भाजपची 'मराठी' कार्यसूची

कालच्या ईसकाळात ही बातमी वाचली

बातमी भाजपच्या निवडणूक जाहीरनाम्याची आहे. तीत मराठीविषयक मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत :
१. रिक्षा आणि टॅक्‍सीचालकांना परवाने देण्यापूर्वी मराठी भाषेची परीक्षा बंधनकारक
२. मराठी भाषा आणि संस्कृतीसाठी स्वतंत्र कॅबिनेट मंत्रिपद
३. सार्वजनिक कार्यालये, दुकाने व उपाहारगृहांमध्ये मराठीतून सेवा पुरविणे गरजेचे... !
४. न्यायालयांमध्ये मराठीचा वापर
५. मराठी साहित्य इंटरनेटवर मोफत उपलब्ध करून देणे
६. विमानतळांवर मराठीतून घोषणा
७. विमान व रेल्वेत मराठी वृत्तपत्रांच्या वितरणाचे बंधन
"भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रीय पक्ष आहे. त्यामुळे आम्ही एकतेला महत्त्व देतो. मात्र, महाराष्ट्रात मराठी भाषा आणि अस्मितेचेही रक्षण झाले पाहिजे आणि एकताही कायम राहिली पाहिजे, अशी आमची भूमिका आहे." असे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी ह्या 'व्हीजन महाराष्ट्र २०२०' चे प्रकाशन करताना म्हणाले.
बातमीत जाहीरनाम्यातील इतर मुद्यांबरोबर 'फेरीवालामुक्त मुंबई' आणि' झोपडपट्टीमुक्त प्रदेश' अशाही दोन घोषणा असल्याची माहिती दिलेली आहे.

  • मराठी भाषेची परीक्षा उत्तीर्ण होऊन रिक्शा आणि टॅक्सीवाले मराठी बोलू शकतील/लागतील असे तुम्हाला वाटते का?
  • मुळात मराठीतून शिक्षण झालेल्या व्यक्तींच्या (रेल्वे, बस, विमान इ. ) सार्वजनिक ठिकाणी इतरांशी मराठी बोलण्याचा तुम्हाला काय अनुभव आहे?
  • मराठी साहित्य इंटरनेटवर मोफत उपलब्ध करून देण्यासाठी जे श्रम/संसाधने लागतील त्याचा खर्च कोण करील असे तुम्हाला वाटते?
  • वरील मुद्यांत मराठी अस्मिता आणि भाषेचे संरक्षण आणि एकता ह्या दोहोंची सांगड कशी घातलेली आहे असे तुम्हाला वाटते?
  • अजेंडाला शासकीय शब्दकोशात 'कार्यसूची' हा शब्द सांगितलेला असताना तिला 'अजेंडा' असे म्हणण्याचे कारण काय असावे बरे?
  • महाराष्ट्रविषयक आणि मराठीविषयक मुद्दे अंतर्भूत असणाऱ्या ह्या पुस्तिकेचे नाव व्हीजन महाराष्ट्र असे का ठेवले असावे?