मन तुझे वाचायचे...!

.........................................
मन तुझे वाचायचे...!
.........................................

वाटते यावे तुला भेटायला... यावे कसे?
वाटते जावे तुला विसरूनही... जावे कसे?

पाखरांसाठी असे केलेस मोठे काय तू!
पाखरांनी गीत आकाशा तुझे गावे कसे?

पाहिजे डोळ्यात अश्रू रोज एखादा तरी...
दुःख आहे रोजचे हे... कोरडे प्यावे कसे?

सारखा माझ्यातला मी सांगतो मज 'धाव तू... '
सारखी दमछाक! मी मजलाच गाठावे कसे?

प्रश्न दानाचा नसे हा... दानतीची बाब ही...
जे दिले नाहीस तू ते सांग मी घ्यावे कसे?

एकदाही नाव माझे घ्यायचे नाही तुला....
मी तरी आय़ुष्य हे केले तुझ्या नावे कसे?

मित्र मित्राला विचारी, 'का पुढे गेलास तू? -
- जे मला माहीत नाही, ते तुला ठावे कसे!!'

ओसरावा पूर... माझे पुण्य इतके कोठले?
या जिवाच्या तान्हुल्याला पैल मी न्यावे कसे?

बोलताना सारखी मिटतेस का डोळे अशी?
मन तुझे वाचायचे... मी सांग वाचावे कसे?

- प्रदीप कुलकर्णी

.........................................
१६ जुलै २००९

.........................................