संगीतातील प्रत्येक रागाला एक नादप्रकृती असते. त्यातून भावनिर्मिती होते. मानवी भावनेला घट्ट कवटाळण्याचे विलक्षण सामर्थ्य यात असते. जसा यमनकल्याण आर्जवी, गोरख कल्याणमध्ये प्रासादिक तर भैरवीमध्ये समर्पण भाव आहे. या रागांतील प्रत्येक स्वर आणि त्याचा नाद माणसाच्या अंतरंगात त्या त्या भावनांचे तरंग उमटवितो.
असाच पटदीप हा वियोगाची भावना व्यक्त करणारा राग आहे. मात्र ही भावना तो आक्रस्ताळेपणाने मांडत नाही. आपले गाऱ्हाणे तो कळकळीने सांगतो; पण वेदनेत अडकूनही पडत नाही.
मर्मबंधातली ठेव ही... हे नाट्यगीत पटदीपच्या स्वभावाची प्रचिती देणारे आहे.
मर्मबंधातली ठेव ही प्रेममय
""ठेवी जपुनी सुखाने दुखवी जीव... ''
यातील "प्रेममय'मधील कोमल गंधार मध्यमावरून ओघळून रिषभाच्या आधाराने षडजावर झेपावतो. अहाहा किती हळुवार हो ही जपणूक!
पुढे सुखाने दुखवी जीव... या गाऱ्हाण्यात मध्यम आणि पंचमावरून निषादावर आदळणारा स्वर षडजावर येतो. आणि धैवताला कवटाळून पंचमावर विसावतो. त्यावेळी त्यातील वेदना ऐकणाराला टोचली नाही, तरच नवल!