ज्येष्ठांची अंगतपंगत

जेष्ठांची दहीहंडी झाल्यावर जेष्ठ जरा जास्तच उत्साहित झाले होते.असेच सर्व जेष्ठ श्री. देशपांडे यांच्या घरी जमले असता खूप गप्पा रमल्या. गप्पा मारता मारता कोणीतरी सुचवले की नाहीतरी बायका दर तीन चार महिन्यांनी अंगतपंगत करीत असतात व मस्ती मौज करतात तर मग आपण जेष्ठ पुरुषांनी एकत्र अंगतपंगत का करू नये? त्यात काय मजा असते याची लज्जत घेऊ या‍हाले ही कल्पना सर्वांना एवढी आवडली की सर्व जण अंगतपंगत करण्यास तयार झाले. सर्वजण निवृत्त असल्याने या कार्यक्रमासाठी रविवारच पाहिजे वगैरे कारणे नव्हती. त्यामुळे उद्याच अंगतपंगत करण्याचे ठरले. मग साऱ्यांचा उत्साह पाहून देशपांडे म्हणाले, " ठीक आहे. ठरले तर मग अंगतपंगत करण्याचे. पण अट अशी की स्वयंपाकातील पदार्थ पुरुषांनीच बनवावयाचे. आता सर्वांनी एकत्र स्वयंपाक करून बनवावयाचे की प्रत्येक जण एकेक पदार्थ करून आणणार व मग सर्वांनी एकत्र बसून जेवावयाचे ते ठरवावे लागेल. " दाते म्हणाले, '' सर्वांनी एकत्र स्वयंपाक करावयाचा म्हटले तर खूप गोंधळ होईल. कामापेक्षा बोलणेच जास्त होईल‌. स्वंयपाकाला जर दोन तास लागत असतील तर चार तास लागतील. त्यापेक्षा प्रत्येकानी एकेक पदार्थ करून आणावयाचा व सर्वांनी देशपांडे यांच्या घरी एकत्र बसून जेवावयाचे व अंगतपंगत साजरी करावयाची. " ही कल्पना सर्वांना पटली. आता कोणी कोणता पदार्थ आणावयाचा ते ठरवावे लागेल हे लक्षात घेऊन श्री.अंबुले म्हणाले, " मला छान भात करता येतो मी भात आणीन. " मग दाते म्हणाले, " मी आमटी करून आणेन. " दिवाकरांना सर्वात अवघड काम पोळ्या करण्याचे मिळाले. देशपांडे म्हणाले, " मी कांदा बटाट्याचा रस्सा आणतो. " चुळबुळ करीत बसलेले आठवले म्हणाले, " आता राहिले स्वीट तर मी खीर बनवून आणतो. " दवेला नेहमीची कढी व डॉ. चौधरीना वऱ्हाडी ठेचा आणण्यास सांगण्यात आले. घनश्याम देवांना कांदाभजी आणण्यास सांगण्यात आले.

श्री. अंबुले आनंदाने घरी आले. आपण किती सोपा पदार्थ आपल्या पदरात पाडून घेतला याचाच आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. घरी आल्यावर त्यानी सौ. ला आजच्या सभेत कशी आमची अंगतपंगत ठरली व मी त्यात कसा सोपा पदार्थ निवडला ते सांगितले. मीनाताई म्हणाल्या, " मी कांही मदत करू का? " अंबुले म्हणाले , " बिलकुल नाही. तू तुझ्या कामाला जा. मगच मी भात करावयास घेईन. " सौ. मीनाताई ठीक आहे म्हणून कामास गेल्या. आता सर्व घर अंबुले यांच्या हातात आले. त्यानी प्रथम तांदळाचा डबा काढला. उघडून बघतात तर काय? सर्व निवडलेले तांदूळ संपलेले होते. मग काय त्यानी दुसऱ्या डब्यातून आपल्याला पाहिजे तेवढे तांदूळ पातेल्यात घेतले. या तांदळात त्याना थोडा कचरा आहेसे वाटले. म्हणून ते निवडून घेण्यासाठी त्यानी ते एका ताटात घेतले. दोळ्याला चष्मा लावला व खिडकीजवळ उजेडात बसून ते तांदूळ निवडू लागले. तांदळात त्याना पांढरे गारेचे खडे, बरड असे घटक दिसून आले. मग त्यानी काळजीने सर्व तांदूळ निवडला. यात त्यांचा पाऊण तास गेला. सर्व तांदुळ एका पातेल्यात घालून ते तांदूळ चांगले पाण्याने धुतले. मग त्यानी धुतलेले तांदूळ कुकरच्या भांड्यात टाकले व गॅस चालू केला. गॅसवर कुकर ठेवला व दहा मिनिटांनी कुकरची शिटी झाली की आपला पदार्थ तयार होईल. तोपर्यंत हॉलमध्ये बसून पेपर वाचू असा विचार करून ते हॉलमध्ये पेपर वाचत बसले. पेपर वाचता वाचता अर्धातास कसा निघून गेला ते त्याना कळलेच नाही. पण लक्षात आल्यावर धावत स्वयंपाकघरात जावून कुकरची शिटी का झाली नाही ते बघू लागले. पाहतो तो काय गॅस बंद होता पण शेगडीचे बटन चालू होते. अंबुले त्यामुळे बरेच अस्वस्थ झाले. गॅस सर्व घरात पसरला तर अपघात होईल या विचाराने सर्व खिडक्या दारे सताड उघडी ठेवली. त्यामुळे जर घरात गॅस असेल तर बाहेर जाईल असे त्याना वाटले. पण गॅसचा वास बिलकूल येत नव्हता. त्यामुळे अंबुलेनी परत गॅस लावावयाचा प्रयत्न केला पण काय? गॅस लागतच नव्हता. मग अंबुलेनी गॅस टाकी हलवून व वाजवून बघितली. त्यांची खात्री झाली की गॅस संपला आहे होता. आता मात्र अंबुल्यांचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. डोक्याला हात लावून त्यानी घरातील दूसरा गॅसचा भरलेला सिलिंडर आणला व रिकाम्या सिलिंडरच्या जागी लावला. रिकामा सिलिंडर जागेवर नेऊन ठेवला. नवीन सिलिंडर लावल्यावर गॅस चालू झाला. मग अंबुल्यांना लढाई जिंकल्याचा आनंद झाला. आता ते तेथेच कुकरची शिटी होईपर्यंत खुरी टाकून बसले. त्यांच्या तपश्चर्येला फळ आले व दहा मिनिटात कुकरने शिटी दिली अन अंबुल्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले. अत्यंत सोपा म्हणून घेतलेला पदार्थ त्याना असा महाग पडला होता.

खाली राजाभाऊ दाते आपला पदार्थ आमटी बनवण्याच्या प्रयत्नात होते. तसे त्यानी शर्मिलावहिनी जेंव्हा स्वयंपाक करतात तेंव्हा मधून मधून निरिक्षण केले होते. पण आता प्रॅक्टिकलची वेळ आली होती. त्यामुळे आमटी करण्यास कोणते साहित्य लागते याची मनाशी थोडी उजळणी करीत होते. आज राजाभाऊ आमटी करणार म्हटल्यावर शर्मिलावहिनी आपल्या लेकीकडे निघून गेल्या. जाताना राजाभाऊना ' बेस्ट ऑफ लक ' देण्यास विसरल्या नाहीत. त्या गेल्यामुळे सर्व किचनचा ताबा राजाभाऊकडे आला. आता ते आपल्या मनासारखे काम करणार होते. त्यानी सर्वात प्रथम घरातील रुचिरा हे स्वयंपाक बनविण्याचे पुस्तक शोधून काढले. त्यात दहा मिनिटे गेली. पण कोलंबसला अमेरिका सापडल्यावर जेवढा आनंद झाला असेल तेवढा आनंद राजाभाऊना पुस्तक सापडल्यावर झाला‌अमोर पुस्तक ठेऊन त्यानी त्यातील आमटी हा पदार्थ उघडला. त्यात दिलेले साहित्य त्याना जमा करावयाचे होते. सर्वात प्रथम तुरीची डाळ घ्यावयाची असल्याने फळीवर असलेले एकेक डबे उघडून तुरीची डाळ शोधून काढली. ती दाळ पातेल्यात घेऊन पाण्याने स्वच्छ धुवून काढली. मग कुकरमधील भांद्यात टाकून त्यात शिजण्यासाठी पाणी टाकले. कुकर गॅसवर ठेवला. आता दाळ शिजेपर्यंत इतर साहित्य शोधावयाचे होते. त्यात मीठ, मसाला, मिरच्या, गुळ, कढीपत्ता, ओले खोबरे, कोथिंबीर, चिंच व फोडणीचे साहित्य लिहिले होते. मग राजाभाऊने एकेक साहित्य ओट्यावर आणून ठेवण्यास सुरवात केली. त्यानी फ्रीज उघडला त्यात मिरच्या, कोथिंबीर, कढीपत्ता मिळाला. मनातल्या मनात बायकोच्या व्यवस्थितपणाची तारीफ केली. त्या जिनसा ओट्यावर आणून ठेवल्या. ओट्याशेजारील कपाटामधून त्यानी गुळ, चिंच आणून ठेवले. फोडणीच्या साहित्याचा डबाच ओट्यावर ठेवला. तेलाचे भांडे त्याना माहित होते. त्यामुळे चटकन घेण्यासाठी हात लांब केला त्याला धक्का लागून ते कलंडले व सर्व तेल ओट्यावर सांडले. आता आली का पंचाईत. नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्ने. ते तेल कपड्याने पुसण्यात अर्धा तास गेला. मध्येच कुकरची शिटी वाजली. तेलाच्याच हाताने गॅस बंद केला व सर्व तेल नंतर पुसून काढल्यावर नवीन तेल मोठ्या बरणीतून काढून घेतले. मग ते रुचिरामधील पुढली स्टेप वाचू लागले. प्रथम कुकरमधील शिजलेल्या डाळीला कुकरमधून बाहेर काढले. आता दुसऱ्या पातेल्यात फोडणीकरून ही डाळ त्यात टाकावयाची होती. त्यानी दोन तीन चमचे तेल टाकून त्यात फोडणीचे साहित्य टाकले. मोहरी तडतडू लागल्यावर त्यात डाळ टाकली. मग मीठ,मसाला,मिरच्या,कोथिंबीर,कढीपत्ता, गुळ, खोबऱ्याचा किस व पंधरा सोळा वाट्या पाणी टाकले. चिंचेचा कोळ करून त्यात घातला. सर्व सोपस्कार झाल्यावर राजाभाऊ थोडे रिलॅक्स झाले होते. तेवढ्यात त्यांची डोअरबेल वाजली. म्हणून गॅस लहान करून ते गडबडीने कोण आले ते पाहवयास गेले. त्याना भेटावयास त्यांचे लांबचे मित्र आले होते. राजाभाऊ गडबडीत होते. पण त्याना या म्हटल्यावाचून गत्यंतर नव्हते. त्याना बसवून थोड्या गप्पा मारल्या. घरात चहा करण्यासाटःई कोणी नाही. मी एकटाच आहे. तुम्ही निवांत वेळ काढून फोन करून आलात तर शर्मिलेला थांबवून ठेवीन व मी पण वेळ काढीन असे सांगून त्याना कटवले. त्यानी दार लावून घेतले व घरात आता वरण शिजले असेल म्हणून पाहवयास गेले. पण गॅस बंदच होता. काय झाले म्हणून पाहवयास गेले असता गॅस लहान करण्याच्या नादात त्यानी तो चक्क बंदच केला होता. परत गॅस पेटवला व वरणास उकळी फुटेपर्यंत तेथेच थांबले.  थोड्याच वेळात कढीपत्याचा वास दरवळू लागला आणि राजाभाऊच्या चेहऱ्यावर हसू फुटले.

शेजारी दिवाकर आपल्या पोळ्या बनवण्याच्या खटपटीत होते. त्यांच्याकडे फूड प्रोसेसर असल्याने त्यात कणिक सहज मळून घेता येते हे माहित होते. त्यामुळे कणिक भिजवायचे टेंशन त्याना नव्हते. त्यानी आवश्यक तेवढी कणिक त्यामधून भिजवून मळून घेतली. आता पोळ्या लाटावयाच्या व भाजावयाच्या होत्या. मग पोळपाट लाटण्याची शोधाशोध सुरू झाली. पोळपाट लाटणे सापडल्यावर ते ओट्यावर आणून ठेवले. तवा पण आणला व गॅसवर ठेवला. आता पोळ्या करण्यासाठी कणकेचे लिंबाएवढे लहान गोळे करून एक गोळा पोळपाटावर लाटावयास घेतला. मात्र ते काम सोपे नव्हते. रुचिरात लिहिल्याप्रमाणे प्रथम पुरी एवढे लाटून त्याला तेल लावून त्याची घडी करून परत लाटले. जिकडे लाटत होते तिकडे पातळ पोळी होत होती पण जिकडे लाटले जात नव्हते तेथे जाडच राहत होती. त्यामुळे त्यानी औफेर पोळी लाटली ती पोळपाटाच्या साईजपेक्षा मोठी झाली. त्यावर त्यानी एका डब्याच्या झाकणाने दाबदिला. व त्या झाकणाबाहेरील भाग काढून टाकला. पोळी गोल गरगरीत लाटली गेली होती. आता ती तव्यावर टाकावयाची होती पण ती उचलली की तिला घडी पडत होती. म्हणून तो पोळपाटच तव्यावर पालथा केला. तवा गरम असल्यामुळे ती पोळी एक मिनिटातच टंब फुगली. तिला पालथी करण्यासाठी दिवाकरांनी उलथन्याने प्रयत्न केला. त्यात ते यशस्वी झाले. पण एकदम "आई ग" असे ओरडले. या पोळीच्या उलथापालथीत त्यांचा हात कधी तापलेल्या तव्याला लागला कोण जाणे. तव्याने आपले भाजण्याचे काम चोख बजावले होते. एकच जोराचा चटका बसल्यावर दिवाकरानी प्रथम गॅस बंद केला. धावत जावून हात धुतले व भाजलेल्या जागेवर बरनॉल लावले. मग अनुभवाने शहाणे झाल्याने दिवाकर पोळी भाजण्याचे प्लॅनिंग करू लागले. तव्यावरची पोळी भाजेपर्यंत दूसरी पोळी तयार पाहिजे म्हणून दोन पोळया झाल्यावरच गॅस पेटवला. एक भाजेपर्यंत दूसरी पण तयार असल्याने वेळही वाचत होता व कामही लवकर होत होते. पण हे काम करण्याचा त्याना अतिशय कंटाळा आला होता. दोन तीन तासात कमरेचा टाका ढिला करीत त्यानी आपल्या पोळ्या आटपल्या.

देशपांडे हरहुन्नरी असल्याने त्याना भाजी करणे किस झाडकी पत्ती इतके सोपे होते. कदाचित त्याना याचा अनुभव असल्याने ते सराईतपणे कामाला लागले. प्रथम बटाटे उकडून घ्यावयाचे असल्याने त्यानी बटाटे कुकरमध्ये घालून त्यात पाणी घालून उकडवण्यास ठेवले. तोपर्यंत कांदे चिरून ठेवावयाचे होते. सौ. पुष्पावहिनी कांदे नेहमी विळीनेच कापत असल्याने त्यानी सुरीकडे दुर्लक्षच केले होते. देशपांडेना विळीने कांदे चिरता येईनात. म्हणून त्यानी सुरी शोधून काढली. ती स्वच्छ धुतली. त्यानी कांदे कापण्यास सुरवात केली. कांदे कापताना त्याना जाणवले की या सुरीला धारच नाही त्यामुळे कांदे कापता येत नव्हते. त्यांच्या नशिबाने एक धारवाला रस्त्याने ओरडत चालला होता. त्याला त्यानी थांबवून सुरीला धार लावून घेतली. मग व्यवस्थित कांदे कापावयास सुरवात केली. कांदे कापत असताना त्याना आपण बटाटे शिजत ठेवल्याचे आठवले व ते धावत घरात गेले. कुकरमधील पाणी केंव्हाच संपून गेले होते व फक्त बटाटेच गॅसवर भाजले जात होते. त्यानी ताबडतोब गॅस बंद केला. कुकर उघडून आत पाहिले. सर्व बटाटे फुटले होते त्यांचा गर बाहेर आला होता. मग त्यानी ते बटाटे हळुवार हाताने एका ताटात ठेवले. मग त्यानी गॅसवर एक पातेले ठेऊन फोडणी केली त्यात कांदे परतून घेतले. ते शिजेपर्यंत झाकण ठेवले. मग त्यात बटाट्याचा गर टाकला. नंतर भाजीचे सर्व साहित्य टाकून शिजण्यास ठेवली भाजीचा मस्त वास आल्यावर त्यात कोथिंबीर टाकून समाधानाने ती गॅसवरून उतरवली.

आपापल्या घरी दवे व आठवले यानी आपले पदार्थ सोपे असल्याने बनवले होते. त्याना कढी व खीर असल्याने व त्याना सवय असल्याने त्यानी ते पदार्थ वेळेच्या आधीच बनवून आणले होते. घनश्याम देवनी मात्र कांदा भजी बनवताना आपल्या हाताला दोन चार चटले दिले होते. पण गड्याने हार मानली नव्हती. भजी करून त्यानी आणली होती. डॉ. चौधरीने मात्र थोडी चलाखी केली होती. कोपऱ्यावरच्या दुकानात जावून वऱ्हाडी ठेचा विकत घेऊन घरी त्यावर फोडणी दिली होती.

आता सर्वांनी आपापले पदार्थ घेऊन देशपांडे यांचेकडे जमावयाचे ठरले होते. त्याप्रमाणे एकेक शिलेदार आपला आपला पदार्थ घेऊन हजर झाला. देशपांडे यानी सर्वांची व्यवस्था हॉलमध्येच केली होती. सारे जमल्यावर गप्पा सुरू झाल्या. तेवढ्यात दिवाकर म्हणाले ; " मित्रानो, मला माहित आहे की सर्वांना भुका लागल्या आहेत, पण मला असे सुचवावयाचे आहे की ज्याप्रमाणे आपल्या बायका जेवताना एकमेकीला त्यांच्या नवऱ्याचे नाव घ्यावयास लावतात व कार्यक्रमात रंग भरतात. त्याप्रमाणे आपणही आप्ल्या बायकोचे नाव उखाण्यात घेऊन या कार्यक्रमात रंगत आणू या. सर्वांनी एकदम एकमताने कबूल केले. प्रथम दिवाकरांनाच घेऊ द्या. असे म्हणून सर्वांनी एकमताने दिवाकरांना सांगितले. दिवाकराने नाव घेतले असे

चांगल्या पोळ्या करण्याचा होता मानस
त्यासाठीच मी आज केले आताचे धाडस
अलकाच्या प्रोत्साहनाने केला हो कळस
खाण्यास घ्याव्या पोळ्या, झटका आळस

मग अंबुले यानी नाव घेतले.

घेतला मी सोपा पदार्थ, हौसेने मागून  भात
आल्या खूप अडचणी,पण केली सर्वावर मात
झाल्यावर तो भात, बसलोडोळे भरून पहात
मीनाच्या आठवणीने, खाण्यास करू सुरवात

नंतर दाते यानी उखाणा घेतला.

आमटीला चटकदार बनवण्यास केली फोडणी,
मात्र तेल सांडले तेंव्हा डोळ्यात आले पाणी
आवरताना आठवली मला माझी शर्मिलाराणी
गोड मानून घ्या आमटीला, राहीन मी ऋणी

मग देशपांडे यानी नांव घेतले.

कांदाबटाटा रस्सा,करण्याचा होता अट्टाहास
खूप मेहनतीने केला रस्सा, दरवळला वास,
रस्सा खाताना,गृहिणीचा होईल तुम्हांस भास
मात्र ठेवा नमुना रस्स्याचा, तो पुष्पास खास

नंतर देव यांनी नाव घेतले.

चवदार भजी करण्याचा, घातला घाट
मनांत ठरवले हो खेकडाभज्याचा थाट
कुरकुरीत भजी केली समोर ठेवले ताट
खाण्यासाठी गौरीची पाहत बसलो वाट

मग आठवले यानी घेतला उखाणा.

शेवया घेतल्या तव्यावर, तुपात भाजून
खीर बनवली त्याचीच, दूधात घालून
काजू,बदाम,केशर,वेलदोडे पेरले वरून
मीनाला आवडते अशी खीर मनापासून

दवे मग उठले नाव घेण्यास

दह्याचे केले ताक, पुन्हा पुन्हा खूप घुसळून
कोटा वाढवला ताकाचा,त्यात पाणी घालून
त्याच ताकाची आणली, चवदार कढी बनवून
भारतीच्या हाताची चव आली का पाहा चाखून

शेवटी डॉ. चौधरीने उखाणा घेतला

माहिती आहे सर्वांना वार्हाडी ठेच्याचा हिसका
खाल्ल्यानंतर कळतो त्याचा जोरदार ठसका
अरुणाला म्हटले, लोक घेतील याचा धसका
म्हणून ठेच्यावर घातला गरम तेलाचा चुरका

सर्वांनी टाळ्या वाजवून सर्वांचे स्वागत केले. सर्वांनी आपापली थाळी घेऊन जेवण वाढून घेतले. सर्वजण मजेत हास्यविनोदात जेवण करून या अंगत पंगतच्या आठवणी काढत आपापल्या घरी गेले.