... अश्रू पुसले पदरांनी!

....................................................
... अश्रू पुसले पदरांनी!
.....................................................

उगाच मारू नयेत गमजा उंचीच्या, या शिखरांनी!
सहजपणाने गिळले त्यांना युगायुगांच्या उदरांनी!

ही एकाकी हवा म्हणाली गुदमरणाऱया गर्दीला...
'भकास व्हावे खेड्यांनी अन बकाल व्हावे शहरांनी! '

एखाद्याला रंग वेगळा का न लाभला कधी तरी...?
फुलाफुलांशी केली सलगी आजवरी ज्या भ्रमरांनी!

उदासवाण्या सांजसावल्यांपरी लांबती कशास हे...?
आल्यासरशी निघून जावे आठवणींच्या प्रहरांनी!

टिपून घ्यावी पुनवरात ही समोर आल्यावरी अशी...
डोळ्यांनी तर डोळ्यांनी अन अधरांनी तर अधरांनी!!

वेडाविद्रा, दीड शहाणा... कधी असा़; तर कधी तसा...
उगाच सांगू नये माहिती मलाच माझी इतरांनी!

दोन प्रवासी निघून गेले दोन दिशांना कायमचे...
जीव राहिले खिळून; कसला खेळ खेळला नजरांनी?

क्षणभर का होईना, व्हावी धूळ सुगंधी अन हिरवी....
पाय मोकळा करून यावे माळावरती बहरांनी!

माजघराची माजघरातच दुःखे व्याली अन मेली...
हिशेब नाही किती पोरके अश्रू पुसले पदरांनी!

- प्रदीप कुलकर्णी
.......................................................
रचनाकाल  ः  14 जुलै 2009
.......................................................