(मन तुझे वाचायचे...!)

आमची प्रेरणा : प्रदीपपंतांची मस्त गझल, "मन तुझे वाचायचे"

वाटते यावे तुला खेटायला... यावे कसे?
वाटते जावे तुला चुंबूनही... जावे कसे?

"पाखरांसाठी" अशी लिहिलीत गीते खूप मी,
शिकवतो तुज गीत एखादेच, ते गावे कसे?

पाहिजे ताटात तंगडी रोज एखादी तरी...
ना तरी चकणा हवा हो... कोरडे प्यावे कसे?

सारखा माझ्यातला मी सांगतो मज 'डाव तू' !
सारखी पळतेस ! मी तुज सांग गाठावे कसे?

प्रश्न गझलेचा नसे हा... गझलियतची बाब ही!
जे नसे आडात ते पोहऱ्यातुनी घ्यावे कसे?

एकदाही नाव माझे घ्यायचे नाही तुला...
तरीहि मंगळसूत्र माझ्या घातले नावे कसे ?

चोर चोराला विचारी, "का पुढे गेलास तू?-
-ठाव मजला ठाव नाही, हे तुला ठवे कसे ?

गोपिकांचा पूर...? माझे पुण्य इतके कोठले?
एक चिंता, की चराया बैल मी न्यावे कसे?

बोलताना सारखी मिटतेस 'डोळा' का अशी?
तव मनी हे काय नक्की? सांग वाचावे कसे?

लाटणी, सोटे नि लाठ्या काय हाती घेउनी?
सांग चैतन्या कवींनी तुजसि मारावे कसे ?