही बोलायचे राहिले होते (गेले बोलायचे राहुनी) असे दिसले त्यामुळे अर्धा तास तरी ते अधिकारी फोनमग्न होते,त्या काळात कार्यालयातील इतर मंडळी जी आमच्याशी बोलण्याच्या मनस्थितीत होती त्यांच्याशी बोलल्यावर धनादेश आलाच नाही पण केवळ आमचे समाधान व्हावे म्हणूनच कपाट उघडण्याचा उपद्व्याप करायचा असे सार्वत्रिक मत आढळले.ज्या संपर्क व्यक्तीकडून मला चेक घेण्यास सांगण्यात आले होते तिने चाव्या घेऊन रजेवर जायला नको असे मतही व्यक्त झाले.त्यामुळे धनादेश मिळण्याची आशा मी सोडून आज नाही मिळाला तर काय करायचे यावरही त्यांच्याशी चर्चा सुरू केली.
        सुदैवाने माझी अडचण सांगितल्यावर मी ज्या माझ्या मित्रास बरोबर घेऊन गेलो होतो त्याला अधिकारपत्र दिल्यास धनादेश त्याच्या स्वाधीन करण्याची तयारी मात्र कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी दाखवली.आणि त्या मित्रास ते कार्यालय घरापासून हकेच्याच अंतरावर असल्यामुळे दररोज दोन चकरा तिकडे माराव्या लागल्या तरी हरकत नव्हती त्यामुळे मी आता अधिकारपत्र काय लिहावयाचे याचाच विचार करू लागलो.तितक्यात साहेबांचे बोलणे संपून त्यांच्या ताब्यातील किल्ल्यांचा गठ्ठा घेऊन आमच्या टेबलावरील कर्मचारी आला.त्या गठ्ठ्यात अक्षरश: शेकडो किल्ल्या होत्या आणि त्यातील एकही किल्ली त्या कपाटास लागत नव्हती.त्यावेळी एक उत्साही मॅडम येऊन किल्ल्या लावण्याचा प्रयत्न करू लागल्या.पुन्हा एकदा रजेवर राहून किल्ल्या कार्यालयात न ठेवणाऱ्या मॅडमचा उद्धार झाला.तेवढ्यात उत्साही मॅडमना काहीतरी आठवले.त्यांच्या आठवणीनुसार एक किल्ल्यांचा जुडगा त्या कपाटाच्या जवळच ठेवलेला असतो व त्यातील एक चावी कपाटाच्या एका ड्रॉवरला लागते व तसा प्रयत्न त्यानी केल्यावर खरोखरच तो ड्रॉवर उघडला आणि सुदैवाने त्यामध्येच धनादेशांची फाइल होती,आता त्यात फक्त माझा धनादेश असणे आवश्यक होते कारण उत्साही मॅडमना तो पाहिल्याचे आठवत नव्हते,पण माझ्या सुदैवाने त्यांच्या आठवणीस सत्यस्वरूप न येता प्रत्यक्षात त्या दोन धनादेशात माझाही एक होता.असो अशा प्रकारे माझ्या नेत्रबिंदू शस्त्रक्रियेच्या खर्चभरपाईचे घोडे एकदाचे धनादेशाच्या गंगेत न्हाले.थोडक्यात काय कधी नव्हे तो मी चिकाटी न सोडता एकाद्या गोष्टीचा पाठपुरावा केला आणि तो फळास आला.
           यात ICRPC चा हातभार होता किंवा नाही हे कळण्यासाठी मी लगेचच त्याना ईमेल करून माझे काम झाल्याचे कळवले.त्यावर त्यानी उत्तरादाखल फक्त समाधान व्यक्त केले. त्यावरून माझ्या तक्रारीस अजून साठ दिवस झाले नाहीत म्हणून  त्यानी कार्यवाही सुरू केली नसावी असा तर्क मी केला.कदाचित त्यांच्याकडे मी जात आहे हे कळल्यामुळेही UTITSL ला काहीतरी करावे अशी बुद्धी झाली असावी असो दिव्य दृष्टीची कहाणी आता खऱ्या अर्थाने मला दिव्य दृष्टी देऊन गेली.