एकदा...
एकदा तिच्या संगे मी पावसात भिजलो होतो...
बेलगाम आवेगाच्या वादळात घुसलो होतो १
वादळात घुसल्यावरती वाढले पुराचे पाणी...
कळले न कधी लाटांनी मी पुरा वेढलो होतो २
वेढताच मज लाटांनी अदृश्य किनारे झाले...
बुडल्यावर लोक म्हणाले मी खोल उतरलो होतो ३
उतरलो खोल होतोच जगण्याचा ठाव बघाया...
फेकून मुखवटे सारे नागवा जाहलो होतो ४
नागवेपणाचे ओझे पेलवले नाही जेव्हा...
लाजेच्या निकडीसाठी वस्त्रात अडकलो होतो ५
वस्त्रात अडकल्यावरती लपवीतच गेलो सारे...
वाटले जगाला तेव्हा मी सुंदर सजलो होतो ६
सजल्यावर स्वागत होते कळताच सभ्यता शिकलो...
पोषाखी अस्तित्वाच्या गर्दीत हरवलो होतो ७
हरवलो असा की आता पाऊस नकोसा होतो...
तो धुंवाधार आल्यावर खिडकीशी थिजलो होतो ८
हेमंत राजाराम