माळ

कुणी कसतही नाही; काही पिकतही नाही
कधी चुकून येणारं; बीज रुजतही नाही

असा ओसाड हा माळ; रखरख, धुळधूळ
ऋतू आले, गेले, गेला; कोण जाणे किती काळ

एका निसरड्या जागी; एक छोटीशी विहीर
एक रहाट्याचा दोर; आणि गळकी घागर

जीव जाऊ जाऊ म्हणे; ओढ वाटे अनिवार
पण ठरवून सांगा; कधी गोळा होतो धीर?

तिन्हीसांजेला एखाद्या; अवचित दान येते
काही बेसावध क्षण... आणि पाऊल वळते

आत डोकावतो, लख्ख मीच मला दिसू येतो
चार थेंब घागरीने; मग अंगावर घेतो

थेंब चारच अवघे; तरी चिंब चिंब होतो
देह ठेवून काठाशी; जीव खोल खोल जातो

खोल खोल सापडतो; माझ्या आकाशाचा तळ
देतो वचन मी त्याला - फुलवीन सारा माळ

क्षण क्षणात संपती; मीही माघारी फिरतो
माळ दूर दूर जाता; पुन्हा कोरडा मी होतो

पुन्हा पुन्हा ठरवून;  टाळतो मी आठवण
पुन्हा पुन्हा टाळताना; काढतो मी आठवण

माझ्या मनाचा तो माळ; माळावरची विहीर
कवितेचा एक दोर; आणि शब्दांची घागर...

कवितेचा एक दोर; आणि शब्दांची घागर...