दिव्यदृष्टी ३

      डाव्या डोळ्यातील मोतिबिंदू काढून डोळा शाबूत राखून माझ्या अंगावरील डगले आणि तसल्याच कापडी स्लिपर्स मधल्या खोलीत सोडून मी शल्यकक्षाच्या बाहेर आलो.त्या डोळ्याला काही वेगळे वागवायला हवे अशी सूचना नसल्याने मी नेहमीप्रमाणे बाहेर येऊन स्वागतकक्षातील खुर्चीत बसल्यावर परिचारिकेने लगेच " काका डोळ्यावर गॉगल लावा " असा हुकूम सोडला.मला काळा चष्मा वापरण्याची संवय नसल्यामुळे खास या शस्त्रक्रियेसाठी म्हणून तो मी आदल्याच दिवशी विकत घेतला होता.तो अर्थातच फार उच्च प्रतीचा होता अशातला भाग नव्हता.त्यामुळे तो डोळ्यावर लावताना त्याने जरा कुरकुर केल्याचा भास झाला.थोड्याच वेळात स्वागतिकांपैकी एकीने आम्हाला बोलावून आता काय काळजी घ्यायला हवी हे सांगितले.त्यामध्ये अंघोळ करताना त्या डोळ्यात पाणी जाऊ द्यायचे नाही म्हणजे अंघोळ डोक्यावरून करायची नाही आणि हे पथ्य आठवडाभरच पाळावे लागेल.प्रखर प्रकाशात काळा चष्मा घालावा या दोन गोष्टी महत्वाच्या होत्या.याशिवाय डावा डोळा झाकून वाचन करायला किंवा टी.व्ही.पहायलाही हरकत नाही अशी अनुज्ञा दिल्यामुळे वेळ कसा घालवायचा हा प्रश्न उरला नाही.सकाळी आत शिरल्यावरच मी धनादेश सही करून ठेवला होता (हो उगीच सहीत बिघाड व्हायला नको.)त्यावर बाकीच्या गोष्टी त्यानाच भरायला सांगून तो त्यांच्या ताब्यात दिला.आता डोळ्यात घालायच्या तीन प्रकारचे थेंब कसे आणि केव्हां घालायचे याचा तक्ताच त्यानी करून दिला.आणि शस्त्रक्रिया झाल्यावर एकच तासात आम्ही तेथून बाहेर पडलो.
     घरी पोचताच मी काळा चष्मा उतरवला आणि मी इतके दिवस आपल्याला सगळे काही छान दिसत आहे या भ्रमातच वावरत होतो हे दोन डोळ्यांच्या पहाण्याच्या क्षमतेतील फरकाने जाणवले.अगदी आपल्या जुन्या घराला नवा रंग दिल्यावर ते जसे चकाकू लागते तशीच प्रत्येक वस्तू उजवा डोळा झाकून फक्त डाव्या डोळ्याने पाहिली तर दिसू लागली.अर्थात त्या डोळ्यावर फार ताण पडू नये म्हणून मी घरातही गॉगल घालूनच वावरत होतो.त्यादिवशीसुद्धा एका डोळ्याने वाचायला हरकत नाही असे सांगितले असल्याने माझ्या नेहमीच्या चष्म्याची डाव्या डोळ्याची काच आच्छादून उजव्या डोळ्याने मी सकाळी न वाचलेला पेपर वाचायला लागलो पण थोड्याच वेळात डोळ्यावर ताण पडू लागल्यासारखे वाटल्यामुळे त्यादिवशी दोन्ही डोळ्यांना विश्रांती द्यायचे ठरवून व. पु. पु.ल.वगैरेंच्या ध्वनिफिती ऐकण्याची बरेच दिवस  राहून गेलेली  इच्छा पुरी करून घेतली.
      एक डोळा झाकून सर्व व्यवहार करणे जमत असले तरी बऱ्याच गोष्टींचा अंदाज येत नसे त्यामुळे एकाच डोळ्याच्या सहाय्याने क्रिकेटमध्ये प्रावीण्य संपादन करून भारताच्या चमूचे नेतृत्व करणाऱ्या टायगर पतौडीचे खरे कौतुक त्यावेळी वाटले.
       आता जास्त काळ गॉगल घालून वावरत असल्याने डोळ्यात घालावयाच्या औषधांची नावे वाचणे जरा त्रासदायक वाटत होते त्यामुळे डोळ्यात औषधी थेंब घालण्याची जबाबदारी सौभाग्यवतीवर टाकावी लागली आणि तिच्या आणखी एका ह्कुमाची तामिली करण्याची पाळी माझ्यावर आली.आतापर्यंत मी माझ्या पद्धतीने थेंब टाकत होतो पण आता तिची बरेच दिवसाची सुश्रुषा करायची हौस उफाळून वर आली.तीन प्रकारच्या औषधी,त्यात काही सहा वेळा,काही चार वेळा,काही तीन वेळा शिवाय दिवसागणिक त्याचे टाकण्याचे बदलते कोष्टक यामुळे तिलाही मी माझ्याप्रमाणेच कागदावर नोंद करायला सांगितले.तरी त्यातल्या त्यात सध्या महत्वाचे थेंब डाव्या डोळ्यातच घालायचे होते.तरीही मी कुठल्यातरी गोष्टीत मग्न असलो की लगेच तिचा हुकूम सुटायचा "चला नेवॅनॅक (किंवा विगॅमॉक्स किंवा प्रेडनिसोलेन असेटेट यापैली कोणतेतरी थेंब )घालायची वेळ झाली."की लगेच मला हुकुमाची तामिली करायला लागायची.शिवाय त्या औषधांवरील सूचनांचे तंतोतंत पालन ती करत असल्याने प्रत्येक वेळा आपले हात जंतुनाशकाने धुवून घेत तर होतीच त्याच बरोबर डोळ्याबाहेर ओघळणारा थेंब मी माझ्या नेहमीच्या नॅपकिनने पुसलेला तिला चालत नसेल त्यासाठी तिने कागदी हातरुमालांची एक पेटी आणली होती प्रत्येक वेळी त्यातील एक रुमाल काढून त्यानेच मी डोळा पुसतो की नाही यावर तिचे बारीक लक्ष असे.
     अशा कडक सुश्रुषाव्यवस्थेतही कधी कधी ती पण थेंब घालायचे विसरली तर मला आनंद झाला तरी तो दाखवणे क्षम्य नव्हते.नंतर दोनच दिवसांनी उजव्याही डोळ्याची शस्त्रक्रिया झाल्यावर उजव्या आणि डाव्या दोन्ही डोळ्यात वेगवेगळी औषधे आणि वेगवेगळ्या वेळी घालण्याचे काम इतके वाढले की त्यात मुद्दाम गोंधळ करण्याची आवश्यकताच नव्हती तो आपोआप होतच होता.त्यात तिला मदत करण्याच्या हेतूने एकदा मी सकाळी उठल्या उठल्या        
वेळापत्रक तयार करून ठेवले पण यापूर्वी ती प्रत्येक डोळ्याचे वेगळे बनवीत असे तसे न बनवता दोन्ही डोळ्यात ज्या औषधी एकाच वेळी घालायच्या होत्या त्यांचे वेळापत्रक करताना वेळ लिहून त्यापुढे दोन्ही डोळ्यात असा शेरा मारला.
         त्यादिवशीच्या पहिल्या औषधसिंचनापूर्वी आपण केलेल्या कामाचे कसे कौतुक होते हे मी पाहू लागलो तर माझे वेळापत्रक रद्द करून बाईसाहेब परत दुसरे वेळापत्रक करण्यात गुंतलेल्या.ती म्हणजे न्यूटनच्या वंशातली असावी कारण  त्याला जसे दोन्ही मांजरांना आत शिरायला स्वतंत्रच भोक दाराला पाडणे आवश्यक वाटत होते तसे दोन्ही डोळ्यांचे वेळापत्रक स्वतंत्रच असले पाहिजे असा तिचा आग्रह असावा असा माझा शेरा ऐकवून त्यावर मी माझा मुद्दा पटवून देण्याचा नको तो शहाणपणा करताना तिच्या शहाणपणाचा वेध घेण्याचा केलेला प्रयत्न माझ्या अंगलट येऊन डोळ्यात थेंब घालण्या ऐवजी डोळ्याबाहेर येणारे (अर्थात तिच्या) थेंब कसे थांबवावेत याचाच पेच मला पडला.
          दोन्ही डोळ्याच्या शस्त्रक्रियेनंतर बऱ्याच गोष्टी मला उजळल्यासारख्या वाटू लागल्या आणि आपल्याला दिव्यदृष्टी प्राप्त झाले असे मी ज्यांला त्याला सांगू लागलो त्याच उत्साहात ," बायकोही जास्त गोरी दिसू लागली " असा शेरा मी मारल्यावर " आता हे काय वय आहे का बायकोचे गोरेपण पहाण्याचे " असा शालजोडीतील आहेरही मला मिळाला.त्याच काळात काळा चष्मा बरेच वेळा काढणे घालणे होत असल्याने त्यालाही आपल्यावर फारच अत्याचार होत असल्याचा भास होऊन एकदा काढलेला पुन्हा घालू लागलो तर अगदी शिवधनुष्यासारखा त्याचा मधोमध भंग झाला आणि अर्थातच तो बदलून आणण्याचे अवघड काम करायला सौभाग्यवतीलाच पाठवावे लागले.दुकानदाराने "गॉगलसारख्या वस्तूला हमी नसते" असे सांगून तो बदलून न देण्याचा प्रयत्न करून पाहिले पण तिने त्याला कसे पटवले कोण जाणे पण तसाच दुसरा गॉगल घेऊन विजयी मुद्रेने ती घरी आली एवढे मात्र खरे.
          हळू हळू माझ्या डोळ्यांच्या अवस्थेत सुधारणा होत असतानाच पुन्हा उजवा डोळा लाल दिसू लागला आणि दुखू पण लागला आणि शस्त्रक्रियेच्या पूर्वी माझ्या सोबतच्या गृहस्थांचे,"माझ्या एका डोळ्याची शस्त्रक्रिया झाली पण तो पुन्हा दुखू लागला आणि म्हणून मध्ये बराच वेळ गेला" असे मला सांगितल्याची आठवण झाली पण सुदैवाने पुन्हा एक भेट लेसर सेंटरला दिल्यावर पुन्हा तपासणी करून काही थेंब पुन्हा काही काळासाठी फक्त त्या एकाच डोळ्यात घालण्याचा आदेश मिळाला आणि पुढे पंधरा दिवस त्याची तामिली केल्यावर दोन्ही डोळ्यात काही दोष उरला नाही असे अजूनपर्यंत तरी म्हणावे वाटते.

समाप्त